Next
इम्रान खान आणि ट्रम्प
विशेष प्रतिनिधी
Friday, July 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

पाकिस्तानच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय एकलेपणात पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नुकतीच झालेली भेट दिलासादायक वाटली असणार. सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालेली आहे. देश पूर्णपणे दिवाळखोरीत गेला आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेले कर्ज देण्यास कोणी तयार नाही. चीन हा जिवलग मित्र आहे ते एवढ्याचसाठी म्हणायचे, की तो व्यापारी सवलतीच्या बदल्यात मदत देतो; सौदी अरबला पाकच्या लष्कराचा आधार हवा आहे म्हणून तोही थोडी मदत देतो; परंतु ही मदत दोन वेळा हातातोंडाची भेट घालण्यापुरती उपयोगाची आहे. त्यामुळे अमेरिकेकडून काही मिळते का याची चाचपणी इम्रान खान करीत होते. त्यांना बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेच्या अध्यक्षांची भेट घ्यायची होती, पण अध्यक्ष त्यांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ट्रम्प हे कोणतेही दान फुकट देणाऱ्यातले नव्हेत. ते जे काही देतील त्याचा त्यांना पूर्ण मोबदला हवा असतो. त्यातच पाकिस्तान आजवर अमेरिकेला फसवत आला आहे, असे त्यांनी जाहीर विधान केले होते. त्यामुळे इम्रान खान यांना अमेरिकेचे आमंत्रण मिळत नव्हते, मात्र इम्रान यांच्या मिनतवाऱ्या व अमेरिकन प्रशासनातील पाकचे काही सहानुभूतिदार यांच्या मदतीने इम्रान यांनी हे आमंत्रण मिळवले. परंतु त्यासाठी त्यांना आधी लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अटक करण्याचे नाटक करावे लागले. भारताशी चर्चा करण्याची तयारी दाखवावी लागली. या दौऱ्यात इम्रान खान यांना अमेरिकेत जेमतेम राजशिष्टाचार मिळाला. देशाकडे परकी चलन नसल्यामुळे अमेरिकेत त्यांना त्यांच्या राजदूताच्या घरीच राहावे लागले व विमानतळावरून त्यांच्या घरी मेट्रोने जावे लागले. अध्यक्ष ट्रम्प यांनी इम्रान खान यांना भेट दिली. या भेटीत इम्रान खान यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकेला सैन्य काढून घेता यावे यासाठी मदत करण्याची तयारी दाखवली. अर्थात ही मदत ‘मदत’ नव्हती, तर तो एक ‘सौदा’ होता. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबानला राजी करणे व अन्य मदत यासाठी पाकने काही किंमत मागितली असणार, ती देण्यास ट्रम्प तयार नसण्याचे काहीच कारण नाही. पण ट्रम्प त्यांच्या अटींची पूर्तता झाल्याशिवाय ही किंमत पाकच्या पदरात टाकण्यास तयार होणार नाहीत. या सौद्यात काश्मीरप्रश्नाचाही समावेश करण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी केला व ट्रम्प यांनी काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करावी अशी विनंती केली. ट्रम्प यांनी अशीच विनंती मोदी यांनीही केली असल्याचे सांगून नव्याच वादाला तोंड फोडले. गेल्या अनेक वर्षांपासून भारत-पाकच्या वादात पडण्याचे अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत. परंतु भारताने अमेरिकेला या वादापासून दूर ठेवले आहे. कारण जगातले सर्व वाद अमेरिकेने चिघळवले आहेत व त्यात आपले राजकीय, आर्थिक हितसंबंध साधले आहेत. भारत-पाक वादात अमेरिकेने मध्यस्थी केल्यास यापेक्षा वेगळे काहीच निष्पन्न होणार नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही भारताची भूमिका आहे व ती अमेरिकेला मान्य असेल आणि पाकिस्तान त्याची दहशतवादी यंत्रणा पूर्णपणे नष्ट करणार असेल तरच भारत व पाकमध्ये शांतता निर्माण होऊ शकते. दोन्ही देशांत शांततेसाठी शिमला व लाहोर कराराचा पाया घातला आहे. हे करार नजरेखालून घातले तरी ट्रम्प यांना आपल्या मध्यस्थीची गरज नाही हे कळेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link