Next
गर्जा महाराष्ट्र माझा
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मुलांनो, तुम्हाला आपलं घर, शाळा याचबरोबर आपलं गावही खूप आवडतं,  होय ना? वासुदेवशास्त्री खरे हे कोकणातले एक मोठे कवी होते. त्यांनी ‘जन्मभूमी‘ या कवितेत  म्हटलं आहे,
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन
राहे चित्ती  प्रिय मम परी मातृभूमी सदैव
मोठेपणी आपण कामानिमित्त आपल्या गावापासून लांब गेलो,  तरी आपलं गावाशी एक खास नातं असतं. हे नातं  फक्त  गावापुरतंच राहत नाही,  तर ते नातं मनात घट्ट होत असतं. आपलं राज्य, तिथली भाषा, तिथला निसर्ग, तिथली संस्कृती  हे सारं आपलेपणाच्या भावनेनं आपल्याला सोबत करत असतं. महाराष्ट्राची माती, गडकिल्ले, डोंगरदऱ्या आपल्या मनावर प्रेमाची पाखर घालत राहतात. तिथला इतिहास आपल्या  मनात जागा ठेवणारी गीतं कवी लिहीत असतात. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं महाराष्ट्रगीत प्रसिद्ध आहे, ते असे आहे
         बहु असोत  सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजातलं ‘गर्जा महाराष्ट्र माझा,  गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत तर कानात साठवून ठेवावंसं वाटतं. कवी गोविंदाग्रज यांनीही आपल्या कवितेत लिहिलं  आहे ,
राकट देशा,  
कणखर देशा,
दगडांच्या देशा
प्रणाम घ्यावा माझा  हा  
 श्रीमहाराष्ट्रदेशा!
कवी वसंत बापट यांनी,
भव्य हिमाचल तुमचा अमुचा,
 केवळ माझा सह्यकडा
असं लिहून महाराष्ट्राविषयीची आपली खास जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली आहे.  महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या अशा आणखी काही कविता आहेत का तुम्हाला माहीत?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link