Next
संकल्प सिद्धीला नेण्यासाठी अॅप!
अमृता दुर्वे
Friday, January 04 | 04:00 PM
15 0 0
Share this storyनवीन वर्षामध्ये हमखास केली जाणारी गोष्ट म्हणजे- संकल्प. बहुतेक जण काही ना काही ठरवतात. काही गोष्टी जमतात, तर काही राहून जातात. म्हणूनच ही काही अॅप्स, जी तुम्हाला तुमचे संकल्प पूर्ण करायला किंवा काही चांगल्या सवयी भिनवायला मदत करतील.

हॅबिट ट्रॅकर -
या अॅपमध्ये रजिस्टर करा. तुम्हाला तुमच्यात नेमका कोणता बदल घडवून आणायचा आहे, याचे काही पर्याय समोर येतील- फिटनेस, डाएट, अभ्यास, टाइम मॅनेजमेंट, वाचन, ध्यानधारणा, पुरेसे पाणी पिणे, न चुकता औषधे घेणे, इत्यादी. तुम्ही पर्याय निवडल्यानंतर त्याचे मोजमाप कसे करायचे ते ठरवा. म्हणजे हो किंवा नाही, किंवा दिवसातून किती वेळा वगैरे. यातील उत्तम गोष्ट म्हणजे तुमच्या सवयींचे मोजमाप तुम्ही स्वतः करणार! स्वतःची लहान लहान उद्दिष्टेही स्वतःच ठरवायची. अगदी दर दिवसासाठी किंवा एका आठवड्यासाठीची टार्गेट्स तुम्ही ठरवू शकता, त्यामुळे दडपण येणार नाही. तुम्ही भरत असलेल्या माहितीवरून तुमचा यश-दर (सक्सेस ग्राफ) तुम्हाला इथे पाहायला मिळेल. शिवाय एकाच वेळी अनेक सवयींसाठी हे अॅप तुम्ही वापरू शकता. वाईट सवयी सोडण्यासाठीही तुम्ही हे अॅप वापरू शकता. एका ठरावीक टप्प्यापर्यंत या अॅपचा वापर मोफत करता येईल, पण सगळी फीचर्स वापरायची असतील तर मात्र तुम्हाला फी भरावी लागेल.

पॅसिफिका : ताण-तणाव - मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी मदत करणारे हे अॅप आहे. याच्या मदतीने ध्यानधारणा करून तुम्हाला निवांत होता येईल. मसल रिलॅक्सेशन, व्हिज्युअलायझेशन अशा विविध प्रकारच्या ध्यानधारणेच्या पर्यायांनी तुम्हाला मनःशांती मिळवता होईल. दिवसभरात तुमचा मूड कसा होता आणि मनात काय विचार येत होते, याची नोंद तुम्हाला ठेवता येईल. मनातल्या विचारांची दिशा ओळखून नकारात्मक विचारांवर मात करता येईल. शिवाय ज्या गोष्टी तुमच्या मनःशांतीसाठी घातक ठरत आहेत, त्या सोडण्यासाठीही हे अॅप तुम्हाला मदत करेल.

लुमोसिटी - मेंदू तल्लख ठेवण्यासाठी हे अॅप आहे. स्मरणशक्ती, एखादी अडचण सोडवण्यासाठीची विचारक्षमता आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे अॅप मदत करते. या अॅपमध्ये आहेत लहान लहान खेळ आणि कोडी, जी सोडवण्यासाठी तुम्हाला तुमची विचारशक्ती पणाला लावता येईल. हे गेम्स कमी वेळाचे आहेत. यातल्या फ्री व्हर्जनमध्ये तुम्हाला रोज तीन गेम्सचा खुराक मिळेल.

वॉटर ड्रिंक रिमाइंडर - चांगल्या आरोग्यासाठी रोज भरपूर पाणी गरजेचे आहे, हे सगळ्यांनाच माहीत असते, पण पुरेसे पाणी पिणे लक्षात राहत नाही, अशावेळी हे साधेसोपे अॅप तुम्हाला मदत करेल. यात तुमचे वजन नोंदवले की किती पाणी पिणे गरजेचे आहे ते हे अॅप सांगेल. दरवेळी तुम्ही किती पाणी प्यायले याची नोंद करून ठेवायाची, पुन्हा पाणी पिण्याची वेळ आली, की अॅप तु्म्हाला आठवण करून देईल.

मेडिसेफ - पिल रिमाइंडर अँड मेडिकेशन ट्रॅकर - हे अॅप तुम्हाला औषध घ्यायची आठवण करून देईल. तुमच्या औषधांची नावे या अॅपमध्ये फीड करा. ती किती घ्यायची, किती वेळा तेही नोंदवा. आता तुम्हाला आठवण करून द्यायचे काम हे अॅप करेल.

हॅलो इंग्लिश : लर्न इंग्लिश - इंग्रजी भाषा शिकायची किंवा सुधारायची असे अनेक जण ठरवतात, पण काही ना काही कारणांमुळे ते रेंगाळते. हे अॅप तुम्हाला इंग्रजी भाषा विविध भारतीय भाषांच्या आधारे शिकायला मदत करेल. म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी, बंगाली यासारख्या १२ भारतीय भाषांमधून या अॅपचे धडे उपलब्ध आहेत. शिवाय हे धडे तुम्ही ऑफलाईनही गिरवू शकता. यामध्ये १०,००० इंग्रजी शब्दांची ऑडिओ डिक्शनरी आहे. शिवाय ‘व्हॉइस रेकग्निशन’ची मदतही तुम्हाला घेता येईल. लहान लहान गेम्स खेळत, कोडी सोडवत तुम्हाला एकेक पायरी वर जाता येईल. शिवाय रोजच्या बातम्या, लेख, ऑडिओ, व्हिडिओ आणि इबुक्सच्या मदतीनेही इंग्रजी भाषेचा सराव करता येईल.

ड्रॉप-लर्न ३१ न्यू लँग्वेजेस - एखादी नवी भाषा शिकायची असेल, तर मग हे अॅप मस्त आहे. या अॅपचे  डिझाईन इतके छान आहे, की शिकायला मजा येते. एखाद्या क्रॅश कोर्ससारखे हे अॅप आहे. एखाद्या नवीन देशात फिरायला जाताना तिथल्या भाषेतील काही शब्द, वाक्ये शिकायची असतील हे अॅप नक्की वापरून बघा. n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link