Next
भारतीय संघाचा ‘गोल’ चुकला
वैभव पवार
Friday, January 18 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आशियाई चषक फूटबॉलस्पर्धेत भारताने साखळी सामन्यात ४-१ असा बहारदार विजय मिळवून सुरुवात करून भारतीय फूटबॉलच्या पुस्तकात नवीन धडा लिहिल्याचे प्रत्येक भारतीयास वाटले. निळ्या वाघाने लढाईतील मस्त हत्तीला हरवून सर्व गोष्टी उंच स्तरावर नेऊन ठेवल्या. एकावेळी याच संघाने स्पर्धात्मक प्रतिपस्पर्धी त्यांच्या स्तरासारखा नसल्याचे कारण पुढे करून भारताचे मैत्रिपूर्ण सामना खेळण्याचे दिलेले निमंत्रण नाकारले होते.
आशियाई फूटबॉलस्पर्धेत ५५ वर्षांनंतर पहिला ऐतिहासिक विजय मिळवताना सुनील छेत्रीने दोन गोल करून चमक दाखवली. अनिरुद्ध थापा आणि जे. जे. लालपेखलुआ यांनी प्रत्येकी एक गोल करून सर्व फूटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. थायलंडचा संघ ज्या भारतीय संघाला कमी लेखत होता, त्या संघाने मोठ्या विजयाने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत फूटबॉल असोसिएशन, थायलंडचे मुख्य प्रशिक्षक मिलोव्हॅन राजेबॅक हे आपला निराशजनक दृष्टिकोन सोडतील.
भारताचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉस्टेन्सिन यांनी चाहत्यांसाठी नवीन गाणे गाऊन संघाला प्रोत्साहित केले आणि ‘अ’ गटामध्ये आघाडीवर नेले. परंतु फिफाच्या जागतिक क्रमवारीत संयुक्त अरब अमिरातचा (युएई) संघ ७९व्या तर भारतीय संघ ९७व्या स्थानावर आहे. त्यांच्याविरुद्ध उच्च दर्जाचा खेळ दाखवणे, संघाने एकजुटीने रणनीतीप्रमाणे खेळणे अत्यंत आवश्यक होते. यजमान संयुक्त अरब अमिरातला त्यांच्या देशाच्या मैदानावर चाहत्यांसमोर खेळणे सोपे नाही. भारतीय संघ उच्च दर्जाचा खेळ करण्यासाठी चांगल्या तयारीसह तयार आहे. यजमान देश बहरिनविरुद्धच्या १-१ गोलने बरोबरीनंतर निराश झाला होता.
संयुक्त अरब अमिराती संघासोबतच्या सामन्यात पहिल्या सत्रात नवीन स्ट्रायकर अशिकी कुरुनियान आणि सुनील छेत्री यांना दोन वेळा गोल करण्याची संधी मिळाली होती, परंतु गोलरक्षक खालीद इशा याने ती परतावून लावली. सुनीलने मारलेला फटका गोलरक्षकाला चकवून गोलजाळ्यात जाण्याऐवजी बारला लागून बाहेर आला. दुसऱ्या सत्रात अली मबखौत याने दिलेल्या पासवर खालप्पान मुबारक याने गोल करून अमिरातला आघाडीवर आणले.
भारताने दुसऱ्या सत्रात अमिरातीच्या गोलक्षेत्रात अनेकदा मजल मारून प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणले. सुनीलने बचावपटूंना भेदत अमिरातच्या गोलक्षेत्रात मजल मारली. गोलरक्षक समोर असताना सुनीलने मारलेला फटका गोलजाळ्याच्या जवळून गेला. अली मबखौतने ८८व्या मिनिटाला दुसरा गोल करून भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला. दुसरीकडे थायलंडने बहरिनवर १-० गोल करून मात केली. त्यामुळे ‘गट अ’मधील अंतिम गुणतालिकेमध्ये (स्थान) भारत तीन गुणांनी तिसऱ्या स्थानावर, यजमान यूएइने चार गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. थायलंड तीन गुणांनी तिसऱ्या आणि बहरिन एक गुणासह चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेतील भारताला आपले स्थान टिकवण्यासाठी १६व्या स्पर्धेत बहरिनविरुद्धच्या सामना बरोबरीत सुटला तरी चालणार आहे.
अशा परिस्थितीत सुनील आणि चमूने मागील दोन सामन्यांमधील रणनीतीनुसार बहरिनविरुद्धच्या सामन्यात खेळाची सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला बचावपटू अनास एडाथोडिलला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी आलेल्या सलाम रंजन सिंगच्या मदतीने भारतीय बचावफळीने पुन्हा एकदा बहरीनच्या आक्रमणपटूंना रोखण्यावर भर दिला. बहरिनच्या सय्यद धिय्याने खेळाच्या २३व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला, पण गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूने तो थोपवला.  पहिल्या सत्रातील मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये गोल करण्यासाठी चुरशीची झटापट झाली. मात्र उपयोग झाला नाही. दुसऱ्या सत्रात गोलसाठी हाणामारी चालूच होती. भारताने बचावावरच अधिक भर दिला. फ्री-किकची मिळालेली संधीही गमावली. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना गोलजाळ्याच्या अगदी जवळ भारताच्या प्रणॉय हल्दरने हमीद अल्शमनला पाडल्याने बहरिनला पेनल्टी किक बहाल करण्यात आली आणि रशीदने ९१व्या मिनिटाला गुरप्रीतला चुकवून गोल केला. त्यामुळे सर्व भारतीयांची निराशा झाली. त्याचवेळी सुरू असलेला यूएइ व थायलंड यांच्यामधील सामना १-१ गोलने बरोबरीत सुटल्यामुळे यूएइला पहिले व थायलंड दुसरे स्थान मिळाले. अशा तऱ्हेने आशियाई चषकस्पर्धेत इतिहास घडवण्याचे भारताचे स्वप्न साखळी सामन्यातील तिसऱ्या खेळातच संपुष्टात आले. सामना संपल्यानंतर प्रशिक्षक स्टीफन कॉस्टेन्सिन यांनी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून किंवा कसे, पण पदाचा राजीनामा दिला आहे.
यामध्ये ठळक बाबी दिसून येतात, की भारतीय संघात अंतर्गत बरीच तफावत आहे. आशियाईस्पर्धेमध्ये भाग घेत असताना एकही भारतीय स्ट्रायकर पूर्ण फॉर्ममध्ये नाही. फक्त छेत्रीच्या नावावर गोल आहेत. जे. जे. लालपेखलुआने, बलवंत सिंग आणि सुमीत पास्सी यांचे फॉर्म एकदम कमी दमाचे होते. मायकेल सुसायरान याचा फॉर्म चांगला होता, परंतु त्याला खेळापासून लांबच ठेवले गेले.
संघामधील एकही खेळाडू कर्णधारपदासाठी प्रशिक्षकांना  योग्य वाटला नाही. त्यामुळे कर्णधारपदाची बदलती रणनीती यश देऊन गेली नाही. स्पर्धेच्या तयारीत चांगली रणनीती, योजना, त्याबरोबरच नशिबाचीही साथ या सर्वांचा अभावच वाटला. त्यामुळे पुढील चार वर्षांनंतर होणाऱ्या आशियाई चषकस्पर्धेची वाट पाहू!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link