Next
अभंगाने भरले प्रतिसादाचे रंग
जयतीर्थ मेवुंडी
Friday, November 02 | 01:15 PM
15 0 0
Share this story

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. या सणासाठी सर्वच विविध पद्धतीने तयारी करत असतात. माझ्या कारकिर्दीत अशीच एक दिवाळी कायम लक्षात राहील. दिवाळीत दिवाळीपहाटचं महत्त्व महाराष्ट्रात अनन्यसाधारण आहे. मला जेव्हा पहिल्यांदाच दिवाळीपहाटसाठी विचारणा झाली तेव्हा खूपच आनंद झाला. पुण्यातल्या त्या मैफिलीत सुरुवातीचा सुमारे तास दीड तास मी अहिर भैरव गायला... दहा मिनिटांचं मध्यंतर झालं. चहा पीत असताना यापुढेही एखादा राग गावा असा विचार करत होता. मात्र संयोजकांचा आग्रह होता अभंग गाण्याचा... थोडंसं दडपण आलं. माझी मातृभाषा कानडी, अभंग गायचे मराठीत; तेही पुण्यात... पुण्यातल्या रसिकांची दाद कशी मिळेल हा मोठा प्रश्न होता. अखेर मी पुढच्या भागाला सुरुवात केली आणि मनातल्या मनात पं. भीमसेनजींना अभिवादन करत पहिला अभंग सुरू केला. आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. माझ्या मनावरचं ओझं थोडसं हलकं झालं...आणि मग पुढची मैफलभर पुणेकरांनी जी दाद दिली, ती मी कधीही विसरू शकणार नाही...

अनेक देश-विदेशांत आपली कला सादर करण्यासाठी जाणं होतं. तेव्हा भारतीय संगीताला मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून येतं. अगदी लंडनमध्येही भारतीय संगीताला जी दाद मिळाली, ती सुखावून गेली. विविध मैफिलींमध्ये बांगलादेशातली ढाक्यामधली मैफल मात्र वेगळ्याच कारणासाठी लक्षात राहिली आहे.
 ढाक्यातील संगीतमहोत्सवात ही मैफल होणार होती, त्याला पार्श्वभूमी होती एका बॉम्बस्फोटाची. मैफिलीच्या दोनच दिवस आधी बॉम्बस्फोटामुळे बांगलादेश हादरला होता. मी विमानतळावर पोहोचलो, तेव्हापासूनच आमच्या संरक्षणार्थ पोलिसांच्या दोन गाड्या आणि लष्कराची एक गाडी सोबत होती. हॉटेलवरही पोलिसांचा कडा पहारा होता. आता सगळी परिस्थिती लक्षात आली. यापूर्वी परदेशात अनेक मैफिली झाल्या होत्या. मात्र हा अनुभव मनावरचं दडपण वाढवणारा होता. तिथे अख्खा दिवस हॉटेलमध्ये राहून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मैफिलीसाठी जायचं होतं.

जवळपास एक अख्खा दिवस हॉटेलमध्ये राहून रियाज करायचं मनाशी ठरवल होतं. मात्र आजूबाजूची परिस्थिती चिंतेत भर घालत होती. एक दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तणाव थोडासा निवळलेला दिसला. दुपारी जेवण झाल्यावर रात्रीच्या मैफिलीची तयारी सुरू केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर आलो. परिस्थिती थोडी आश्वासक वाटत होती. मात्र हॉटेल ते मैफिलीचं ठिकाण हा प्रवास पुन्हा त्याच सुरक्षारक्षकांच्या गराड्यात सुरू झाला.

 मैफिलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर पाहिलं तेव्हा मात्र संगीताची ताकद दिसली. सुमारे ४० ते ४५ हजार रसिक मैफिल ऐकण्यासाठी उपस्थित होते. मैफल सुरू झाली आणि रसिकांची दाद मिळायला लागली. प्रत्येक तानेगणीक उत्फूर्त प्रतिसाद होता. हे अनुभवताना विमानतळावर उतरल्यानंतर आणि अख्खा एक दिवस हॉटेलमध्ये थांबल्यानंतर जो अनुभव आला होता, जे दडपण होतं ते का आलं होतं असा प्रश्न मनाला सतत पडत राहिला. संगीतानं मनं जिंकली होती. बरं एवढ्यावरच हे सगळं थांबलं नव्हतं. तिथे आणखी एक सुखद धक्का होता. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत ऐकणाऱ्यांची एक परंपराच तिथं आहे. भूगोलाच्या नकाशावर हा प्रांत बांगला असला तरी सांस्कृतिक आलेखात अगदी भारतीय होता.. टाळ्यांना भाषा नसतेच पण बांगलादेशच्या रसिकांच्या दादेला आवाज होता तो आपला, अगदी नेहमीसारखाच. या महोत्सवात फक्त ऐकणाऱ्यांचीच नाही तर सादर करणाऱ्यांचीही एक परंपरा आहे. महाराष्ट्रात जसा सवाईगंधर्व महोत्सव प्रतिष्ठेचा तशीच बांगलादेशातही या महोत्सवाची शान. त्यामुळे अगदी लहान वयातील तयारीचे कलाकार इथे कला सादर करतात. त्यालाही तितकीच उत्फूर्त दाद इथले रसिक देतात. या मैफिलीनं एवढंच दिलं का? तर नाही. या लहान कलाकारांना कला सादर करताना पाहून आपणही भारतात काही सुरू करुया असा एक विचार मनात आला. ‘स्वरतीर्थ’ या उपक्रमातून आम्ही आधीपासूनच नवीन कलाकारांना दिग्गजांसोबत कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देतच होतो. मात्र या मैफिलीनंतर आम्ही विशेषत्वानं लहान वयातील कलाकारांना संधी देण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. रसिकहो, आजपर्यंत अनेक मैफिली केल्या. देशात केल्या, विदेशात केल्या, छोट्याशा गावापासून अगदी मोठ्यामोठ्या शहरांत केल्या. प्रत्येक मैफिलीनंतर रसिकांची मिळणारी दाद आणि उत्साह आमचा आत्मविश्वास वाढवते. बांगलादेशच्या मैफिलीनंतर मात्र वेगळंच काही गवसलं होतं. अनेक मैफिलींनंतर फोटो काढण्यासाठी रसिक गर्दी करतात. तशी इथेही झाली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव असणारी बंधनं लक्षात घेऊन रसिकांनीही कुठेही स्वतःचा हिरमोड होऊ न देता थोडक्यात समाधान मानलं.

‘स्वरतीर्थ’मधून आम्ही आमच्या गुरूंना आदरांजली वाहण्याचा, त्याचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पुढे जाऊन बांगलादेशमध्ये या महोत्सवाचं आयोजन केलं जातयं... आणि हे सगळं शिवधनुष्य एकट्या व्यक्तीनं पेललयं... हीच आमची प्रेरणा ठरतील... अशा मैफिली खरंच खूप काही देऊन जातात.n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link