Next
पीळदार शरीराचा पेहेलवान
अतुल साठे
Friday, January 25 | 04:00 PM
15 0 0
Share this storyगवा हा गायी-म्हशींच्या कुळातील सर्वात विशाल प्राणी म्हणून ओळखला जातो. तुकतुकीत काळपटतपकिरी कांती, प्रचंड आकार व पीळदार स्नायू हे प्रौढ नर गव्याचे डोळ्यांसमोर येणारे चित्र म्हणजे शारीरिक शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक! गवा म्हटले की अनेकांना दाजीपूरचे अभयारण्य आठवते, जे आधुनिक महाराष्ट्रातील पाहिले संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले, विशेषतः गव्यांच्या संरक्षणाकरिता. ‘बॉस गॉरस’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या प्राण्याला गौर (हिंदी/इंग्रजी), कडू येथू (कन्नड), कट्टू एरुमई (तमिळ), कटू पोथ (मल्याळम), सेलाडंग (मलायन) व प्यॉंग (बर्मीज) अशी विविध नावे आहेत. संस्कृतमधील गौ (गाय) या शब्दावरून गवा व गौर या नावांची व्युत्पत्ती झाल्याचे दिसते. गवा हा गोव्याचा राज्यप्राणी असून, बाहुबली चित्रपटात संगणकाच्या साहाय्याने दाखवलेला ‘सांड’, ज्याच्याशी भाल्लालदेव युद्ध करतो व आपल्या रथाला जुंपतो, तो गवाच होता.

‘द बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स’ या संदर्भग्रंथानुसार एखादा महाकाय नर गवा खांद्यापाशी ६ फूट ४ इंच उंच असू शकतो, तर सरासरी उंची ५ फूट ८ इंच ते ५ फूट १० इंच असते. माद्या थोड्या बुटक्या असतात. मोठा नर गवा ९०० किलोपेक्षा जास्त वजनाचा असू शकतो. गव्याला भारतीय पाळीव गायी-बैलांप्रमाणे खांद्यावर वशिंड नसते, पण खांद्यापासून पाठीच्या मध्यापर्यंत पसरलेली स्नायूंची कडा असते. नवजात गवे पिवळसर-सोनेरी असतात. वय वाढत जाते तसे त्यांचा रंग लालसर, गडद तपकिरी होत जातो. गव्यांच्या डोक्यावर पांढरट फुगीर भाग असतो, जो नरांमध्ये अधिक प्रकर्षाने जाणवतो. तसेच माद्यांपेक्षा नरांची अर्धवर्तुळाकार शिंगेही मोठी असतात. अंधारात विजेरीचा प्रकाश टाकला तर ही शिंगे चंद्रकोरीसारखी दिसतात. ब्रिटिश काळातील प्रसिद्ध शिकारी व निसर्गअभ्यासक केनेथ अँडरसनच्या कथांत रात्रीच्या वेळी कृत्रिम उजेडात गव्याच्या चमकणाऱ्या निळ्या डोळ्यांचे वर्णन वाचायला मिळते. गव्याच्या पायावरची गुडघ्याखालची पांढरी त्वचा मोजे घातल्यासारखी दिसते.

जंगलातील अधिवास
भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश (चितगाव टेकड्या), थायलंड, चीन (युनान प्रांत), कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम व मलेशियाच्या पर्वतीय आणि टेकड्या असलेल्या सदाहरित, निम-सदाहरित व पानझडी जंगलांत मुख्यत्वे गव्यांचा आढळ आहे. पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गवत, बांबूचा पाला आणि झाडाझुडपांची पाने व साली असे विपुल खाद्य या त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक बाबी आहेत. माणसांचा उपद्रव जंगलात वाढला, तर गवे मुख्यत्वे रात्री संचार करतात, अन्यथा कोणत्याही वेळी ते चरताना दिसू शकतात. भारतीय उपखंडात त्यांची संख्या सर्वात जास्त (३०,००० च्या आसपास) आहे. भारतात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ईश्यान्येकडील राज्ये, ओडिशा, मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये गवे सापडतात. दक्षिण भारतातील डोंगराळ भाग व ईशान्येकडील राज्यांतील गवे जास्त भारदस्त असतात. पूर्वी माणसाळवलेल्या किंवा पाळीव गुरे व वन्य गव्याच्या संकरातून निर्माण झालेल्या आणि ईशान्य भारत, म्यानमार व चीनच्या युनान प्रांतात सापडणाऱ्या प्राण्याला ‘गयाल’ किंवा ‘मिथुन’ असे म्हणतात.

महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत गवे सापडतात. ताडोबा अभयारण्यात गवे सहज दिसतात. महाबळेश्वरच्या विविध निरीक्षण ठिकाणी दिवसभर पर्यटकांनी खाल्लेल्या कणसांची साले खायला रात्री गवे येतात, असे स्थानिक लोक सांगतात. कोल्हापूर व सांगली शहरांत क्वचित भटकत आलेल्या गव्यांच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. कोकणात सह्याद्रीलगतच्या तालुक्यांप्रमाणेच गुहागरसारख्या किनारी तालुक्यातही गवे दिसू शकतात. पूर्वी वसई तालुक्यातही गवे दिसल्याच्या नोंदी आहेत. मात्र जंगले नष्ट झाली, विरळ झाली किंवा खंडित झाली, तेथे गवे टिकून राहू शकत नाहीत. एकीकडे गव्याचा अधिवास आक्रसून तुकड्यातुकड्यांत विभागला जातो आहे, तर दुसरीकडे असे झाल्याने गवे शेतीच्या भागात शिरण्याच्या घटनाही घडत आहेत. शिवाय आग्नेय आशियात त्यांची शिकारसुद्धा होते. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) गव्याची वर्गवारी ‘असुरक्षित’ या प्रकारात केली आहे.

संयमी गवा
प्रचंड ताकद असली तरी गवा हा तसा निरुपद्रवी प्राणी आहे. एकांडे नर क्वचित हल्ला करू शकतात, परंतु माद्या व पिल्लांसोबत कळपात असताना ते सहसा शांत असतात. कुंभार्ली घाटमाथ्यावरील रानात अचानक समोर काही अंतरावर दिसलेला असा कळप आमची चाहूल लागताच बाजूच्या दाट जंगलात पळून गेल्याचे मी अनुभवले आहे. मेळघाटच्या कोलकाज वनविश्रामगृहाजवळ रस्त्याने जाताना बाजूच्या रानात स्तब्ध उभा राहून आम्हाला न्याहाळणारा नर गवा मोठा रुबाबदार दिसत होता. गव्याची पिल्ले एकटी सापडली तर बिबट्या किंवा रानकुत्र्यांच्या टोळीचे भक्ष्य बनू शकतात, परंतु पूर्ण वाढलेल्या गव्यावर यशस्वी हल्ला फक्त वाघच करू शकतो. गव्यांच्या टोळीने एकत्र प्रतिकार केला तर वाघ त्यांचा नाद सोडून देतो. मोठ्या नर गव्याने वाघाला प्रतिहल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही क्वचित घडतात. अशा या ताकदवान व तडफदार उमद्या प्राण्याला येणाऱ्या काळात नैसर्गिक अधिवासात पाहायचे असेल तर जंगले व त्यांची सलगता राखणे नितांत आवश्यक आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link