Next
ऑनलाइन दुकान
अमृता दुर्वे
Friday, July 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


वर्ष १९९४,  इंटरनेट फारसं कोणाला माहीत नव्हतं. वापरणारे तर त्याही पेक्षा कमी होते. संपूर्ण जगामध्ये फक्त ०.४४७ टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा होती. त्यानंतरच्या वर्षी जेफ बेझॉस नावाच्या एका माणसाने न्यू यॉर्कमधली आपली चांगली नोकरी सोडली आणि बायकोसह सिएटलमध्ये स्थायिक होत आपल्या गॅरेजमधूनच एक कंपनी सुरू केली. तारीख होती ५ जुलै १९९५.  कंपनीचं आताचं नाव– अॅमेझॉन. मूळ नाव– Cadabra. मात्र त्या नावावरून बरेच अपभ्रंश होण्याची शक्यता आहे, असं लक्षात आलं आणि कंपनीचं नाव लगेचच बदलून ‘अॅमेझॉन’ करण्यात आलं.
त्या काळात एक ऑनलाइन स्टोअर सुरू करणं बेभरवशाचं होतं. पुस्तकं विकण्यापासून सुरू झालेला अॅमेझॉनचा हा प्रवास आता स्वतःची टेक्नॉलॉजी, गॅजेट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स विकणं, शिवाय किराण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व काही विकण्यापर्यंत आणि ते तुमच्या दारी पोहोचण्यापर्यंत झालेला आहे. अॅमेझॉनची स्वतःची व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा आहे, गाणी ऐकू देणारी सेवा आहे.  इ-बुक्सच्या क्षेत्रामध्ये अगदी पहिल्यांदा उतरणाऱ्यांपैकी एक कंपनी होती अॅमेझॉन.
काळानुसार बदलत राहणं आणि नवनवीन क्षेत्रांमध्ये उतरणं हे अॅमेझॉनचं वैशिष्टयं आहे. अॅमेझॉनची सुरुवात झाली पुस्तकं विकण्यापासून. विक्रीसाठीचा ऑनलाइन फॉरमॅट आणि भरपूर पुस्तकांचा साठा करता येईल अशी जागा यामुळे अॅमेझॉनवर विक्रीसाठी असणाऱ्या पुस्तकांमध्ये दुकानांपेक्षा जास्त वैविध्य होतं. घरबसल्या पुस्तकं खरेदी करण्याचा हा अनुभवही नवा होता. मग हळुहळू अॅमेझॉनने गाण्यांच्या सीडीज आणि डीव्हीडीज विकायलाही सुरुवात केली. इ-बुक्स जशी प्रसिद्ध होऊ लागली तशी अॅमेझॉनने या क्षेत्रात उडी घेतली. अॅमेझॉन किंडल हे इ-बुक्ससाठीच्या सुरुवातीच्या मोजक्या पर्यायांपैकी एक होतं.
हळुहळू अॅमेझॉनच्या या स्टोअरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, किचनमधल्या वस्तू, खेळणी आणि इतर गोष्टींचा समावेश झाला. पुढच्या काही काळामध्ये अॅमेझॉन ही जगातली ऑनलाइन विक्री करणारी सर्वात आघाडीची कंपनी बनली.
२००५ मध्ये अॅमेझॉनने निवडक उत्पादनांची डिलिव्हरी एक-दोन दिवसांत देणारी प्राइम सेवा सुरू केली. ही  ‘सबस्क्रिप्शन’ सेवा आहे. म्हणजे दर महिना वा दरवर्षी यासाठी काही फी भरावी लागते. पण या सेवेमुळे अॅमेझॉनवरून होणारी विक्री वाढली. आता हीच सेवा ग्राहकांना व्हिडिओ आणि म्युझिक स्ट्रीमिंगही देते.
त्याशिवाय आता एको सीरीजच्या उत्पादनांमधून अॅमेझॉनने ‘अलेक्सा’ ही व्हर्च्युअल असिस्टंट टेक्नॉलॉजी बाजारात आणली. या २५ वर्षांच्या काळात अॅमेझॉनने अनेक इतर क्षेत्रांमधल्या कंपन्या ताब्यात घेत स्वतःचा व्यवसाय विस्तारला. यामध्ये ऑडिओ बुक्स देणारी कंपनी ‘ऑडिबल’, डिजिटल कॉमिक बुक्सची ‘कॉमिक्सॉलॉजी’, ‘रिंग’ ही होम सिक्युरिटी कंपनी, ‘झॅपोज’ आणि ‘वूट’सारखे ऑनलाइन रिटेलर, ‘Twitch’ ही लाइव्ह स्ट्रीमिंग कंपनी आणि ‘होल फूड्स’ ही ऑरगॅनिक फूड चेन यांचा समावेश होता. यामुळे अॅमेझॉनच्या एकूण उलाढालीत प्रचंड वाढ झाली. २०१४ ते २०१८ काळात महसूल तिप्पट झाला आणि २३३ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोचला. नफ्यामध्ये तर त्याहीपेक्षा जास्त वाढ झाली. आणि अर्थातच याचा फायदा जेफ बेझोस यांनाही झाला. आज त्यांची संपत्ती १५९.२ अब्ज  डॉलरची असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पत्नी मॅकेन्झीशी झालेला घटस्फोट हा जगातला सर्वात मोठी पोटगी असणारा घटस्फोट ठरला. तरीही जेफ बेझोस सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. जेफ यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग हा बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनला दिला.  
ऑनलाइन रिटेलर म्हणून २५ वर्षं उलटल्यानंतर आता अॅमेझॉनने पुन्हा एकदा एक आश्चर्य वाटावं अशी गोष्ट करायचं ठरवलं आहे. ते म्हणजे अॅमेझॉन आता स्वतःची स्टोअर्स– खरीखुरी दुकानं उघडणार आहे. इथे खरेदी करण्याचा अनुभव वेगळाच असेल, असं सांगितलं जातंय.
इंटरनेटचा फायदा घेत यशस्वी होणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅमेझॉनचं नाव अग्रगण्य म्हणून घेतले जाईल, हे मात्र नक्की.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link