Next
सांज ये गोकुळी…
अनिल गोविलकर
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story

page22-2page22-3page22-1साधारणपणे मागील शतकात, ८० च्या दशकात, मराठी भावगीतांमध्ये एकप्रकारची ‘पोकळी’ निर्माण झाली होती. काहीच नवीन घडत नव्हते आणि जी नवीन गाणी येत होती, त्यात फारसे नावीन्य नव्हते. वाद्यमेळातदेखील तेच जुने ‘साचे’ वापरले जात होते. एकूणच मरगळ आल्यासारखी स्थिती होती. वास्तविक संगीताचा नेहमीच स्वतःचा असा स्वतंत्र प्रवाह असतो आणि प्रवाह जसा पुढे सरकत असतो त्याप्रमाणे रचनेत बदल घडत असतात आणि त्याचीच वानवा होती. अशा वेळेस, ‘ऋतू हिरवा’ हा नवीन गाण्यांचा संच बाजारात आला आणि त्या गाण्यांचा बराच बोलबाला व्हायला लागला. गाण्यांत अप्रतिम कविता होत्या (ज्यांना कवितेच्या अंगाने आस्वाद घ्यायचा आहे, त्यांना तर पर्वणी होती) चालींमध्ये आधुनिकपणा तर होताच,शिवाय वाद्यमेळ, स्वररचना आणि गायन, सगळेच टवटवीत होते. बोरकरांपासून नवागत कवी नितीन आखवे, अशा सर्व कवींना यात स्थान मिळाले होते. प्रत्येक गाणे, एक कविता म्हणून देखील स्वतंत्रपणे अभ्यासता येत होती. एकूणच हा संच लोकांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाला. प्रत्येक गाण्याचा आशय वेगळा होता तसेच त्याच्याच अनुषंगाने स्वररचना केली गेली होती.
संगीतकार श्रीधर फडके यांनी आपले नाणे खणखणीतपणे सिद्ध केले. ‘ऋतू हिरवा’मधील गाण्यांनी श्रीधर फडके यांना मानमरातब, लोकप्रियता मिळाली आणि संगीतकार म्हणून त्यांचे नाव प्रस्थापित झाले. हृदयनाथ मंगेशकरयांच्या नंतर मराठी भावगीतांच्या क्षेत्रात प्रथमच ज्यांना ‘कवी’ म्हणतात (जे शक्यतो चित्रपटसंगीताच्या वाटेला फारसे जात नाहीत) अशांच्या कविता स्वरबद्ध झाल्या. याच संचातील ‘सांज ये गोकुळी’ हे गाणे.  या गाण्याची एक गंमत खुद्द संगीतकार श्रीधर फडके यांनीच सांगितली आहे. त्यांच्या मनात प्रथम या गाण्याच्या चालीचा ‘आराखडा’ तयार झाला आणि त्यांनी ती स्वरलिपी कवी सुधीर मोघे यांच्याकडे पाठवून दिली. कवी म्हणून सुधीर मोघे हे सिद्धहस्त होतेच. चालीचे ‘वजन’ लक्षात घेऊन त्यांनी शब्दरचना लिहिली. आपल्याकडे चालीवर कविता बेतणाऱ्यांची शेलक्या शब्दात संभावना केली जाते, जणू काही तसे करणे, हा अधर्म झाला किंवा गुन्हा झाला. कोत्या मनोवृत्तीचा हा परिपाक आहे. वास्तविक आपल्यासारख्या रसिकांकडे गाणे येते ते नेहमीच संपूर्णपणे रेकॉर्ड झाल्यावर आणि त्यावेळी अशी चर्चा करणे, हा वृथा खेळ आहे. आपल्यासमोर असलेले गाणे काय प्रतीचे आहे, याचीच प्रतवारी लावणे, हेच योग्य.  
सुधीर मोघे हे प्रासादिक, लालित्यपूर्ण कवी म्हणून ज्ञात आहेत. मुखडाच बघा, संध्याकाळ सावळी असणे आणि त्या सावळ्या रंगाची सावली दिसणे, हेच काव्यमय आहे. दूर असलेली पर्वतशिखरे आणि त्यातून दिसणारी काजळाची रेघ, ही खास प्रतिमा मनावर रेंगाळते. किंबहुना ‘सावळ्या’ शब्दाला अनुलक्षून कवितेत बऱ्याच प्रतिमा आहेत. मग, डोहांतले सावळे चांदणे किंवा श्यामरंगात बुडालेल्या पायवाटा इत्यादी प्रतिमा ‘सावळ्या’ शब्दाशीच निगडित आहेत. कविता वाचताना निसर्गचित्र तर उभे राहतेच, शिवाय कवितेच्या शेवटी, ‘अंधाराला फुटलेला पान्हा’ आणि त्याच्या जोडीने ‘सगळे विश्व कान्हारूपात समोर येणे’ इथे संध्याकाळचे चित्र पूर्ण होते.
संगीतकार श्रीधर फडके यांनी ‘पूर्वी’ थाटातील राग (पुरिया कल्याण/पुरिया धनाश्री) समोर ठेवून चालीचा आकृतिबंध तयार केला. खरे तर ललित संगीतात रागाचे शुद्ध स्वरूप शोधावे का, हा मूलभूत प्रश्नच आहे म्हणा. संध्याकाळचे राग हे आपल्या मनाची लगेच पकड घेतात आणि इथे या गाण्याचा मुखडाच अतिशय लोभसवाण्या आलापीने सुरू होतो आणि आपण त्यातच गुंगून जातो. अंतरे मात्र त्याच सुरावटीत बांधले आहेत. गाणे मध्य लयीत ठेवल्याने आस्वादता येते. वाद्यमेळ प्रामुख्याने संतूर/बासरीने तोलला आहे. एकूणच मनात चाल रुंजी घालते. वाद्यांचा वापर माफक असल्याने आशय गुदमरत नाही आणि संगीतकार म्हणून हे श्रेय श्रीधर फडके यांचेच.
या रचनेचे गायन हा विषय तर खास वेगळा करावा लागेल. आशा भोसले यांचे परिपूर्ण गायन, अचूक शब्दोच्चार आणि जरूर आहे तिथेच हलके असे खटके, ही सौंदर्यस्थळे म्हणता येतील. सुरुवातीलाच घेतलेला हुंकारात्मक आलाप, इतका अवघड आहे की त्याचे यथार्थ शब्दात वर्णन करणे अशक्य. ‘शामरंगात वाटा बुडाल्या’ ही ओळ गाताना, ‘शामरंगात’ इथे किंचित बारीक असा खटका आहे पण त्यामुळे कवितेतील ती प्रतिमा आपल्या मनावर ठसते. तसेच, त्याच अंतऱ्याचा शेवट करताना, ‘पैल घंटा घुमे राउळी’मधील ‘घंटा’ शब्द जितका स्पष्टपणे गायला जायला हवा, त्याच वजनाने गायला गेला आहे आणि त्या अंतऱ्याचा सगळा ‘तोल’ सांभाळला गेला आहे. ही कामगिरी सहज जमणारी नाही. गाण्याच्या शेवटी ‘अमृताच्या जणू ओंजळी’ गाताना जणू आपल्या ओंजळीतच हा स्वरांचा नजराणा पेश केला आहे, या थाटातच गायले आहे. त्या स्वरांतील आर्जव (आता ओंजळ म्हटल्यावर ते अध्याहृतच आहे) निव्वळ अप्रतिम आहे.
अर्थात इतके सगळे घटक एकजीव झाल्यावर निर्माण होणारी रचना ही काळावर आरूढ होऊन, आपल्या मनावर गारुड टाकणारी झाली तर त्यात नवल ते कुठले.

सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली

धूळ उडवीत गाई निघाल्या
शामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी

पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली

माउली सांज, अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी
वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link