Next
विस्तारलेले साहित्यविश्व
संदीप तापकीर
Friday, November 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story
पुणे हे उच्च शिक्षितांचे शहर आहे. शिक्षण हा शहराचा आत्मा आहे. पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ मानले जाते. केवळ महाराष्ट्राचेच नाही तर एकेकाळी देशाचेही केंद्रबिंदू असणारे शहर होते. आजही ते शिक्षणासाठी तेवढेच महत्त्वाचे शहर मानले जाते. देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी या नगरीत येतात. येथ शिक्षणाच्या मुबलक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. उच्च शिक्षितांचे शहर असल्यामुळे पुण्यात प्रकाशनसंस्थाही मोठ्या प्रमाणावर आहेत, लेखकही बहुसंख्येने आहेत. याच सर्व सुविधांमुळे निवृत्तीनंतरही लोकांचा पुण्यात राहण्याकडे कल असतो. पर्यायाने लेखकांमध्ये बाहेरून येऊन आता पुणेकर झालेलेही संख्येने अधिक आहेत.
लेखक-प्रकाशक-वाचक यांचे त्रिकूट महाराष्ट्रातील कोणत्याही शहरापेक्षा पुण्यात मुबलकतेने आहे, हे वास्तव आहे. आजघडीला पुण्यात रोज किमान दहा पुस्तके प्रकाशित होतात. या पुस्तकप्रकाशनात बोलणारे मान्यवर, अध्यक्ष हेदेखील पुण्यातच असतात. ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हणही पुण्याच्या या साहित्यविश्वाला लागू होते. म्हणून पुण्यातील साहित्यविश्व समृद्ध आहे, असे आपण ठामपणे म्हणू शकतो.
पुण्यातील साहित्यविश्व पूर्वी सदाशिवपेठेपुरतेच मर्यादित होते, हे आज कोणालाही सांगून खरे वाटणार नाही. पुण्यात जशा मुबलक प्रकाशनसंस्था आहेत, तशी वितरणव्यवस्थाही अत्यंत चांगली आहे. अप्पा बळवंत चौक हे त्याचे उत्तम उदाहरण. पुस्तकछपाईच्या सोयीसुविधा आहेतच, शिवाय त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानही येथे दिसते. ‘डिजिटल छपाई’ हा प्रकाशनव्यवसायातील बदलही पुण्याने स्वीकारलेला दिसतो.
पुस्तकनिर्मिती ही लेखकाच्या बाजूने उत्स्फूर्त वा ठरवून केलेल्या लेखनानंतरच खऱ्या अर्थाने सुरू होते. आज लेखकाची कक्षा विस्तारली आहे. त्यांचे विषय अतिव्यापक झालेले आहेत. साहित्यातील नानाविध प्रकारांत हे सकस चौफेर लेखन दिसू लागले आहे. येथे आता ग्रामीण-शहरी, जातपात, हे भेद केव्हाच गळून पडलेले दिसतात. कवींचे उदंड पीक निर्माण झाल्यामुळे काव्यसंग्रहांवर चांगलीच संक्रांत आलेली दिसते. त्यामुळे कोणीच प्रकाशक कवितासंग्रह स्वत:हून छापताना दिसत नाहीत. याचाच एक परिणाम म्हणून लेखक आता स्वत:च प्रकाशही बनू पाहतात. त्यामुळे एका परीने त्यांचाच तोटा होताना दिसतो. ‘प्रकाशन’ हा एक आता ‘धंदा’ बनला आहे. पुस्तक विकणे ही एक कला आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य अंगी असावे लागते. त्यासाठी अनुभवदेखील असावा लागतो. आज या व्यवसायात मंदीचा काळ आहे. त्यामुळे पुण्यातील ख्यातनाम प्रकाशनसंस्था पुस्तके विकण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबतात. प्रकाशनपूर्व सवलत, २० ते ४० टक्के या पारंपरिक गोष्टी आहेतच, शिवाय, त्याच्या जोडीला व्हॉट्सअॅप, फेसबुक, इमेल या आधुनिक साधनांचाही ते खुबीने वापर करताना दिसतात. अनेक प्रकाशनसंस्थांनी स्वत:चे मासिक सुरू करून त्यातून आपल्या पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून त्यांनी नव्या पुस्तकांचा परिचय, सवलत इत्यादी गोष्टी वाचकांसमोर ठेवल्या आहेत.
अशा या धावपळीच्या काळात सध्या व्यक्तिमत्त्वविकासावरच्या पुस्तकांचाच मोठा बोलबोला दिसतो. त्या पुस्तकांना वाचकांकडून सातत्याने मागणी असते. तसेच, वाचकांना थोरामोठ्यांची चरित्रे वाचायला आवडतात. त्यामुळे अशा पुस्तकांच्या अनुवादालाही मोठी मागणी दिसते. प्रत्येक भाषेतील दर्जेदार पुस्तके मराठीत अनुवादित होताना दिसतात. त्यातही इंग्रजी, कन्नड या भाषांना अधिक पसंती दिसते. अशा अनुवादकांची संख्याही पुण्यात आता वाढते आहे. अनुवाद करताना या अनुवादकांनी मराठी भाषेचे तारतम्य बाळगणे अत्यावश्यक आहे. चुकीचा किंवा शब्दश: अनुवाद झाला तर अर्थबदल होतो, संदर्भ चुकतो. त्यामुळे सक्षम अनुवादकाची गरज आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.
पुण्यात जसे प्रकाशनाचे सोहळे होतात, तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमदेखील मोठ्या प्रमाणात होतात. या नगरीत वक्त्यांची कमतरता नाही. वेगवेगळ्या विषयांवरचे तज्ज्ञ शोधून त्यांच्याकडून माहितीपुस्तके लिहून घेण्याचे कौशल्य अनेक मान्यवर प्रकाशकांनी हस्तगत केले आहे. पर्यटन या विषयाला अजिबात मरण नाही. म्हणूनच पर्यटनावरची असंख्य पुस्तके आज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यात एखाद्या राज्याचे, परदेशाचे पर्यटन असो वा मंदिरांचे, किल्ल्यांचे वा शहरांचे पर्यटन असो, त्यावरची पुस्तके आहेतच. पाककलाही असाच एक खूप चालणारा विषय आहे. त्यावरही सातत्याने नवनवीन पुस्तके येत असतात.
प्रत्येक पिढीचे लेखक वेगवेगळे असतात. प्र. के. अत्रे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, रणजित देसाई या मान्यवरांनी जसा पूर्वीचा काळ आपल्या लेखणीने गाजवला, तसे आता डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. शंकर अभ्यंकर, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. नामदेवराव जाधव इत्यादी उदाहहणे देता येतील. यांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचली जातात.
कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित, स्फुटलेखन, वर्तमानपत्रीय लेखन, समीक्षा इत्यादी प्रकारांवरच्या साहित्याबरोबरच आता शैक्षणिक साहित्य, कोशवाङ्मय, बालसाहित्यही मोठ्या प्रमाणावर लिहिले जात आहे. डायमंड पब्लिकेशन्सने नानाविध प्रकारचे कोश प्रकाशित करण्याचे खूप मोठे धाडस दाखवले आहे. त्या त्या विषयातील अभ्यासकाने हे कोश लिहिले असल्याने संदर्भसाहित्य म्हणून त्यांचे मोल अनन्यसाधारण आहे.
महाराष्ट्र सरकारच्या काही योजनांमुळे गेल्या दोन वर्षांत सर्वच प्रकाशकांना मोठा फायदा झाला होता, त्यात मुलांसाठीची पुस्तके, तीही रंगीत, मोठ्या प्रमाणावर छापली गेली आहेत. संत, ऐतिहासिक या विषयांवरचे साहित्यही सातत्याने लिहिले जात असते, प्रकाशित होत असते.
अक्षरधारा, शुभम इंटरप्रायझेस ही मंडळी पुण्यात सातत्याने पुस्तकप्रदर्शने भरवत असतात. त्यामुळे पुस्तकप्रेमींचे पाय तिकडे वळतातच. पुस्तकप्रदर्शनांमध्ये एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तके पाहायला मिळतात. एकाच विषयावरची अनके लेखकांची पुस्तकेही तिथे असतात. त्यामुळे वाचकाला काय विकत घ्यायचे याचा पर्याय समोर असतो. त्यामुळे वाचकांची वाचनाची प्रचंड आवड जोपासण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य या प्रदर्शनांमधून होत असते.
गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षांचे वास्तव्य पुण्यातच दिसते. त्यात डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख इत्यादी प्रमुख उदाहरणे सांगता येतील. जे साहित्यिक पुण्याबाहेरचे आहेत, त्यांचेही कार्यक्रम पुण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. या वर्षीच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यादेखील पुण्याच्याच आहेत.
संजय भास्कर जोशी यांच्यासारखा लेखक पुण्याच्या वितरणव्यवसायामध्ये उतरला आहे. कोथरुड भागात त्यांनी वाचकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्वत:चे दुकान अत्त्युत्कृष्ट पद्धतीने सुरू केले आहे. जोडीला ते काही साहित्यिक उपक्रमही राबवत असतात. वाचकांना काय हवे-नको ते देण्याचे प्रयत्न पुण्यात साहित्यमैफलींसह इतर अनेक प्रकारांनी मोठ्या प्रमाणात होतात. सिनेमा येण्यापूर्वी त्याची जशी जाहिरात वेगवेगळ्या माध्यमांमार्फत केली जाते तशी पुस्तके येण्यापूर्वी जाहिरात होणे गरजेचे वाटते. अर्थात हे खूप खर्चीक आहे. त्यामुळे त्यासाठी समाजमाध्यमाचा (सोशल मीडिया) अवलंब केला जातो. जर पुस्तक जाहिरातीमार्फत वाचकांसमोर पोचवण्यात प्रकाशक, लेखक यशस्वी ठरले तर त्या पुस्तकाची आवृत्ती संपायला आठ-दहा वर्षांचा काळ लागणार नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. त्यामुळे इंग्रजीचा हा भस्मासूर मराठीला गिळंकृत करणार, अशी ओरड सातत्याने ऐकू येत असते. परंतु मराठी भाषा जोपर्यंत घराघरात बोलली जाईल, तोपर्यंत ती अस्तित्वात राहील, यात कोणतीही शंका नाही. तरीही मराठी भाषा टिकवण्यासाठी सरकारी पातळीवरून अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी हा अनिवार्य विषय असलाच पाहिजे. शासनाशिवाय अनेक व्यक्तिगत प्रयत्नही मराठी टिकवण्यासाठी होताना दिसताहेत. त्यात अनिल मोरे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. गणित, शास्त्र इत्यादी क्लिष्ट विषयांवरील पुस्तकेही ते मराठीत आणत आहेत. अशांची संख्या वाढणे गरजेचे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीची प्रक्रिया संपली आहे. कोणत्याही क्षणी हा निकाल येण्याची शक्यता आहे. अभिजात भाषेच्या समितीमध्येसुद्धा पुण्यातील सदस्यसंख्या जास्त दिसते. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी इतका उशीर होण्याचे कारण म्हणजे राजकीय नेतृत्वाचा व इच्छाशक्तीचा अभाव. यशवंतराव चव्हाण, शरद पवार इत्यादी नेत्यांनंतर साहित्यिकांना सन्मान देणारे नेतृत्व दिसत नाही, ही शोकांतिका आहे. पुण्यात कार्यक्रमांबरोबरच पुरस्कारांचीही रेलचेल दिसते. लेखकांना जेव्हा त्यांच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळतो तेव्हा त्याला पुढील लेखन करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. रोज एक-दोन तरी पुरस्कारांचे छोटे-मोठे कार्यक्रम असतातच. शासनाचे अनेक पुरस्कार मिळवणारे लेखकही याच नगरीचे आहेत. त्यामुळेच पुणे शहर लेखकांचे शहरदेखील आहे. सर्वार्थाने पुणे हे साहित्यिक उपक्रमासाठींचे आदर्श शहर आहे. लेखक-प्रकाशकांचे आवडते शहर आहे. या प्रांतातही काही गैरप्रवृत्ती शिरल्या आहेतच. त्या दूर केल्या, तर या मंदीच्या काळातही मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे मोठे आणि महत्त्वाचे कार्य लेखक-प्रकाशकांच्या हातून अधिक सकस पद्धतीने होईल, यात कोणतीच शंका नाही. तो सुदिन लवकरच येवो, हीच अपेक्षा!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link