Next
यॉर्करबहाद्दर
अमित मधुकर डोंगरे
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज ‘रथगामा एक्स्प्रेस’ यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. आपल्या राऊंड आर्म शैलीमुळे पदार्पणापासूनच चर्चेत असलेल्या मलिंगाने महान गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले होते. 

चमिंडा वासच्या निवृत्तीनंतर मलिंगाच्याच खांद्यावर श्रीलंकेच्या संघाची धुरा होती, विशेष करून डावातील अखेरच्या षटकांमध्ये सातत्याने यॉर्कर चेंडू टाकून फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्याची त्याची क्षमता खूपच नावाजली गेली. त्याने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले होते. त्याच्या पदार्पणानंतर अनेकदा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर शंका घेण्यात आल्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडेदेखील अनेक संघांनी आक्षेप नोंदविले होते. मात्र क्रिकेटतज्ज्ञांनी केलेल्या तपासणीनंतर त्याच्या बाबतचे सगळे अडथळे दूर झाले होते. जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहचा उदय होण्यापूर्वी मलिंगा हा एकच वेगवान गोलंदाज होता की तो सातत्याने यॉर्कर चेंडू टाकण्यात माहीर होता. एकदिवसीय मर्यादित षटकांच्या सामन्यातील एक महान गोलंदाज म्हणून त्याचा नेहमीच उल्लेख होईल यात शंका नाही. 

पाकिस्तानच्या वसिम अक्रम याच्याप्रमाणेच स्विंगिंग यॉर्करवर बळी घेण्यात त्याची हातोटी होती. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत दोन वेळा हॅटट्रिक घेणारा मलिंगा जागतिक क्रिकेटमधील एकमेव गोलंदाज आहे. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांत तीन वेळा हॅटट्रिक करणारा मलिंगा एकमेव गोलंदाज आहे. त्याने सलग चार चेंडूंवर चार बळी घेण्याची किमया साधली होती, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. २०११ साली त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, कारण त्याला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील आपली कारकीर्द लांबवायची होती. आयसीसीच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचा तो राजदूतदेखील होता. एकेकाळी ज्याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतले गेले त्याच्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब ठरली. जुलैमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर त्याने निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्याने जागतिक क्रिकेटला अलविदा केला. पुढील काळात आयपीएल तसेच जागतिक स्तरावरील विविध देशांकडून आयोजित टी-२० स्पर्धेत आणखी काही काळ खेळत राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या इतिहासात सर्वात जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. २०१४  साली जेव्हा श्रीलंका संघाने टी-२० विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धा जिंकली तेव्हा त्यात मलिंगाच्या नेतृत्वाचा मोठा वाटा होता. तसेच, २००७  साली मुख्य विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत २००९ व २०१२ च्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागल्यानंतर त्याने टी-२० संघाचे नेतृत्व सोडले होते. 

तीस आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळताना त्याने बळींचे शतक पूर्ण केले. २२६  एकदिवसीय सामने खेळताना त्याने भारताच्या अनिल कुंबळेला मागे टाकताना ३३८ बळींची नोंद केली. ७३ टी-२० सामन्यांतून त्याने ९७ बळी मिळविले आहेत. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर खूपच नर्मविनोदी शेरा मारताना त्याला स्लिंगा मलिंगा असेही संबोधले जात होते. श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चंपक रमानायके याने मलिंगाची गुणवत्ता ओळखली व त्याला प्रशिक्षण दिले. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव रिर्चड्स याने अरविंद डिसिल्व्हानंतर श्रीलंकेला मलिंगाच्या रूपाने एक महान खेळाडू मिळाला असे कौतुकोद्गार काढले होते. २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अंजलो मॅथ्युजबरोबर नवव्या गड्यासाठी त्याने विक्रमी १३२ धावांची भागीदारी केली होती. मलिंगाची ही अर्धशतकी खेळी एक विक्रमच ठरली होती. 

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मलिंगा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. मलिंगा संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू व गोलंदाज असल्याचे सांगत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मलिंगाचे कौतुकही केले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १७९ बळी घेतले असून आता तो संघाच्या गोलंदाजीचा प्रशिक्षकदेखील आहे.  

श्रीलंका संघाकडून आजवर जितके वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले त्यात मलिंगाने आपले नाव जास्त उंचावले आहे. त्याची गोलंदाजीची आश्चर्यकारक शैली कायमच चर्चेत राहिली असली तरी त्याची अचूकता व फलंदाजाच्या पायाचा अंगठा फोडणारा त्याचा तो अचूक यॉर्कर आणि असा चेंडू टाकण्याचे त्याचे सातत्य क्रिकेटरसिकांना नेहमीच कुतूहलाची बाब ठरली. मलिंगाच्या निवृत्तीमुळे श्रीलंकेचा बळी घेणारा एक प्रमुख गोलंदाज आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. इतकेच कशाला तर जागतिक क्रिकेटमध्ये सातत्याने यॉर्कर चेंडू टाकण्याची क्षमता असलेला मलिंगा निवृत्त झाल्यामुळे श्रीलंका संघाची गोलंदाजी लंगडी झाली आहे. अनेक खेळाडूंचे वारसदार मिळतात, मात्र यॉर्करवर हुकमत असलेल्या मलिंगाचा वारसदार मिळणे खूपच कठीण आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

कुंबळे-मलिंगा योगायोग
भारताचा महान लेगस्पिन गोलंदाज अनिल कुंबळे याच्याबाबत एक अनोखा योगायोग आहे. कुंबळेने आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळताना बर्म्युडा संघाविरुद्ध ९.१ षटकांत ३८ धावांच्या मोबदल्यात तीन बळी मिळविले होते. मलिंगानेदेखील आपल्या अखेरच्या सामन्यात ९.४ षटके टाकताना ३८ धावांत तीन बळी मिळविले. या जोरावर मलिंगाने कुंबळेच्या एकदिवसीय सामन्यांत ३३७  बळींच्या कामगिरीला मागे टाकत ३३८ बळींची नोंद केली.

डेथ ओव्हर्सचा राजा
एकदिवसीय सामन्यांत अखेरच्या हाणामारीच्या म्हणजेच डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर चेंडू टाकून फलंदाजांना वेगाने धावा घेता येऊ नयेत याचे कसब मलिंगाकडे होते. कोणताही संघ या अखेरच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यासाठी आक्रमक फलंदाजी करत असतो. याच षटकांत सातत्याने यॉर्कर चेंडू टाकून फलंदाजांना जखडून ठेवण्यात मलिंगाचा हात कोणीच धरणार नाही. मलिंगाने जितके बळी मिळविले आहेत तेदेखील याच डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करून.

स्लिंगा मलिंगा
विस्डेनच्या एका समीक्षकाने मलिंगाच्या गोलंदाजीची शैली पाहून त्याला ‘स्लिंगा मलिंगा’ हे नवे टोपणनाव दिले. ‘स्लिंगा’ म्हणजे गिलवर किंवा गोफण. मलिंगा गोलंदाजी करताना राऊंड आर्म पद्धतीने करतो, साधारण त्याच पद्धतीने पिकावरील पक्षी उडविण्यासाठी शेतकरी गोफण चालवतो. मलिंगाचे हे नवे टोपणनाव केवळ त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर खुद्द मलिंगालादेखील आवडले होते.

परिस्थितीशी झगडा
गॅले गावापासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रथगामा या गावात मलिंगाचा जन्म झाला. याच गावात तो आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळायचा. त्याच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील गॅलेतील बस डेपोमध्ये कामाला होते. मलिंगाचे एकूण तीन शाळांमध्ये शिक्षण झाले. शिक्षणासाठीदेखील ज्या शाळेची फी कमी आहे अशा शाळा निवडाव्या लागल्या. मात्र क्रिकेटने त्याला यश दिले, आर्थिक सुबत्ता दिली व त्याने आपल्या कुटुंबाला एक उत्तम व भरभराटीचे आयुष्य दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाल्यानंतर काही वर्षांनी त्याने तान्या परेरा हिच्याशी विवाह केला. 

पदार्पण गाजले
मलिंगाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण गाजले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४  साली झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने सहा बळी मिळविले. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज अडम गिलख्रिस्ट याच्याशी त्याची चांगली मैत्री झाली. गिलीने मलिंगाला या सामन्याची आठवण म्हणून एक यष्टी भेट दिली. सातत्याने १४०-१५० किलोमीटरच्या वेगाने चेंडू टाकून त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले. शॉर्टपीच बाऊन्सर, स्लोअर वन, लेग कटर आणि अफलातून स्विंगिंग यॉर्कर ही त्याची शस्त्रे होती. 

दुखापतींनी त्रस्त
मलिंगाच्या कामगिरीला २०१६ सालापासून ग्रहण लागले. कधी पाठदुखी, गुडघेदुखी तर कधी घोट्याच्या दुखापतींमुळे त्याला अनेक सामन्यांतून माघार घ्यावी लागली. याच दुखापतींना कंटाळून त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याला कसोटीपेक्षा एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये जास्त रुची होती.
कर्णधार म्हणून संमिश्र यश

२०१२ मध्ये मलिंगाकडे टी-२० सामन्याच्या कर्णधारपदाची सूत्रे देण्यात आली. दिनेश चंडीमलवर बंदी घातल्यामुळे टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी मलिंगाला कर्णधार बनविण्यात आले. त्यानंतर मात्र मलिंगाला सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागल्याने त्याने कर्णधारपद सोडले. २०१४ ची स्पर्धा त्याने अप्रतिम कामगिरी करून संघाला जिंकून दिली. त्याची वैयक्तिक कामगिरी सरस होत असतानादेखील सांघिक कामगिरी मात्र अत्यंत सुमार होत होती, त्यामुळे त्याने नवोदित खेळाडूकडे नेतृत्व द्यावे, अशी श्रीलंका क्रिकेट मंडळाला विनंती केली व कर्णधारपद सोडले.

गायिकेचा आरोप
श्रीलंकेचा विश्वकरंडक विजेत्या संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्यावर भारतीय विमानसेवेतील कर्मचारी असलेल्या एका महिलेने जसा लैंगिक शोषणाचा आरोप केला होता तसाच आरोप मलिंगावरदेखील झाला होता. चिन्मयी श्रीपदा या प्रसिद्ध गायिकेने मलिंगावर हा आरोप केला होता. मलिंगाने हे आरोप फेटाळून लावले होते. या घटनेमुळे मलिंगाची प्रतिमा जागतिक क्रिकेटमध्ये मलिन झाली होती. या प्रकरणातील वास्तव कधीच उजेडात आले नाही, मात्र मलिंगाला चाहत्यांच्या तसेच काही सामाजिक संस्थांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

नो-बॉलचा वाद
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू आणि मुंबई यांच्यातील सामन्यात बंगळुरूला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर सात धावांची गरज होती. लसिथ मलिंगाने टाकलेला सामन्यातील अखेरचा चेंडू नो-बॉल असल्याचे पंच एस.रवी यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे मुंबईचा विजय झाला. जर रवी यांच्या लक्षात आले असते तर बंगळुरूला नोबॉलची एक धाव मिळाली असती तसेच फ्री-हिटचा एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळाला असता व विजयाची संधी निर्माण झाली असती, मात्र हे घडले नाही. पंचांच्या चुकीचा लाभ मलिंगाला तसेच मुंबईलाही झाला. क्रिकेटविश्वात मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.

हेअर स्टाईलची चर्चा
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हेअर स्टाईलची जशी चर्चा रंगली होती तशीच मलिंगाच्या हेअर स्टाईलचीदेखील चर्चा चांगलीच रंगली होती. कुरळे केस आणि त्याला विविध रंगांची छटा त्यामुळे मलिंगावर अनेक विनोददेखील त्यावेळी निर्माण झाले होते. पक्ष्यांचे घरटे असेदेखील त्याला संबोधले जात होते.

सचिनकडून प्रशंसा
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील मलिंगाचे कौतुक केले. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा मलिंगा जगातील प्रत्येक वेगवान गोलंदाजासाठी आदर्श आहे, असे सांगत सचिनने मलिंगाला त्याच्या कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणूनही मलिंगाने काम केले होते, त्यावेळी सचिनने त्याची प्रशंसा केली होती. त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतरदेखील सचिनने त्याच्या भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.  

क्रीडामंत्र्यांवरची टीका भोवली
श्रीलंका संघाला २०१७  च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेटस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविता आले नाही म्हणून श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासीरी जयसेकरा यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर टीका केली होती, त्यावेळी मलिंगा कर्णधार होता. या टीकेला उत्तर देताना मलिंगाने जयसेकरा यांची तुलना खुर्ची उबवणारा मंत्री तसेच बडबड करणारे एक माकड अशी केली होती. यामुळे मलिंगाची चौकशी झाली होती व कोणतीही कारवाई न करता केवळ समज देऊन या वादावर पडदा टाकण्यात आला होता. मात्र त्याच्याशी झालेला करार संपुष्टात आणण्याबाबत श्रीलंका क्रिकेट मंडळाने इशारा दिला होता.

चेंडूचे चुंबन
मलिंगाच्या अंधश्रद्धेचीदेखील खूप चर्चा रंगायची. षटकातील प्रत्येक चेंडू टाकण्यापूर्वी तो चेंडूचे चुंबन घ्यायचा. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरही सातत्याने आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, आयसीसीच्या गोलंदाजीच्या शैलीची तपासणी करणाऱ्या समितीने त्याची शैली तपासल्यानंतर त्याला ग्रीन सिग्नल दिला होता. गोलंदाजाचा गोलंदाजी करणारा हात व कोपर पंधरा डिग्रीपेक्षा जास्त वाकत असेल तर त्या गोलंदाजाची शैली नियमबाह्य असते, मात्र मलिंगा नियमानुसारच गोलंदाजी करतो असा निर्वाळा समितीने दिला व त्याच्या शैलीबाबतचे वाद संपले.

सेक्सी 
बार्बाडोस येथील एका मासिकाने केलेल्या पाहणीत मलिंगाला जागतिक क्रिकेटमधील सेक्सी खेळाडू जाहीर केले होते. संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतलेला मलिंगा मॉडेलिंगच्या क्षेत्रातदेखील खूप नाव कमावेल, असेही या मासिकाने वर्तविले होते. मलिंगाकडे अनेक उत्पादनांच्या जाहिरातींचे करार होते, इतके करार असणारा मलिंगा श्रीलंकेचा एकमात्र खेळाडू होता.

डबल हॅटट्रिक
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात तीन हॅटट्रिक घेणारा मलिंगा जगातील एकमेव वेगवान गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २००७ च्या विश्वकरंडकातील सामन्यात मलिंगाने सलग चार चेंडूंवर चार फलंदाजांना बाद करत डबल हॅटट्रिक करण्याचा विक्रम साकार केला. त्याने ऑस्ट्रेलिया, केनया आणि बांगलादेश यांच्या विरुद्धदेखील हॅटट्रिक नोंदविली होती. बांगलादेशविरुद्धची हॅटट्रिक टी-२० सामन्यात केली होती. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link