Next
एक कडक सॅल्यूट, कॉट्रेलसाठी!
सतीश स. कुलकर्णी
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

विश्वचषकाच्या बाराव्या अध्यायातला ३४वा सामना. मँचेस्टरचं ओल्ड ट्रॅफर्ड मैदान. आतापर्यंत प्रत्येकी दोनदा चषक जिंकणारे संघ भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ समोरासमोर. दोन्ही संघांची परिस्थिती वेगळी. भारतासाठी हा सामना म्हणजे उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे. कॅलिप्सो संगीतावर बेभान नाचणाऱ्या मनमौजी खेळाडूंच्या वेस्ट इंडिज संघाला मात्र इथं जिंकणं आवश्यकच, कारण भारताला हरवलं तर उपांत्य फेरीचा दरवाजा किलकिला होण्याची त्यांना आशा.
भारताची फलंदाजी चालू. डावातलं ४९वं षटक टाकण्यासाठी शेल्डन कॉट्रेल आलेला. सव्वासहा फुटी, दणकट बांध्याचा, डाव्या हातानं जलदगती मारा करणारा कॉट्रेल. त्याला आधीच्या नऊ षटकांत एकही गडी बाद करता आलेला नाही. समोर अनुभवी महेंद्रसिंग धोनी आहे. साथीला सुसाट सुटलेला हार्दिक पंड्या. अर्धशतकाच्या जवळ आलेला. कॉट्रेलचा दुसरा चेंडू ऑफ स्टंपाच्या चांगला बाहेर. पंड्याचा अंदाज चुकतो. गती थोडी कमी केलेल्या या चेंडूवरचा त्याचा फटका कव्हरला खोलवर असलेल्या फॅबियन अॅलनच्या हातात विसावतो.
पंड्याच्या जागी महंमद शमी आलेला. षटकातला पाचवा चेंडू. लेग स्टंपकडे रोख असलेला, आखूड टप्प्याचा. चेंडूच्या रेषेच्या आत येऊन खेळू पाहणाऱ्या शमीला तो भिरकावून द्यायचा असतो. अंदाज साफ फसतो. त्याच्या ग्लव्हजला चाटून चेंडू यष्ट्यांमागे शाय होपकडे जातो.
शेवटच्या षट्कात कॉट्रेलला दोन बळी मिळतात. पंड्या आणि शमी बाद झाल्याचा आनंद व्यक्त करण्याआधी तो त्याची नेहमीची कृती करतो- ताठपणे तीन दमदार पावलं टाकतो. मग थांबतो. आणि एक कडकडीत लष्करी सॅल्यूट! विकेट काढल्याचा जल्लोष वगैरे नंतर...
आता फलंदाजी वेस्ट इंडिजची. भारतीय गोलंदाजांनी त्यांची त्रेधातिरपीट उडवलेली. तिसावं षटक सुरू होताना आठ गडी बाद, जिंकण्यासाठी दीडशेहून अधिक धावा हव्या. सामना हातातून निसटलेला. पूर्णपणे. कॉट्रेल आणि केमार रोच खेळत आहेत. तिसावं षटक टाकण्यासाठी युजवेंद्र चहल आला. त्याचा पहिलाच चेंडू कॉट्रेल मिडविकेट सीमारेषेपार धाडतो. पुढचा चेंडू आणि उत्तुंग षटकार. तो पाहून चहलही अवाक्! पुढचे दोन चेंडू काही न घडता पडतात. पाचवा चेंडू आणि चहलच्या ‘राँग वन’ने कॉट्रेलला चकवलेलं. त्यानं ठरवलेला फ्लिक काही बसत नाही. चेंडू पॅडवर आणि पायचित!
‘डीआरएस’च्या फंदात न पडता कॉट्रेलनं निमूटपणे परतीची वाट धरली. तिकडे कर्णधार विराट कोहली हसून बेजार. तो कॉट्रेलच्या सॅल्यूटची किंचित नक्कल करतो. शमी मात्र तसंच एक-दोन पावलं चालतो. सलाम करतो. जणू कॉट्रेलला निरोप! त्याच्याच भाषेत? त्याच्याच पद्धतीनं? अर्थात्, शमीचं चालणं कॉट्रेलसारखं ताठपणे नसतं आणि सॅल्यूटही कडक नसतो.
शमीला बाद केल्यावर कॉट्रेलनं त्याच्या पद्धतीनुसार सॅल्यूट ठोकलेलाच असतो. आता शमी त्याचा बदला घेत होता की काय? सॅल्यूटची ही नक्कल त्यानं सहज गंमत म्हणून केली होती, की त्याला कॉट्रेलला खिजवायचं असतं? ‘हरलास तू आणि तुझा संघ. जा आता परत...’ असं काही त्या नक्कल करण्यातून सांगायचं होतं का?
खरं तर कर्णधार कोहलीप्रमाणंच शमीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या दणदणीत विजयाचा मानकरी होता. या दोघांनाही कॉट्रेलची नक्कल करून काय दाखवायचं होतं, काय साध्य करायचं होतं कुणास ठाऊक! कॉट्रेल असा सॅल्यूट कोणत्या उद्देशानं ठोकतो, हे त्यांना माहीत नाही की काय?
वेस्ट इंडिजच्या कोणत्याही खेळाडूसारखाच शेल्डन कॉट्रेल आहे. रांगडा, दणकट, मनाला येईल ते करणारा. तो सर्वस्व झोकून देऊन खेळतो. या डावखुऱ्या गोलंदाजाचा ‘स्लोअर वन’ चकवणारा असतो. खास वेस्ट इंडियन शैलीतला त्याचा बाउन्सर फलंदाजांची परीक्षा पाहतो; नको नको करतो. तिशीच्या उंबरठ्यावरच्या कॉट्रेलची कारकीर्द दीर्घ असली, तरी त्याच्या वाट्याला अवघे दोन कसोटी आणि एक दिवसाचे २८ सामने आले आहेत. या विश्वचषकस्पर्धेत तो भलताच लोकप्रिय झालेला आहे, कारण आहे त्याचा तो सॅल्यूट. या सॅल्यूटनं हजारो, लाखो क्रिकेटप्रेमींना त्यानं आपलंसं केलं आहे.
आपला आनंद साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंनी आणल्या. हवेत किंचित उडी मारून सहकाऱ्याला टाळी देण्याची पद्धत त्यांचीच. अष्टपैलू ड्वेन ब्राव्होचा ‘चॅम्पियन डान्स’ प्रसिद्ध झाला. आता कॉट्रेलचा लष्करी थाटातील सलाम. बळी मिळाला, की त्याचा जल्लोष करण्याआधी तो असा सॅल्यूट करतो. तो हे करतो, तेव्हा एक विकेट मिळाल्यामुळे खूश झालेले सहकारी त्याच्या जवळ येतात आणि त्याचा हा सॅल्यूट मनापासून पाहतात.
कशासाठी असतो हा सॅल्यूट? काही तरी वेगळं म्हणून? लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून?
कॉट्रेल सैन्यदलातील जवान आहे. ‘जमैका पोलिस अँड डिफेन्स फोर्स’मध्ये तो काम करतो. इंग्लंडविरुद्धच्या एक दिवसाच्या सामन्यात (२४ फेब्रुवारी २०१९) पाच बळी मिळवल्यानंतर त्यानं या सॅल्यूटचं स्पष्टीकरण केलं. हा सॅल्यूट म्हणजे तो काम करत असलेल्या लष्कराच्या रेजिमेंटबद्दल, तिथल्या अधिकाऱ्यांबद्दल आणि त्याच्या सहकाऱ्यांबद्दल दाखवलेला आदर, दिलेली मानवंदना होय! तो म्हणतो, ‘मी व्यवसायानं लष्करी जवान, सैनिक आहे. हा सलाम ठोकून जमैकाच्या सैन्यदलाबद्दल वाटणारा आदर मी व्यक्त करतो. प्रत्येक बळी मिळाला, की मी हे करतो. लष्करात प्रशिक्षण घेताना मी याचा सहा महिने सराव केला.’
खास विश्वचषकासाठी म्हणून कॉट्रेलनं हे काही केलेलं नाही. यश साजरं करण्याची आणि त्याच्या मागं असलेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तो २०१३पासून असा सॅल्यूट करतो. आता विश्वचषकामुळे त्याला प्रसिद्धी लाभली, एवढंच.
वेस्ट इंडिजचे माजी प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांच्या म्हणण्यानुसार जमैकाच्या सैन्यदलाच्या कमांडिंग ऑफिसरबद्दल आदर व्यक्त करण्याची कॉट्रेलची ही पद्धत आहे. वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळण्यासाठी त्याला कमांडिंग ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते. ती मिळते आणि त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तो आपल्या बिग बॉसविषयी आदर व्यक्त करतो. कुणाला दुखवायचं, कुणाला उचकवायचं असा काही उद्देश त्यामागं नसतो. मायदेशी असलेल्या आपल्या माणसांबद्दल आदर दाखवणारी त्याची ही कृती आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे प्रवक्ते फिलीप स्पूनर म्हणाले, की क्रिकेट खेळत असतानाही कॉट्रेलमधला सैनिक जागा असतो. सैन्यदलातील आपले अधिकारी, सहकारी यांचा पाठिंबा आणि निष्ठा याबद्दल त्याला या कृतीतून आभार मानायचे असतात.
यश साजरं करण्याची, त्याहीपेक्षा ‘आपल्या माणसांबद्दल’ कृतज्ञता व्यक्त करण्याची कॉट्रेलची ही पद्धत हिट झाली. अलिकडेच इंग्लंडमधील दोन चिमुरड्यांनी त्याची नक्कल केली. त्यांचा व्हिडिओ क्रिकेटवर्ल्डकप या हँडलने ट्विटरवर टाकला. तो पाहून कॉट्रेलही भावूक झाला. त्यानं ट्विट केलं - It’s nice to see so many kids enjoying the cricket and my salute. It would have been an exciting day to watch. I promise they will see me salute a few more times before the end of our tournament.
या मुलांचे पालक अॅलेक यांना वेस्ट इंडिजची जर्सी हवी होती. कॉट्रेलचं नाव व क्रमांक (१९) असलेली. त्यांनी तशी ट्विटरवरून विचारणा केली. कॉट्रेलनं त्यांना भारताविरुद्धच्या सामन्यासाठी आमंत्रित केले आणि जर्सी मिळवून देण्याचंही
कबूल केलं.
कॉट्रेलची ही छोटी कवायत आणि सॅल्यूट इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलस यांना मात्र आवडत नाही. इंग्लंड-वेस्ट इंडिज लढतीआधी याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, की हा सगळा प्रकार चाळिशीच्या पुढच्या प्रेक्षकांना नाराज करणारा, त्रासदायक वाटणारा आहे. असं असलं तरी यशाचा आनंद साजरा करण्याची प्रत्येक संघाची आपली आपली पद्धत असते. हा खेळ अर्थात तरुणांचा आहे. त्यात करमणूक आहे. कॉट्रेलच्या या कृतीमुळे काहींना हसू येत असेल, काहींच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल, तर चांगलंच आहे की!
बेलस यांचं हे मत ऐकून कर्णधार जेसन होल्डर म्हणाला, की तो शेल्डन आहे. तो काही बदलणार नाही. आहे हे असं आहे. ट्रेव्हर यांना ते स्वीकारावं लागेल!
थोडक्यात सांगायचं, तर कॉट्रेलच्या या सॅल्यूटमागे ‘चमकोगिरी’ नाही. हा सॅल्यूट असतो, सैन्यदलाबद्दल आदर दाखवून देणारा, कृतज्ञता व्यक्त करणारा.
विजयाचा आणि कॉट्रेल बाद झाल्याचा आनंद साजरा करताना शमीला त्याची नक्कल करावी वाटली. त्यामागे टवाळी होती, हेटाळणी होती. समजा हे काही नसलं, तरी थोडी टिंगल, थोडी गंमत होती. एका जेत्यानं पराभूताची केलेली टवाळी, पण ती करताना त्याला कॉट्रेलच्या आदराच्या, कृतज्ञतेच्या भावनांचा विसर पडला. या सामन्यात कॉट्रेलहून दुप्पट बळी घेणारा शमी इथं उणाच पडला, हे नक्की.
सामाजिक माध्यमांवर याची बरीच चर्चा झाली. अनेक भारतीय चाहत्यांना शमीची ही कृती आवडली नाही. काहींनी ‘थोडी गंमत हो...’ असं म्हणतानाच कॉट्रेलबद्दल आपल्याला मनापासून आदर असल्याचंही सांगितलं. ‘सैन्य कोणत्याही देशाचं असो, त्याबद्दल आदर दाखवलाच पाहिजे’ अशीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.
खुद्द कॉट्रेलनं @SaluteCottrell हँडलवरून शमीला दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं. त्यानं ट्विटमध्ये म्हटलंय – ‘नकल करना ही सबसे बडी चापलुसी है।’
कॉट्रेल अस्सल वेस्ट इंडियन आहे. सैन्यातला जवान आणि क्रिकेटपटू, दोन्ही कामं सर्वस्व झोकून द्यायला लावणारी आहेत असं त्याला वाटतं. तो म्हणतो, ‘जवान आणि क्रिकेटपटू अशा दोन्ही भूमिका पार पाडताना मी ‘बुलेट’पेक्षा ‘बॉल’ अधिक पसंत करतो. समोरच्यावर गोळ्या झाडण्यापेक्षा यॉर्कर टाकणं फार सोपं आहे!’
कॉट्रेल, तुला तुझ्याच स्टाइलमध्ये एक कडक सॅल्यूट!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link