Next
आयपीएलमध्ये कॅरेबियन तडका
भूषण करंदीकर
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

आयपीएलच्या या सीझनमध्ये कॅरेबियन खेळाडू जबरदस्त धमाका करताना दिसत आहेत. प्रत्येक टीममध्ये एक तरी कॅरेबियन खेळाडू आहे. यात अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल ते आंद्रे रसेल याचं. रसेल प्रत्येक सामन्यामध्ये तडाखेबंद खेळी करतोय. त्याच्या धमाकेदार फलंदाजीमुळे केकेआरच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अष्टपैलू म्हणून संघात असणाऱ्या रसेलने त्याच्या या कामगिरीमुळे तो संघात किती उपयुक्त आहे, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. या मोसमात त्यानं सहा सामन्यांमध्ये २५७ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं आतापर्यंत २५ षटकार लगावले आहेत. २१२.३९ च्या स्ट्राईक रेटने तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धूळधाण उडवतोय, तर गोलंदाजीमध्ये त्यानं सहा सामन्यांमध्ये पाच बळी मिळवले आहेत. २१ धावांच्या बदल्यात दोन विकेट ही त्याची जी आताच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
रसेल २०१२पासून आयपीएलमध्ये खेळतोय. आतापर्यंत तो ५६ सामने खेळला असून त्यात त्यानं ४९ बळी घेतले आहेत. २० धावांत चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर ५६ सामन्यांत त्यानं ११४७ धावांची बरसात केली आहे. त्याचा १८४.१० हा स्ट्राईक रेट आहे. नाबाद ८८ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक संघात एक तरी आंद्रे रसेल असावा, असं प्रत्येक संघमालकाला वाटतंय.
मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक म्हणजे तीन कॅरेबियन क्रिकेटपटूंना त्यांच्या संघात स्थान दिलं आहे. २०१० पासून कायरण पोलार्ड मुंबई संघासोबत आहे. गेल्यावर्षी मुंबई संघात नव्यानं दाखल झालेल्या एविन लेविस याला यंदा खेळायची संधी मिळालेली नाही. मात्र यावर्षी मुंबईसाठी सरप्राइज पॅकेज ठरला तो अल्झाररी जोसेफ. आपल्या पहिल्या मोसमात त्यानं दोन सामन्यांमध्ये १५ धाव देत सहा बळी घेतले आहेत. तर पोलार्ड हा नेहमीप्रमाणेच संघाच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आपली भूमिका चोख पार पाडतो आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर तो संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या संघात असण्यानं मोठा दिलासा मुंबई इंडियन्सला मिळाला आहे. पोली या टोपण नावानं संघात ओळखला जाणारा पोलार्ड संघासाठी कायमच निर्णायक भूमिका बजावतो. प्रत्येक मोसमात जसा तो त्याच्या बॅटने बोलतो तसाच त्यानं घेतलेला झेल प्रत्येक सीझनमध्ये चर्चेचा विषय ठरतो. २०१० पासून आतापर्यंत त्यानं १३८ सामने खेळले आहेत. त्यात १४८.२४ च्या स्ट्राइक रेटने त्यानं २६५५ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. ८३ ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. आतापर्यंत त्यांनं एकूण ७७ झेल घेतले आहेत. १३८ सामन्यांमध्ये ५६ बळी मिळवणाऱ्या पोलार्डी ४४ धावांत चार विकेट हे आतापर्यंतही सर्वोत्तम कामगिरी आहे.
असाच आणखी एक धमाकेदार खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. गेलचा तडका म्हणजे संघमालकासाठी मेजवानी असते. ११८ सामन्यांमध्ये १५१.०९च्या स्ट्राइक रेटनी गेलनं आतापर्यंत ४२१७ धावांचा पाऊस पाडला आहे. नाबाद १७५ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. या मोसमात सहा सामन्यांमध्ये त्यानं तब्बल २२३ धावा केल्या आहेत. गेल २००९पासून आयपीएल खेळतोय आणि आतापर्यंत त्यानं तब्बल ३१० षटकार ठोकले आहेत.
चेन्नईकडून खेळणारा ड्वेन ब्रावो हा असाच धमाकेदार खेळाडू आहे. तो २००८पासून आयपीएल खेळतोय‌. या मोसमात तो अजून चमकला नसला तरी खूप सामने खेळायचे आहेत. आतापर्यंतच्या १२६ सामन्यांत त्यानं १४४२ धावा केल्या आहेत, त्यातील पाच अर्धशतके आहेत. शिवाय १२६ सामन्यांत त्यानं १४३ विकेट मिळवल्या आहेत. नाबाद ७० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. अजून या सीझनमध्ये बरेच सामने बाकी आहेत. या उर्वरित सीझनमध्ये तो चेन्नई साठी चांगल्या या खेळी करेल. अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.
एकूणच आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये एक तरी कॅरेबियन खेळाडू भाव खाऊन जातो. त्यांच्यात उपजत असलेली शारीरिकक्षमता त्यांचा नैसर्गिक खेळ आणि सेलिब्रेट करण्याची एक अनोखी पद्धत यामुळे हे खेळाडू सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. क्रिकेटच्या या झटपट फॉरमॅटमध्ये हे कॅरेबियन चपखल बसलेत. वास्तविक आयपीएल खेळणाऱ्या अनेकांना कॅरेबियन खेळाडूंना फॉलो करावसं वाटतं. त्यांच्या जगण्याचा मुक्त अंदाज त्यांच्या फलंदाजीत बऱ्याच वेळा प्रतीत होतो. थोडक्यात कॅरेबियन खेळाडूंच्या तडक्याला सध्यातरी आयपीएलमध्ये पर्याय नाही. रसेल, पोलार्ड यांच्याप्रमाणे आता ड्वेन ब्रावोची खेळी पाहायला त्याचे चाहते उत्सुक आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link