Next
चित्रपटांतले क्रिकेट
दिलीप ठाकूर
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story


इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या  विश्वचषक क्रिकेटस्पर्धेमुळे आपल्याकडेही वातावरण क्रिकेटमय झाले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ धमाकेदार कामगिरी करत असल्याने यंदाचा विश्वचषक भारत जिंकेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. आपल्याकडे  क्रिकेट आणि चित्रपटांचे अतूट नाते आहे. अनेक चित्रपटांत क्रिकेटचे दर्शन घडते, तर कधी क्रिकेटवर, क्रिकेटपटंूवरही चित्रपट निघाले आहेत. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुशांत  सिंह राजपूतने साकारलेला ‘एम.एस. धोनी’ चित्रपट. तसेच,  भारताने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकल्याच्या घटनेवर आधारित ‘83’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती सुरू आहे.  कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर  हिंदी चित्रपट आणि क्रिकेट यांचे नाते कसे आहे, याचा वेध या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘लव्ह मॅरेज’ (१९५९) या चित्रपटातील एका दृश्यात देव आनंद मैदानात फटकेबाजी करताना दिसतात. (त्यांच्यासाठीचे क्षेत्ररक्षण तद्दन फिल्मी आहे, बरेचसे क्षेत्ररक्षक एकाच बाजूला दिसतील. कदाचित देवसाहेबांवरचे दिग्दर्शकाचे प्रेम असल्यामुळे त्यांनी तसे केले असावे.) आणि मैदानातून त्याला प्रेक्षकांमध्ये बसलेली माला सिन्हा दिसते. आणि मग ‘एक नजर मे दिल बेचारा हो गया एलबीडब्ल्यू’ असे प्रेमगीत ते गाऊ लागतात. 

‘ऑल राऊंडर’(कुमार गौरव), ‘पटियाला हाऊस’ (अक्षयकुमार), ‘चैन कुली की मैं’ या चित्रपटांतही क्रिकेट एक पात्र म्हणून येते. देव आनंद दिग्दर्शित ‘अव्वल नंबर’मध्ये आमिर खानला हिरो क्रिकेटपटू तर आदित्य पांचोली याला व्हिलन क्रिकेटपटू म्हणून पडद्यावर दाखवले आहे. या चित्रपटाची एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. या चित्रपटाचे  चित्रीकरण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाले होते. त्यासाठी देव आनंद यांनी सिनेपत्रकारांना तेथे बोलावले.  तेव्हा ‘शूटिंगमधले क्रिकेट’ पाहताना हा चित्रपट पहिल्याच चेंडूवर बाद होणार याची खात्री आम्हा सगळ्यांना पटली अन् झालेही तसेच…

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’(२००१) हा चित्रपटही क्रिकेटवरच आधारित होता. दीडशे वर्षांपूर्वी गुजरातमधील एका गावात इंग्रजांचा शेतसारा (अर्थातच लगान) गरीब शेतकरी देऊ शकत नाहीत. तेव्हा भुवन (आमिर खान ) इंग्रजांच्या समोर एक प्रस्ताव ठेवतो, शेतकरी आणि इंग्रज यांच्यात क्रिकेटच्या सामन्याचा. शेतकरी जिंकले तर ‘लगान ‘ माफ करायचा. इंग्रज क्रिकेटमध्ये पारंगत तर भुवनला अनेक अडचणींतून मार्ग काढत क्रिकेटसंघ तयार करतो. ‘लगान‘ने ऑस्कर अकादमी पुरस्कारांत विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळवले होते. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या‘ (१९९८) चित्रपटाने मसाला फिल्म आणि प्रयोगशीलता यांच्यातील अंतर कमी होत गेले. म्हणजे क्रिकेट फळाले असे  म्हणायला हरकत नाही. नागेश कुक्कनूर दिग्दर्शित ‘इक्बाल’(२००५) चित्रपटाचे कथानक कसोटीपटू भागवत चंद्रशेखर यांच्या संघर्ष आणि जडणघडणीवर बेतले होते. श्रेयस तळपदेने मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर आधारित आलेल्या बायोपिकनाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

क्रिकेटपटू झाले अभिनेते

अनेक क्रिकेटपटूंनी मैदानावर यशस्वी खेळी केली तशी खेळी चित्रपटांत करण्याचा प्रयत्न केला. यात पहिले नाव येते ते सलीम दुराणी यांचे. त्यांनी बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चरित्र’ ( १९७३) या चित्रपटात काम केले. या चित्रपटात परवीन बाबी त्यांची हिरोईन होती. परवीन बाबीचा हा पहिलाच चित्रपट होता. सुनील गावसकर यांनी ‘सावली प्रेमाची’ या मराठी चित्रपटांत अभिनय केला. सुनील गावसकर यांची भूमिका मैदानावरील त्यांच्या प्रतिमेशी ‘मॅच’ होत नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. यानंतर डॉ. श्रीराम लागू दिग्दर्शित ‘झाकोळ’ या मराठी चित्रपटात आणि कंवल शर्मा दिग्दर्शत ‘मालामाल’ चित्रपटांत सुनील गावसकर यांनी क्रिकेटपटूचीच भूमिका साकारली होती.  (अभिनयाबरोबरच गावसकर यांनी ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ हे गाणं ही गायले आहे. हे गाणं पद्माकर शिवलकर ऑर्केस्ट्रात गायचे…)

विजयसिंह पटवर्धन दिग्दर्शित ‘कभी अजनबी थे’ या चित्रपटात संदीप पाटील यांनी नायकाची तर सय्यद किरमाणी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. जुहू येथील ‘सांगली व्हिला’ या पटवर्धन यांच्या बंगल्यात या चित्रपटाचा मुहूर्त ज्येष्ठ कलाकार अमोल पालेकर यांच्या हस्ते झाला होता. यावेळी सिनेपत्रकारांना बोलावले होते. तेव्हा संदीप पाटील यांची मुलाखत घेताना त्यांच्याशी अभिनेता म्हणून संवाद साधावा की क्रिकेटपटू असा प्रश्न उभा राहिला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर संदीप पाटील यांच्या या नायकगिरीची फारच थट्टा झाली होती. या चित्रपटाचा अक्षरश: खेळ झाला असे म्हणायला हरकत नाही… 

विनोद कांबळीने ‘अनर्थ’ (हिंदी),‘लागली पैज’ (मराठी) या चित्रपटांत तर अजय जडेजा याने ‘खेळ’, कपिल देव ‘इक्बाल’ चित्रपटात झळकले होते. केवळ भारतीय नाही तर परदेशी क्रिकेटपटूंनीही हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘अराऊंड द वर्ल्ड’ या चित्रपटामध्ये वेस्ट इंडिजचे अष्टपैलू गॅरी सोबर्स छोट्याशा भूमिकेत दिसले होते. तर पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज मोहसीन खानने ‘गुनहगार कौन’, ‘साथी’, ‘बटवारा’ अशा बारा हिंदी चित्रपटांत काम केले होते. परंतु त्यानंतर मोहसीन खानने अभिनयाच्या प्रांतात फारशी चमक दाखवली नाही. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नशीब आजमवत असताना त्याने अभिनेत्री रीना रॉय हिच्याशी लग्नही केले. कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला… थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही क्रिकेटपटूला चित्रपटात अभिनय करणे फारसे पथ्यावर पडले नाही… तरीही चित्रपट आणि क्रिकेट हे नाते आजही अतूट आहे.  आपल्या चित्रपट आणि क्रिकेट यांच्या नातेसंबंधाची गोष्ट अनिर्णित सामन्यासारखी आहे. ती आणखी पुढे सुरू राहणारी आहे हे नक्की…  
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link