Next
प्रचाराची (हीन) पातळी
विशेष प्रतिनिधी
Friday, April 19 | 05:00 PM
15 0 0
Share this story


या  वेळच्या निवडणुकीत प्रचाराने जी पातळी गाठली आहे, ती यापूर्वी कधीही नव्हती एवढी हीन आहे. निवडणुकीतील प्रचार हा वैयक्तिक निंदानालस्ती करणारा नसावा, त्यात जात, धर्म हे मुद्दे असू नयेत, उमेदवारांचे चारित्र्यहनन असू नये, महिला उमेदवारांबद्दल बोलताना लैंगिकतेचा आधार घेऊ नये, अशी अपेक्षा असते. परंतु देशातील लोकशाही आता परिपक्व झाली आहे असे म्हटले जात असताना, प्रचारात मात्र अपरिपक्वपणाच दिसून येत आहे. त्यामुळेच यावेळी निवडणूकआयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, याच राज्याच्या माजी मुख्यमंत्री मायावती आणि याच राज्यातल्या भाजपच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री मनेका गांधी व याच राज्यातील समाजवादी पार्टीचे नेते आझमखान यांनी प्रचाराची हीन पातळी गाठल्याबद्दल त्यांच्यावर भाषणबंदी घालावी लागली. खरे तर आचारसंहितेतील या तरतुदीचा निवडणूकआयोगाने यापूर्वीच वापर करून अशी कारवाई करावयास हवी होती. यासाठी न्यायालयाचा आदेश येण्याची वाट पाहण्याची काहीही गरज नव्हती. एका जागरूक नागरिकाने अशा भाषणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हिताची याचिका दाखल केल्यानंतर, न्यायालयाने आचारसंहितेत ही तरतूद असल्याचे निवडणूकआयोगाच्या निदर्शनास आणल्यानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे. यापुढे या तरतुदीचा मोठ्या प्रमाणात वापर करून निवडणुकीच्या प्रचारात जी अश्लाघ्य भाषा वापरली जाते तिला आळा घालण्याचे कसोशीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. निवडणूकप्रचाराचे भाषण हे राजकीय पक्ष व सरकार यांचे धोरण, कारभार आदी मुद्यांना धरून असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारचे यशापयश मतदारांपुढे मांडणे सोपे होते. पण, असे भाषण करण्यासाठी धोरणांचा व कार्यक्रमांचा सखोल अभ्यास करावा लागतो, त्यातील कच्चे दुवे शोधावे लागतात, हा अभ्यास करण्याची कोणचीच तयारी नसते. त्याऐवजी चरित्र्यहनन करणे, जातपात, धर्म काढणे, निंदानालस्ती करणे हे खूप सोपे असते. सामान्य लोकही त्यातच रस घेतात व टाळ्या वाजवत भाषणे ऐकतात. काही राजकारणी तर केवळ हावभाव व नकला, नाट्यमय वाक्ये फेकून आपले भाषण केवळ श्रवणीयच नाही तर प्रेक्षणीयही करतात, पण त्यातून सरकारच्या कारभारावर किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्षमतेवर काहीच प्रकाश पडत नाहीत. अशा भाषणाकडे मतदार केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून पाहतो व मत भलत्याच कुणालातरी देतो. त्यामुळे निवडणुकीतील भाषणाच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. जो राजकारणी चांगला कारभार करतो, त्याला फारसे चमकदार भाषण करावे लागत नाही, कारण त्याचे कामच बोलके असते. ज्यांनी फारसे काम केलेले नसते त्यांनाच पल्लेदार वाक्ये असलेले नाट्यपूर्ण किंवा मग चारित्र्यहनन, निंदानालस्ती करणारे भाषण करावे लागते. आर्थिक धोरण, परराष्ट्रधोरण, बेरोजगारी, औद्योगिक प्रगती याविषयी सरकारचे काय चुकले, काय बरोबर आहे, याचा ऊहापोह निवडणूकप्रचारात रंजकतेने करण्यासाठी अभ्यास व वक्तृत्व यांचा मेळ घालावा लागतो. तशी कुवत फारच थोड्या उमेदवारांकडे असते. असे उमेदवार मग शेलक्या भाषेचा वापर करतात. सध्या सरकारचे आर्थिक धोरण, संरक्षणधोरण, परराष्ट्रधोरण, परकी गुंतवणूक यावर बरेवाईट बोलण्यासारखे खूप आहे, पण फार मोजके उमेदवार प्रचाराच्या भाषणात यावर अभ्यासपूर्णतेने बोलताना दिसतात. हे मुद्दे प्रभावीपणे मांडल्यांनंतर सरकारला त्याला उत्तर देणे भागच असते. त्यातून सरकारचे यशापयश स्पष्ट होते व मतदारालाही खरे काय व खोटे काय हे ठरवता येते. त्यामुळे प्रचाराची भाषणे करण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link