Next
विज्ञानसाहित्यविषयक कोश
निरंजन घाटे
Friday, May 03 | 04:00 PM
15 0 0
Share this story

इंग्रजीत ज्या साहित्यप्रकाराला सायन्स फिक्शन किंवा अलिकडे स्पेक्युलेटिव्ह फिक्शन असं म्हणतात, त्या साहित्यप्रकाराला मराठीत विज्ञानसाहित्य असं म्हणतात. इंग्रजीमध्ये सायन्स फिक्शनला अलिकडे स्पेक्युलेटिव्ह फिक्शन असं म्हणू लागले आहेत. याचं कारण विज्ञानसाहित्यावर असलेला अमेरिकी लेखकांचा प्रभाव. इतरत्रही विज्ञानकथा लिहिली जाते, अगदी फ्रेंच, रशियनं, पोलिश, जपानी, ऑस्ट्रेलियन, भारतीय इत्यादी भाषांमध्ये विज्ञानसाहित्याची निर्मिती होते, परंतु अमेरिकीतील विज्ञानसाहित्यातील निर्मिती व त्याचं वाचन, शिवाय त्या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल याची इतर देशांतील विज्ञानसाहित्याशी तुलना केली तर तो एक विनोद ठरेल. याचं कारण या इतर सर्व देशांतील विज्ञानसाहित्य हे अमेरिकेतील विज्ञानसाहित्यापुढे खुजं ठरतं.

सर्वसाधारणपणे विज्ञानसाहित्याच्या क्षेत्रातील घडामोडी या विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती भविष्यकाळात कशाप्रकारे झालेली असेल, या प्रगतीचा मानवी जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडेल, त्या प्रगतीचे समाजावर व त्या समाजाचा प्रमुख घटक म्हणजे माणूस यांच्यावर कसा प्रभाव असेल आणि त्याचे परिणाम काय होतील, याचा अंदाज बांधतात, म्हणून त्यांना स्पेक्युलेटिव्ह फिक्शन किंवा भविष्यवेधी कथा असं म्हटलं जातं. या कथांसंबंधीचे अनेक कोश इंग्रजीत रचलेले आहेत. यातील कथा या शब्दांत कथा, कादंबरी आणि सर्व प्रकारची विज्ञानाधिष्ठित सर्जनशील साहित्यनिर्मिती अध्याहृत आहे. मराठीत विज्ञानसाहित्याला पर्यायी संज्ञा म्हणून ‘विज्ञानकथा’ असा शब्दप्रयोग बऱ्याच वेळा केला जातो, म्हणून हा खुलासा.

विज्ञानसाहित्याच्या संबंधीचे हे कोश वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक म्हणजे विज्ञानसाहित्य म्हणजे काय याची व्याख्या प्रस्तावनेत करून मग आकारविल्हे विज्ञानसाहित्य आणि विज्ञानसाहित्याचे जनक यांची सचित्र माहिती देणारे कोश. यातला ज्याला आद्य विज्ञानसाहित्यकोश म्हणता येतील असा कोश म्हणजे पीटर निकोल्स यानं रचलेला ‘द एनसायक्लोपिडिया ऑफ सायन्स फिक्शन.’ हा कोश रचण्यात निकोल्सला जॉन क्लूटनं साहाय्य केलं. हा कोश १९८१ साली प्रसिद्ध झाला होता, त्यामुळे त्यात विज्ञानसाहित्यक्षेत्राच्या संबंधीची १९७८ सालपर्यंतची माहिती तेवढीच वाचायला मिळते.

या कोशात अनेक फँटसी म्हणजे अद्भूत कथांच्या लेखकांनासुद्धा स्थान देण्यात आलं आहे. त्या लेखकांचा, विशेषत: एच.पी. लव्हक्रॉफ्ट किंवा जे. आर. आर. टोल्कीन यांचा समावेश का केला, याचं स्पष्टीकरण प्रस्तावनेतच देण्यात आलं आहे. लॉर्ड डनसानी, इ.आर. एडिसन, एच.पी. लव्हक्रॉफ्ट किंवा जे.आर.आर. टोल्कीन यांना कितीही मारूनमुटकून विज्ञानसाहित्यिक म्हणायचं ठरवलं, तरी ते शक्य नाही, पण त्यांचा बऱ्याच विज्ञानसाहित्यिकांवर, त्यांच्या लेखनावर पडलेला प्रभाव नाकारून चालणार नाही. विज्ञानसाहित्याच्या सीमारेषेवर रेंगाळणाऱ्या काही साहित्यप्रकारांच्या समावेशाबद्दल संपादकमंडळात बरीच चर्चा झाली. कालौघात हरवलेल्या जमाती, कालौघात विस्मृतीत गेलेले भूप्रदेश किंवा विशिष्ट भूरचनेमुळे जगाला अज्ञात अशा जागा (लॉस्ट रेसेस आणि लॉस्ट वर्ल्ड), प्रागैतिहासिक काळाबद्दलच्या कथा, भविष्यकाळातील युद्धांचा कथा, राजकीय टीकाटिप्पणी आणि प्रचलित राजकारणावर कथा, परक्या ग्रहांवर घडणाऱ्या नायकप्रधान कथा, पारलौकिक अनुभव आणि परकायाप्रवेशाच्या कथा, या प्रकारच्या कथा-कादंबऱ्यांना आम्ही थोडंसं झुकतं माप द्यायचं ठरवलं आणि तशा प्रकारचं लेखन करणाऱ्या लेखकांनासुद्धा या कोशात दिलं जातं. मात्र त्यांच्या साहित्याची साद्यंत चर्चा इथे शोधायचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी निराशा पडेल.

हा कोश इंग्रजीतील अक्षरांच्या आकारविल्हे रचण्यात आलेला आहे. त्यात लेखक, कथाविषयक चित्रपट, नियतकालिकं, संपादक, समीक्षक, चित्रकार, चित्रपटनिर्माते, प्रकाशक, टोपणनावे, लेखी आणि दृश्य माध्यमांतील मालिका, दूरचित्रवाणी कार्यक्रम, प्रातिनिधिक संग्रह, कॉमिक्स, वेगवेगळ्या देशांमधील विज्ञानसाहित्य, पारिभाषिक शब्द, पारितोषिकं, फॅन्शाईन्स म्हणजे चाहत्यांनी चाहत्यांसाठी चालवलेली नियतकालिकं आणि विज्ञानसाहित्याच्या संबंधीची इतर माहिती अशा गोष्टींचा समावेश आहे. लेखकांच्या बाबतीत, त्यांनी लिहिलेल्या आणि पुस्तकरूपानं प्रकाशित झालेल्या फक्त विज्ञानसाहित्याची दखल घेण्यात आली आहे. इतर प्रकारच्या पुस्तकांची इथे माहिती मिळणार नाही, अशी संपादक सुरुवातीलाच खात्री देतात. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं साल ठळक छापलं असून पुढील आवृत्त्यांची वर्षं नेहमीच्या टायपात आहेत. एकच कथासंग्रह किंवा कादंबरी दुसऱ्या नावानं छापली गेली असेल तर दुसऱ्या नावापुढे ‘vt’ असं लिहिलेलं आढळेल. या कोशातल्या प्रत्येक नोंदीखाली नोंद लिहिणाऱ्यांच्या नावांची अद्याक्षरं देण्यात आली असून सुरुवातीलाच सर्व ३५ नोंदलेखकांची यादीही दिलेली आहे, तसंच, तिथेच त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आहेच. असा हा कोश विज्ञानसाहित्याच्या अभ्यासकाला नक्कीच उपयुक्त ठरेल. १९७८ नंतरची माहिती हवी असेल तर तसेही कोश उपलब्ध आहेतच. त्या प्रत्येकाचं काही वैशिष्ट्य आहे. त्यांची इथे अगदी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

सायन्स फिक्शन- द इलस्ट्रेटेड एनसायक्लोपिडिया, संपादक-जॉन क्लुट. यातले बहुतेक विषय आधीच्या कोशाप्रमाणेच असले तरी त्यांची मांडणी थोडी वेगळी आहे. इसवी सन १८०० ते २००० या कालाखंडातील दर दहा वर्षांच्या काळात काय घडलं, हे इथे सचित्र सादर केलं आहे. डीके पब्लिकेशनचा हा कोश संदर्भ शोधण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणखी एक एनसायक्लोपिडिया ऑफ सायन्स फिक्शन, रॉबर्ट होल्डस्टॉक यांनी संपादित केला असून तो कॅथे बुक्सनं प्रकाशित केला आहे. यातलं एक प्रकरण विज्ञानकथेच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ‘मॅरेज ऑफ सायन्स अँड फिक्शन.’ यातलं एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे विज्ञानसाहित्यात विज्ञानाला महत्त्व आहे, हे निस्संशय, पण त्यात मानव हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे, हे हळूहळू अधोरेखित होऊ लागलं आहे. विज्ञानसाहित्य हे या बाबतीत इतर साहित्यप्रमाणेच असतं. ‘द व्हिज्युअल एनसायक्लोपिडिया ऑफ सायन्स फिक्शन’ हा आणखी एक महत्त्वाचा कोश. तो ब्रायन अॅश यांनी संपादित केला असून त्याच्या मुखपृष्ठावरच त्यात कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत यांची यादीच आहे. कन्सेप्ट्स, थीम्स, बुक्स, मॅग्ज, कॉमिक्स, फिल्म्स, टीव्ही, रेडिओ, आर्ट, फॅन डम्, कल्ट्स/पर्सनल कॉमेंटरिज बाय द ग्रेटेस्ट नेम्स इन एस.एफ. रायटिंग. हार्मनी बुक्सनं हा कोश प्रकाशित केला आहे.

पीटर निकोल्सनं ‘द सायन्स इन सायन्स फिक्शन’ नावाचा आणखी एक कोश निर्माण केलाय. त्याचं उपशीर्षक आहे. ‘डझ सायन्स फिक्शन फोरटेल द फ्युचर?’ यासंबंधीची अनेक उदाहरणं विषयवार या कोशात आहेत. अवकाश, ऊर्जा, परग्रहवासी, शक्यतेच्या उंबरठ्यावर, कालप्रवास आणि पर्यायी/समांतर विश्वं, विश्वसंहार- मानवी कारणे आणि नैसर्गिक कारणे, बुद्धिमान यंत्रं/यंत्रमानव, माणूस आणि महामानव/बृहतमानव, भविष्यकाळ- आशा आणि निराशा, मनाची शक्ती/परामानसशक्ती, पूर्वी परग्रहवासी येऊन गेले का? ही यातील प्रकरणांची यादी. यातलं एक वाक्य महत्त्वाचं- भविष्यकथनं हे विज्ञानसाहित्याचं काम नाही. विज्ञानसाहित्यातल्या जितक्या कल्पना खऱ्या ठरल्या आहेत, कदाचित त्यापेक्षा अधिक कल्पना खोट्या ठरल्या आहेत.

‘सायन्स फिक्शन हँडबुक फॉर रीडर्स अँड रायटर्स’ हा खरं तर एक उत्कृष्ट शब्दकोश आहे. त्यात विज्ञानसाहित्याशी संबंधित १००० हून अधिक शब्दांचं स्पष्टीकरण आणि व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. विज्ञानसाहित्य प्रकाशित करणाऱ्या इंग्रजी प्रकाशकांची यादी, एक हजार शाश्वत विज्ञानसाहित्यकृतींची नावं, विज्ञानसाहित्यातील मध्यवर्ती कल्पना, पात्रांची उभारणी आणि गुंफण इत्यादी माहिती इथे एकत्र वाचायला मिळते. जॉर्ज एस. एलारिक हे या कोशाचे रचयिते आहेत. यातली बरीच चित्रं नासानं पुरवलेली आहेत, तर काही चित्रं जुन्या कॉमिक्समधून घेतलेली आहेत.

या कोशाची प्रस्तावना ‘हू रीड्स इट?’ या प्रश्नानं होते. वाचकांच्या सर्वेक्षणात ‘सुशिक्षित, पंचविशीच्या पुढचे पुरुष वाचक’ हे उत्तर मिळाले, पण जेव्हा विज्ञानकथा आणि फक्त विज्ञानसाहित्याचे सर्व प्रकार आणि तत्संबंधित इतर वस्तू, सिनेमाची पोस्टर्स, सिनेमातील व्यक्तिरेखांच्या बाहुल्या, यानांचा प्रतिकृती आदी गोष्टी विकणाऱ्या दुकानातल्या ग्राहकांची पाहणी केली तेव्हा आलेलं उत्तर वय वर्षं ८ ते ८० मधील सर्व स्तरांतील स्त्री-पुरुष, शाळकरी विद्यार्थ्यांपासून नासासह इतर संस्थांमधील शास्त्रज्ञांपर्यंत सर्व स्तरांतले अल्पशिक्षित ते उच्चशिक्षित असे होते. मिळालेली ही माहिती अमेरिकेपुरती मर्यादित आहे, हे लक्षात घ्यायला हवं. मुख्य म्हणजे साहित्यिक पुस्तकं विकणाऱ्या दुकानातूनही विज्ञानकथा-कादंबऱ्या सर्वात जास्त खपतात, असं दिसतं. विज्ञानसाहित्याच्या अभ्यासकांसाठी हे कोश खूपच उपयुक्त ठरतात, यात शंका नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link