Next
मद्रासचा मोझार्ट!
श्वेता प्रधान
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story“एवढी हौस असेल, तर कोडांबक्कमच्या रस्त्यांवर मुलाला गायला उभं करा; शाळेत नाव कशाला घातलंय?” शिक्षकांनी असं ऐकल्यावर ए. एस. दिलीपकुमारला खालच्या मानेनं घरी नेण्यावाचून त्याच्या आईकडे काही पर्याय नव्हता. एएस. दिलीपकुमार लहान असला, तरी कुटुंबाला पोसण्यासाठी शाळेऐवजी अनेकदा कामाला प्राधान्य द्यावं लागत असे. खेळणं, हुंदडणं यांची तर तोंडओळखही झाली नाही. शाळेला दांड्या आणि परीक्षेत भोपळा मिळाल्यावर शाळा आक्षेप घेणार नाही तर काय करेल, असं म्हणत एएस. दिलीपकुमारनं स्वतःची समजूत घातली. की-बोर्ड, पियानो, सिंथेसायझर, हार्मोनियम, गिटार यांत एकाचवेळी प्रावीण्य मिळवत जाणाऱ्या त्याच्या कलेशी त्यावेळी कोणाला घेणंदेणं नव्हतं; १९९२ सालापर्यंत तरी नाही. ‘रोजा’मुळे ए. आर. रहमान हे नाव घराघरांत आळवलं जाऊ लागलं आणि ‘हाच तो आपला एएस. दिलीपकुमार!’ असा साक्षात्कार अनेकांना झाला. ‘चाँद तारों को छुने की आशा, आसमानों में उडने की आशा’ म्हणत त्यानं अशी काही सरगम बांधली, की संगीतक्षेत्रात ‘रहमानयुग’ अवतरलं. ज्या रस्त्यांवर गाणी गात पैसे मिळवण्याचे टोमणे ऐकावे लागले होते, त्याच कोडांबक्कमला घराच्या मागच्या भागात रहमाननं सन्मानानं एक अद्ययावत म्युझिक स्टुडिओ उभारला!

काळ कठीण होता...
रहमानला संगीताचा वारसा मिळाला वडिलांकडून. परंतु त्यांचा सहवास मात्र जेमतेम नऊ वर्षांपुरता लाभला. त्यांच्या अकाली जाण्यानं रहमानला नकळत्या वयात प्रौढ व्हावं लागलं. चार पैसे मिळवण्यासाठी की-बोर्ड वाजवण्यापासून सांगीतिक उपकरणं दुरुस्त करण्यापर्यंत सगळं काही करायचा रहमान. त्यातूनच त्याला  ‘म्युझिकल प्रोग्रॅमिंग’ समजायला लागलं. कॉम्प्युटर म्युझिकमधला तज्ज्ञ होण्यापर्यंत त्यानं प्रगती केली. भान हरपल्यासारखा संगीताचा ध्यास घेतला. इलायराज, एमएस. विश्वनाथन आदींकडे काम करायला सुरुवात केली. जाहिरातींची जिंगल्स बनवली. पण, मन काही रमेना.

मणिरत्नमची साथ
वडील नाहीत, संघर्ष संपत नाहीत आणि आयुष्यात ध्येयही नाही.... वयाच्या पंचविशीतच रहमानच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागले. काही बरंवाईट होण्याच्या आत नियतीनं मणिरत्नमच्या रूपात त्याच्या स्टुडिओचा दरवाजा ठोठावला. कावेरी नदीच्या वादावर रहमाननं रचलेली धून मणिरत्नमनं ऐकली आणि ‘रोजा’साठी त्याला साइन केलं. आधी तर ‘मला नाही जमणार पिक्चरबिक्चरचं संगीत’ म्हणत रहमाननं नकारच दिला. परंतु मणिरत्नमनं हट्ट सोडला नाही. मणिरत्नम-रहमान जोडीनं ‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘गुरू’, ‘इरुवर’, ‘थिरुडा थिरुडा’सारखे जवळपास १५ म्युझिकल हिट्स दिले.  

रमता जोगी
रात्रीच्या एकांतात स्टुडिओत बसून एकाहून एक सरस धून बनवत स्वतःमध्ये रमणारा रहमान उर्वरित जगाच्या दृष्टीनं एक रहस्यच. रहमानच्या संगीताचं एक वैशिष्ट्य आहे; भाषा कळो न कळो, त्याची गाणी कानांना गोड वाटतात. किंबहुना, रहमानच्या सुरांमुळे गाण्यांमधली दाक्षिणात्य भाषा आपल्या ओठांत घोळायला उत्सुक असते. ‘जिया जले’च्या सुरुवातीला येणारं ‘पुंजिरीथंजी कोंजिक्को मुंथिरी मुत्तोली चिंधिक्को वंजनी वर्न चुंधरी वावे…’ मोडकंतोडकं का होईना पण सुरात म्हणावंसं वाटतं ते उगीच नाही.

‘कारुण्याची झालर असल्याशिवाय संगीत हृदयाला भिडत नाही,’ असं रहमान मानतो. ‘तू ही रे’मधल्या अंतऱ्यातली आर्त बासरी, ‘रोजा जानेमन’च्या विरहाचा आलाप, ‘ए अजनबी’ गाण्यातली ‘पाखी पाखी परदेसी’ ही व्याकूळ साद, ‘अगर तुम साथ हो’मधला नाजूकसा पण अस्वस्थ करणारा ठेका ऐकून भान हरपलं नाही, असा रसिक विरळाच.

फ्युजन  
रहमानच्या गाण्यांचा खरा आनंद मिळतो हेडफोन लावून! लॉन्ग ड्राइव्हच्या प्लेलिस्टमध्ये रहमान ऑल-टाइम फेव्हरेट असतो. कुंद हवा, वाफाळती कॉफी आणि रहमानची गाणी... संगीतप्रेमींसाठी पर्वणीच!

पाश्चात्त्य मेलडी आणि भारतीय राग यांना एकमेकांत गुंफून सुरावटीचा नवीनच तजेला निर्माण करण्यात तो वाकबगार आहे. दाक्षिणात्य लोकसंगीत आणि जॅझ यांचा मिलाफ इतका मोहिनी घालणारा असू शकतो, हे त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं. भारतीय तालवाद्यं आणि पाश्चात्त्य इंस्ट्रुमेंट यांची सिम्फनी अफलातून परिणाम साधू शकते, हे त्यानं दाखवून दिलं. पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतात तरबेज झालेल्या रहमाननं त्यात लोकसंगीत, कर्नाटकी संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतासह पॉप, रॅगे, जॅझचं भन्नाट फ्युजन निर्माण केलं. भारतीय चित्रपटसंगीताला त्यानं ७.१ सराऊंड साऊंड टेक्नॉलॉजी, डिजिटल साऊंड मिक्सिंग आदींची सवय लावली. प्रत्येक गाण्यात एखादा विलक्षण ठेका, ताल नाहीतर रोमांच उभे करणारी सुरावट असणं, ही रहमानची ‘सिग्नेचर स्टाइल’ बनली. उदाहरणार्थ, ‘दिल हैं छोटासा छोटी सी आशा’च्या दुसऱ्या अंतऱ्याआधीचं ‘एरे...रोएरे...एरेयो...’, ‘रुक्मिणी रुक्मिणी’मधला ‘हो हो ओ ओ’चा ताल, फेडआऊट होत जाणारा ‘रंगीला रे...’, ‘ताल से ताल मिला’च्या पार्श्वभूमीला पागोळ्यांचा आवाज... सारंच अद्भुत. रहमानचं एकेक गाणं म्हणजे संपूर्ण ‘थिएट्रिकल’ अनुभूती असते, असं अनेकांचं मत आहे.
डान्स नंबर्स करतानाही रहमान आपल्या सांगीतिक तत्त्वांशी प्रामाणिक राहिला. डान्सच्या नावाखाली कान बधिर करणारं संगीत बनवणं त्याला पटत नाही. म्हणूनच ‘मुक्काला मुकाबला,’ ‘उर्वशी उर्वशी’, ‘हम्मा हम्मा’,‘माय्या माय्या’ ऐकलं की आजही चाहत्यांचे पाय आपसूक थिरकायला लागतात.

ऑफबिट गायन  
आपला आवाज लोकांना आवडणार नाही, या संकोचानं सुरुवातीला तो गात नसे. मात्र ‘माँ तुझे सलाम’, ‘नादान परिंदे घर आ जा’, ‘चले चलो’, ‘रूबरू रोशनी हैं’, ‘ये जो देस हैं तेरा’ अशी त्यानं संगीत दिलेली गाणी त्याच्याच आवाजात भावगर्भता आणतात. एस.पी. बालसुब्रमण्यम्, हरिहरन, चित्रा हे दाक्षिणात्य आवाज भारताच्या इतर भागांत लोकप्रिय करण्यातही रहमानचा मोठा वाटा आहे. ऑफबिट आवाजांना मुख्य प्रवाहातली गाणी देऊन ती सुपरहिट करून दाखवण्याचं कसबही त्याचंच. दलेर मेहंदी (रंग दे बसंती), नूरन सिस्टर्स (पटाखा गुड्डी), रेमो फर्नांडिस (हम्मा हम्मा), श्वेता शेट्टी (रुक्मिणी रुक्मिणी), सुखविंदर सिंग (छैया, छैया, रमता जोगी), अदनान सामी (एय उडी उडी उडी), मधुश्री (कभी नीम नीम), मोहित चौहान (मसक्कली), रेखा भारद्वाज (ससुराल गेंदा फूल), हर्षदीप कौर (हीर), उदाहरणं सांगावीत तितकी कमीच..

सुफियाना  
‘कानांपुरतं मर्यादित न राहता संगीतानं पार थेट आत्म्याला भिडावं’ असं रहमान मानतो. स्वतःला संगीताचं साधन मानून जगणाऱ्या रहमानच्या सात सुरांना म्हणूनच दैवी स्पर्श लाभलाय. ‘जो निंदेतें नेघे, स्तुति न श्लाघे, आकाशा न लगे,  लेपु जैसा ‘ असं ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे सापेक्षतेच्या पलीकडे असलेला भक्त आकाशाप्रमाणे निर्लेप असतो. अल्लारखाँ रहमान नावाचा संगीताचा भक्त याच ‘सुखदुःखेसमेकृत्वा’ स्थितीत जगतोय. आभाळाच्या असीमित खोलीशीच त्याच्या संगीतानुभवाची तुलना होऊ शकते. त्याच्यासाठी सर्वोच्च सन्मान आणि निराशाजनक अपयश दोन्ही समान. हा सुफी शिकवणुकीचा परिणाम असल्याचं तो मानतो. वयाच्या विशीत त्यानं सुफी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सुफी तत्त्वं जाणून घेतली आणि आध्यात्मिक शक्तींकडे स्वतःला सोपवून दिलं. रहमानचं आध्यात्मिक समर्पण ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’(जोधा अकबर), ‘मेरा यार मिला दे साईंया’(साथिया), ‘मौला मौला’(दिल्ली ६), ‘कुन फाया कुन’(रॉकस्टार), ‘पिया हाजी अली’(फिजा) या आणि अशा अनेक गाण्यांतून आपणही अनुभवलंय.

सहा जानेवारीला रहमान ५२ वर्षांचा झाला. जाहीर प्रदर्शनापासून अलिप्त राहत असल्यानं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम कुठेही पार्ट्यांच्या फोटोंचा खच पडला नाही. जगभरातून शुभेच्छा मात्र अगणित मिळाल्या. ‘१९९२ नंतर पुढे सुमारे १७-१८ वर्षं रहमाननं साकार केलेलं संगीताचं सुवर्णयुग पुन्हा कधी अवतरणार,’ असा प्रश्नही उपस्थित झाला.  

कोणतंही काम हाती घेण्याआधी तो हमखास एक प्रश्न विचारतो,‘या प्रोजेक्ट्मध्ये मी नसलो, तर चालणार आहे का?’ उत्तर नकारार्थी आलं, तरच तो होकार देतो! हिंदी चित्रपटसृष्टीपासून काहीसं अलिप्त राहण्यामागे असा काही प्रश्न तर कारणीभूत नसावा? तसं असेल तर रहमानला मनापासून सांगावंसं वाटतं, ‘तू नसून चालणार नाही; तुझ्याशिवाय संगीत मनाला भिडतच नाही..!’

जय हो..!
संगीतकाराच्या हाती अख्खी फिल्म सुपूर्द करण्याची दिग्दर्शक डॅनी बॉएलची ‘स्लमडॉग मिलिअनिअर’ ही पहिलीच वेळ होती. संगीतात वैविध्य येण्यासाठी रहमाननं प्रत्येक ट्रॅक स्वतंत्र ठेवला. ‘स्लमडॉग मिलिअनिअर’च्या ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’  आणि ‘बेस्ट ओरिजिनल साँग’(जय हो) या दोन ऑस्कर ट्रॉफीज् रहमानमुळे भारतात आल्या.  “ तिरस्कार, प्रेम यांपैकी कशाची निवड करशील असं आयुष्यानं विचारलं, त्यावेळी प्रेमाची निवड केली... आणि आज हा तुमच्यासमोर उभा आहे!” हे ‘ऑस्कर’च्या वेळेचे रहमानचे शब्द बोलके आहेत. 

...तरी ही तो विनम्र!
‘म्युझिकल कॉन्सर्ट्सनंतर इंग्लंडच्या राणीची भेट झाली’, ‘अमेरिकेच्या अध्यक्षांकडून ख्रिसमस कार्ड आणि व्हाइट हाऊसमध्ये जेवणाचं आमंत्रण आलंय’ वगैरे गोष्टी रहमान अगदी सहज सांगतो. त्याच्या कलेचा सन्मान अख्खं जग करत आलंय. कॅनडानं त्याच्या सन्मानार्थ एका रस्त्याला ‘अल्लारखाँ रहमान स्ट्रीट’ असं नाव दिलं. सेशेल्स सरकारचा तो सांस्कृतिक राजदूत आहे. जगात सर्वाधिक मागणी असणाऱ्या संगीतकारांमध्ये रहमान हे एकच भारतीय नाव आढळतं. रहमानला दोन ऑस्कर, ग्रॅमीही दोन, एक गोल्डन ग्लोब, सहा राष्ट्रीय पुरस्कार, पंधरा फिल्मफेअर, सतरा दाक्षिणात्य फिल्मफेअर मिळालेत. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कारही त्याला मिळालाय. परदेशातील विद्यापीठांनी त्याला मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. इतकं यश मिळवूनही तो  विनम्र आहे... 


थोडासा वादही
‘मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ हा  इराणी सिनेमा केल्यानंतर मतभेदांमुळे इतर टीमसह संगीतकार रहमानच्या नावानंही फतवा निघाला होता.
लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या कॉन्सर्टमध्ये रहमानची गाणी ऐकण्यासाठी जमलेल्या चाहत्यांनी ‘आम्हाला हिंदीपेक्षा तामीळ गाणी अधिक ऐकवली’ अशी तक्रार सोशल मीडियावर केली. रहमानला याची विशेष दखल घ्यावी लागली होती.


कुटुंबवत्सल 

रहमानचं पूर्वीचं नाव दिलीपकुमार आणि कालांतराने त्याचं लग्न झालं सायरा बानूशी; काय योगायोग! खातिजा, रहिमा आणि अमीन ही त्यांची मुलं. खातिजा आणि अमीन यांनी वडिलांच्या वाटेने संगीतक्षेत्रात प्रवेश केलाय. 


संगीत अकादमी
सतत वैशिष्ट्यपूर्ण आवाजाच्या शोधात असणारा रहमान आपल्या संगीतशाळेत संगीताचे भविष्य घडवत आहे. ए. आर. रहमान फाउंडेशनतर्फे त्याने २००८ साली चेन्नईला ‘केएम म्युझिक काँझर्व्हेटरी’ ही संगीताचं उच्च शिक्षण देणारी संस्था सुरू केली आहे.


त्याच्यासारखा तोच

लॉर्ड अँड्रयू लॉइड वेबर हा वेस्ट एन्ड आणि ब्रॉडवेमधला किमयागार रहमानच्या कलेवर असा काही फिदा झाला, की स्वतः संगीतकार असूनही लाखो पौंड्स खर्च करून तो रहमानसाठी निर्मात्याच्या भूमिकेत शिरला. रहमानरचित ‘बॉम्बे ड्रीम्स’ हा म्युझिकल शो लंडनच्या अपोलो व्हिक्टोरिया थिएटरमध्ये सलग दोन वर्षं सुरू होता. यातलं ‘शाकालाका बेबे’ हे गाणं रहमाननं आधी ‘मुधलवन’ या तामीळ चित्रपटासाठी बनवलं होतं. ‘बॉम्बे ड्रीम्स’नंतर हिंदीत ‘नायक’ आणि नंतर मँडेरिन-चायनीज आल्बम ‘इन द हार्ट ऑफ द वर्ल्ड’मध्येही ते वापरलं गेलं.


दिग्दर्शक रहमान 
संगीतकार, लेखक आणि दिग्दर्शक अशी तिहेरी जबाबदारी प्रथमच पेलत रहमान परफ्युम्सवर आधारित सुवासिक व्हर्चुअल रिअॅलिटी फिल्म ‘ल मस्क’ घेऊन येणार आहे. सुवासिक अशासाठी की कथेनुसार परफ्युम्सचा प्रत्यक्ष सुगंध घेता-घेता फिल्म बघता येईल. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link