Next
भारतीय अवकाशयुगाचे प्रणेते
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

“थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाईंची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी आपल्याकडे आलेल्या कुतूहलकट्ट्याच्या मंडळींचं स्वागत करून मी त्यांना कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो,” प्राचार्य म्हणाले.
मग मुक्ताने बोलायला सुरुवात केली, “भारतीय अवकाशयुगाचे प्रणेते” अशी ओळख असणाऱ्या विक्रम साराभाईंचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. आजच्या कार्यक्रमाचा विषय वाचल्यावर तुमच्या मनात कुतूहल आणि अनेक प्रश्नही निर्माण झाले असतील. तुमच्यातल्या कुतूहलाला आणि चौकसपणाला साद आणि दाद देत तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांनी आजचा कार्यक्रम साकारणार आहे.”
मुक्ताच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत प्रणिताने प्रश्न केला, “ज्या काळात केवळ अमेरिका-रशिया असे श्रीमंत आणि प्रगत देशच अंतराळात झेपावण्याची स्वप्नं पाहत होते त्या काळात भारतानंही अंतराळात झेप घ्यावी, असं साराभाईंना का वाटलं?”
“भारतानंही अंतराळसंशोधनात उतरावं ही कल्पना जेव्हा साराभाईंनी मांडली तेव्हा ‘अंतराळसंशोधन भारताला परवडणार आणि झेपणार का?’, ‘त्याचा उपयोग काय?’ असे प्रश्न परदेशातल्या आणि भारतातल्याही अनेकांनी विचारले होते,” प्रथमेश सांगू लागला, “भारत तेव्हा अवघ्या काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र झाला होता. ब्रिटिशांनी केलेल्या शोषणामुळे भारताची आर्थिक स्थिती गरिबीची होती. स्वतःच्या फायद्यासाठी इथल्या उद्योगांवर बंधनं घातल्यामुळे तंत्रज्ञानाचा विकास कुंठित झाला होता. तसंच, शिक्षणातून आणि इतिहासाच्या विकृतीकरणातून लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण केला गेला होता. मात्र विज्ञान-तंत्रज्ञानातल्या संशोधनातून भारताचा विकास होईल, ही दूरदृष्टी साराभाईंकडे होती. तसंच, भारताला कोणतंही तंत्रज्ञान विकसित करणं जमेल, ही खात्री त्यांना होती. म्हणूनच, अवघ्या २८ वर्षांच्या साराभाईंनी अवकाशकिरणांवर (कॉस्मिक रे) संशोधन करण्यासाठी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी अहमदाबादला स्वतःच्या जागेत ‘भौतिक संशोधन प्रयोगशाळा’ (फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी) स्थापन केली.”
“अंतराळसंशोधनासाठी लागणारा निधी त्यांनी कसा उभा केला?” निमिषने विचारले.
“साराभाई सधन कुटुंबातले होते,” सानिया सांगू लागली, “त्यांचे वडील अंबालाल यांनी अहमदाबादमध्ये अनेक उद्योग स्थापन केले होते. साराभाईंनी स्वतःच्या कुटुंबाकडून, त्यांच्या उद्योगांच्या विश्वस्तसंस्थांकडून आणि परिचयातल्या दानशूर व्यक्तींकडून आवश्यक तो निधी उभा केला. साराभाईंच्या आणि संस्थेच्याही संशोधनाचा लौकिक लवकरच वाढत गेला. भारतीय अणुयुगाचे शिल्पकार होमी भाभा यांनी साराभाईंच्या कार्याचं महत्त्व ओळखून भौतिक संशोधन प्रयोगशाळेला अंतराळसंशोधनासाठी अणुऊर्जा आयोगाकडून अनुदान दिलं. ‘स्पुतनिक’ या मानवनिर्मित उपग्रहाचं रशियानं प्रक्षेपण केल्यावर भारतानंही प्रक्षेपणप्रकल्प हाती घ्यायला हवा, हे साराभाईंनी भारत सरकारला पटवून दिलं. भाभांच्या मदतीनं विषुववृत्ताजवळ थुंबा इथे भारतातलं पहिलं ‘अंतराळयान प्रक्षेपण स्थानक’ (रॉकेट लाँचिंग स्टेशन) उभारण्यात साराभाईंनी पुढाकार घेतला. तिथे यानप्रक्षेपण, संदेशवहन अशा विविध गोष्टींसाठी सुविधा उभारून २१ नोव्हेंबर १९६३ रोजी तिथून पहिलं यान यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आलं.”
“पण सर्वसामान्य भारतीयांना अंतराळसंशोधनाचा काय फायदा झाला?” संहिताने विचारले.
“अंतराळसंशोधनाचा फायदा सर्वसामान्य भारतीयांना कसा होऊ शकेल याबाबत साराभाईंनी सखोल विचार केला होता,” शाश्वत म्हणाला, “आधुनिक भारताच्या भवितव्याचा वेध घेऊन त्यानुसार त्यांनी अनेक योजना आखल्या. मानवनिर्मित उपग्रह वापरून भारतातल्या खेड्यापाड्यांपर्यंत चित्रवाणीप्रक्षेपण उपलब्ध करून देत विज्ञान-तंत्रज्ञानाची गंगा सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रकल्प त्यांनी आखला. हवामानाचा वेध घेण्यासाठी उपग्रहांचा उपयोग कसा करता येईल, याचा आराखडाही त्यांनी बनवला. आर्यभट उपग्रह सोडण्याची योजनाही त्यांनी बनवली. तसंच, अंतराळसंशोधनासाठी आपल्या देशातल्या तरुणांना आकर्षित करून त्यांना उत्तम मार्गदर्शन आणि संशोधनाच्या संधीही साराभाईंनी उपलब्ध करून दिल्या. अशाच तरुणांपैकी एकजण म्हणजे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कलामांनी अंतराळसंशोधनाचा विकास आपल्या देशाच्या संरक्षणासाठीही केला.”
“विज्ञान-संशोधक असणाऱ्या साराभाईंनी अहमदाबादच्या आयआयएमच्या उभारणीला कसा काय हातभार लावला?” अर्णवने विचारले.
“देशातल्या तंत्रज्ञानाच्या विकासात उद्योजक किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे कुटुंबाच्या व्यवसायांमुळे साराभाईंच्या लक्षात आलं,” अमना सांगू लागली, “तंत्रज्ञान आणि उद्योग हे एकेकटे विकसित होणार नाहीत, हे लक्षात घेऊन उद्योगांचा सुयोग्य विकास होण्यासाठी उत्तम व्यवस्थापक निर्माण व्हायला व्हावेत म्हणून त्यांनी आयआयएम म्हणजे ‘भारतीय व्यवस्थापन संस्थे’च्या उभारणीत विशेष रस घेतला. भारतातल्या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही संस्था आज अग्रगण्य मानली जाते. त्यांच्या या कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून तिथल्या वाचनालयाचं ‘विक्रम साराभाई वाचनालय’ असं नामकरण करण्यात आलं आहे. अशा इतरही अनेक संस्थांच्या उभारणीत साराभाईंचा सिंहाचा वाटा आहे. हैदराबादची इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन, जदुगुडाची युरेनियम कार्पोरेशन, कल्पक्कमचा फास्ट ब्रिडर टेस्ट रिॲक्टर, कोलकात्याचा व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन अशी कितीतरी नावं सांगता येतील.”
“भारताची आर्थिक स्थिती बिकट असताना अशा संस्था उभारणं हे आर्थिक ताण अधिकच वाढवण्यासारखं नाही का झालं?” इराने विचारले.
“भारताची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर आपण आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करणं अपरिहार्य आहे, याची साराभाईंना खात्री होती,” सोहम म्हणाला, “या क्षेत्रांमध्ये भारतही जगातला एक अग्रगण्य देश बनला तरच तो आर्थिकदृष्ट्याही समर्थ होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी या योजना आखल्या. अणुतंत्रज्ञानाचा देशाच्या संरक्षणासाठीदेखील उपयोग करता येईल, याकडे त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून लक्ष दिलं. याचं फळ ते स्वतः पाहू शकले नाहीत तरी त्यांच्या निधनानंतर भारतानं अणुस्फोट करून जगाला आपल्या अणुसामर्थ्याची चुणूक दाखवली. किंबहुना, ज्या साराभाईंच्या दूरदृष्टीमुळे आज आपण चंद्रावर झेप घेत आहोत, त्यांचंच विक्रम हे नाव लँडरला देऊन भारतानं साराभाईंच्या जन्मवर्षांत त्यांना मानवंदनाच दिली आहे!”
मुलांनी टाळ्यांचा कडकडाट करून साराभाईंना आदरांजली वाहिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link