Next
हत्तीचं घर
आनंद शिंदे
Friday, June 21 | 04:00 PM
15 0 0
Share this story


गेली काही वर्षं हत्तींच्या अभ्यासामुळे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. त्यामध्ये हत्तीनं मला त्याचं घर दाखवण्याचा अनुभव सगळ्यात वेगळा होता. मला आठवतंय, जंगलामध्ये सगळ्या माहुतांनी आपापले हत्ती चरायला नेले होते. जयश्रीसोबत मी चाललो होतो. सहसा पायवाट सोडून हत्ती बाजूला झाले की माहुत त्यांच्यावर लक्ष ठेवून एखाद्या खडकावर बसत असत. मी मात्र त्यांच्यासोबत न थांबता हत्तीबरोबर जंगलात जाणं पसंत करायचो. बऱ्याचदा असं होतं की आता जंगल संपलं असं वाटायचं; पण समोरच्या वेली बाजूला करून जयश्री मला जंगलातल्या अजस्र विश्वात घेऊन जायची. अगदी थंड, शांत, ओलसर वातावरण आणि कितीतरी पक्षी!
जंगलात वाघ आला तर हरीण, माकड, पक्षी हाकारे देतात आणि धोक्याची सूचना करतात. मग आपल्यालाही वाघ आला हे कळतं. परंतु हत्तीचे संबंध सगळ्यांसोबत मैत्रिपूर्ण असल्यानं त्यांना धोका नाही की हाकारे नाहीत. त्यामुळे जंगलात अगदी बाजूच्या झुडूपात हत्ती आला तरी कळत नाही. हत्तीनं निवडलेली जागा अत्यंत पोषक आणि अन्नपाण्यानं भरलेली असते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासदौऱ्यात प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मानवी वस्तीजवळ हत्तीचा वास होता. परंतु हत्तीनं स्वत:साठी निवडलेल्या अधिवासामध्ये थंडावा जास्त होता. तापमानातील फरक अगदी पाच अंशांचा होता. तिथे ओलसरपणा पावलापावलावर जाणवत होता. झाडी इतकी गर्द की एखाद्यानं जाण्यासाठी दहा वेळा विचार करावा. एखाद्यानं जाण्याचं धाडस केलंच तर परतताना हमखास चुकणार किंवा हत्ती मागे लागला तर छाती धडपडणार. बरं तुम्हाला शंकाही येणार नाही की एवढ्या छोट्या जागेतून हत्ती ये-जा करू शकतो. कारण आपण हत्तीच्या वरच्या मोठ्या अंगाचा विचार करत असतो आणि हत्ती मात्र आपले पाय यातून जातात ना, याचा विचार करतो. वरच्या अंगाला असलेली झाडी बाजूला सरली जाते आणि पुन्हा सरळ होते.
मुबलक खाद्य असणं ही हत्तीच्या घराची ठळक बाब आहे. हत्ती काय काय खातो हे बघितलं तेव्हा चक्रावूनच गेलो. आपल्याला माहीत असतं ते गवत आणि केळी. कारण पूर्वी हत्ती शहरात चालत असत तेव्हा यापेक्षा जास्त आपण काही देऊ शकत नसू. मात्र हत्ती चक्क लाकूड खातो आणि पचवतोदेखील. गवत जंगलात असतंच, त्याबरोबर बांबू खाणंदेखील त्याला आवडतं. फणसाची झाडं म्हणजे त्याच्यासाठी मेजवानीच. खालचे फणस खाऊन झाले की अगदी दोन पायांवर उभं राहून वरचे फणस काढण्याचा प्रयत्न करणारा हत्ती बघणं ही मोठी मौज असते. त्यावेळी त्याचे पुढचे दोन पाय हवेत ठेवून तो सरळ उभा असतो. खाण्याच्या बाबतीत आवडीनिवडी असल्या तरी हत्ती पोट भरण्यासाठी मिळेल ते अन्न खाणं पसंत करतो. मोठं कलिंगड म्हणजे हत्तीसाठी दोन घास. जंगलामध्ये फिरताना मध्ये जी झाडं लागतील ती खात हत्ती पुढे जात असतो. बऱ्याचदा झाडाची वर आलेली मुळंही तो आवडीनं खातो.
नदीकाठी फिरताना चिखलात सोंड घालून काहीतरी शोषून घेताना हत्तीला बघाल तेव्हा तो चिखल खातो आहे, असं समजू नका. कारण हत्ती त्या चिखलातील असे क्षार शोषून घेतो, की ज्यामुळे त्याची मिठाची गरज पूर्ण होते. आपल्या उच्च कोटीच्या बुद्धीमुळे हत्ती शेतही खाताना दिसतो, कारण दहा ठिकाणी फिरण्याऐवजी खत टाकून पोषक झालेलं शेत तो पसंत करतो. त्यात ऊस, भातशेती किंवा बाजरीचं गवत असलं तर ते त्याला जास्त प्रिय असल्याचं लक्षात आलं आहे.
आपल्या घरात आपल्याला खेळ उपलब्ध असतील, याची काळजी हत्ती घेतो. नदीच्या रूपात मोठा स्विमिंग पूल असतोच. पूर्वी झिम्बाब्वेमध्ये दोन हत्ती पोहत होते. त्यांच्यावर  वनखात्यानं नजर ठेवली तर ते चक्क तीस-पस्तीस तास पोहत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पाणथळ भागात असणाऱ्या सुसरी, हत्तींचा कळप आल्यावर नक्कीच पळून जात असतील, कारण आपण जसं चेंडूनं खेळतो ना, तसंच हत्ती चक्क सुसरीसोबत खेळतो. सुसरीची शेपूट सोंडेत पकडून तिला हवेत उडवतो किंवा दुसऱ्या हत्तीकडे फेकतो.


आजरा भागात फिरताना एक वेगळा अनुभव आला. तिथे हत्तीनं जंगलात एक सपाट जमीन शोधली होती. त्यानं अगदी मधोमध खड्डा करून त्यात एक ओंडका उभा ठेवला होता. खेळायच्या वेळी तो ओंडका सोंडेत पकडून तो गोल फिरत असे. त्याच गावात आपल्या येण्याजाण्याची वर्दी देण्यासाठी हत्तीनं गावातील पाण्याचा एक ड्रम टेकडीवर नेला होता. गावात शिरायच्या आधी तो ड्रम वाजवून आपण येणार असल्याची वर्दी हत्ती देत असे. आपल्या घरात चिखलात खेळताना आपल्याबरोबरच्या हत्तींची तो करत असलेली टिंगल बघण्यात भलतीच मजा असते.
बघितलं, किती सुंदर घर असतं हत्तींचं? मानवी आक्रमणामुळे ते त्यांच्या घराला मुकतात. निसर्गचक्रात राहून तो आपली इतकी काळजी घेतो, तर आता आपण त्याचं घर वाचवायला हवं ना? त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तुम्ही साथ द्याल ना आम्हाला? तुमच्यासाठी नको, आमच्यासाठीही नको. हत्तीसाठी... आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link