Next
जिगरबाज
रविराज गायकवाड
Friday, February 01 | 05:00 PM
15 0 0
Share this storyसात ऑस्ट्रेलियन ओपन, एक फ्रेंच ओपन, चार विंम्बल्डन आणि तीन यूएस ओपन. अशा एकूण पंधरा ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह सर्वाधिक विजेतेपदांच्या क्रमवारीत तिसरं स्थान. दम्याचा त्रास असलेल्या एका जिगरबाज तरुणानं टेनिस जगतात मिळवलेली ही संपत्ती. त्याचं नाव नोवाक जोकोविच. ‘जोकोविच संपला.’ ‘तो पुन्हा कोर्टवर दिसेल की नाही सांगता येत नाही’, अशी वक्तव्यं दहा वर्षांपूर्वी ज्यांनी केली त्यांना आजही जोकोविच टेनिस कोर्टवर उत्तर देतोय.

कारकिर्दीतलं सातवं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं यंदाच्या हंगामाची सुरुवात तर चांगली केलीय. अंतिम सामन्यात तगडा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या नदालला त्यानं ६-३, ६-२, ६-३ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलंय. त्यानं नदालला संघर्षाची संधीही दिली नाही, हे स्पष्ट होतंय. सध्याच्या महान टेनिसपटूंपैकी जोकोविच आहे. सर्बियासारख्या देशात, ज्या देशात फूटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, त्या देशातून एक महान टेनिसपटू तयार होणं, ही खरचं आश्चर्याची बाब आहे. अगदी कुटुंबात कोणत्याही खेळाची पार्श्वभूमी नसताना केवळ एका खेळाडूला टीव्हीवर खेळाताना पाहून जोकोविच प्रभावित झाला आणि त्यानं टेनिसवर वर्चस्व गाजवलं.

कारकिर्दीत अनेक चढउतार आले तरी, जोकोविचनं त्याची टेनिस रॅकेटवरची पकड कधी ढिली होऊ दिली नाही. त्याचा खेळ हे त्याचं वेगळेपण आहे. बेसलाइनवरचा एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. त्याचे दोन्ही बाजूंचे ग्राऊंड स्ट्रोक तेवढ्याच ताकदीचे आहेत. सध्याच्या खेळाडूंमध्ये त्याचा बॅकहँड स्ट्रोक सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं. वेगवान सर्व्हिस हे त्याचं सर्वोत्तम शस्त्र असून, त्यातून त्यानं अनेक वेळा टेनिस चाहत्यांची वाहव्वा मिळवलीय. कोर्टवरच्या त्याच्या वेगवान हालचाली त्याच्या खेळाला बळ देतात. अर्थात क्ले कोर्टवर त्याला हे पदलाालित्य दाखवता आलेलं नाही. त्यामुळचं बहुधा कारकिर्दीत त्यानं एकमेव फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावलंय.

एकेकाळचा महान टेनिसपटून बोरिस बेकर याच्या मार्गदर्शनाखाली जोकोविचची कारकीर्द शिखरावर पोहोचली. डिसेंबर २०१३ मध्ये बेकर यांनी जोकोविचला कोचिंग करत असल्याची घोषणा केली होती. बेकर यांच्याकडून कोचिंग घेत जोकोविचनं सहा मोठ्या स्पर्धांचं विजेतेपद पटकावलंय. त्यासाठी जोकोविचनं अनेक वेळा बेकर यांच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

जोकोविचनं आजवर १५ ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवली असली तरी, एकाच हंगामात चारही विजेतेपदं पटाकवण्याची किमया त्याला साधता आलेली नाही. यंदाच्या हंगामात त्यानं अंतिम सामन्यात नदालला पराभूत करून सुरुवात दमदार केलीय. त्याची ही घोडदौड अशीच पाहायला मिळेल आणि यंदा तो एकाच हंगामात चारही विजेतेपदं लुटून जाईल, अशा शुभेच्छा.

लसूण आणि जोकोविच
जोकोविचला यशाचं शिखर गाठताना अनेक अडथळ्यांना पार करावं लागलं. टेनिसचं कौशल्य शिकण्याबरोबरच त्याला शरीराशीही झगडा करावा लागला. त्याचा टेनिस कोर्टवरच्या संघर्षापेक्षा आरोग्याशी केलेला संघर्ष बहुधा मोठा असावा. टेनिस कोर्टवर सातत्यानं कोसळणं, छातीत दुखणं, सततचं आजारपण यातून बाहेर येत जोकोविचनं आपली टेनिस कारकीर्द घडवली, फुलवली. त्याचा आरोग्याशी झालेला संघर्ष त्यानं ‘सर्व्ह टू विन’ या पुस्तकात उतरवला आहे. टेनिस कोर्टवर अधिराज्य गाजवण्याची स्वप्नं पाहत असतानाच १९ व्या वर्षी त्याला आपण खेळासाठी फिट नसल्याचं सांगितलं जाऊ लागलं. अॅलर्जी, व्यायामामुळं उद्भवणारा दमा अशा गोष्टी समोर येऊ लागल्या. अर्थात त्यावर उपचार करणारेही मिळत नव्हते. व्यायामामध्ये सायकलिंग, वजन उचलणं, स्ट्रेचिंग, धावणं यांमुळे त्याला दम्याचा विकार उद्भवत होता. अर्थात टेनिस कोर्टवर उतरायचं तर, हे सगळं करायलाच हवं. जिगरबाज जोकोविचनं व्यायाम किंवा खेळ सोडला नाही. अनेक वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या कोर्टवरही तो कोसळला होता. ऑस्ट्रेलियन ओपनच्या २०१० च्या स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये त्सोंगाविरुद्धचा सामना जोकोविचला गमवावा लागला. तो टेनिस कोर्टवरच कोसळला होता. त्या वर्षी त्याच्यावर चांगले उपचार सुरू झाले. जोकोविचच्या अनारोग्याचं मूळ त्याच्या पचनक्रियेत असल्याचं डॉ. सेटोजोविच यांनी निदान केलं होतं. तो जे खातो त्यामुळं त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१० मध्ये जोकोविच आणि डॉ. सेटोजोविच यांची भेट झाली. जोकोविचच्या आहारातील लसूण त्याच्यासाठी धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर १८ महिन्यानंतर जोकोविच संपूर्ण टेनिस जगताला वेगळा दिसला. पूर्वीपेक्षा अधिक ताकदवान आणि आक्रमक झाला. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलेलं नाही.

नदाल की जोकोविच?
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच. हे तिघेही महान टेनिसपटूंपैकी आहेत. तिघेही समकालीन आहेत आणि सध्या कोर्टवर खेळत आहेत. यात फेडररनं सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम पटकावून सर्वोच्च स्थान मिळवलंय. तर त्यापाठोपाठ नदाल १७ आणि जोकोविच १५ विजेतेपदांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या तिन्ही खेळाडूंची सतत तुलना होत असते. फेडररबरोबरचे जोकोविचचे सामनेही संघर्षपूर्ण झाले आहेत. पण, त्यातही नदाल की जोकोविच असा प्रश्न टेनिसप्रेमींच्या चर्चेत कायम असतो. नदालची १७ पैकी ११ विजेतेपदं ही फ्रेंच ओपनची आहेत. त्यामुळचं त्याला क्ले कोर्टचा बादशहा म्हटल जातं. तर, जोकोविचची ऑस्ट्रेलियन कोर्टवर हुकमत आहे. खेळाडू म्हणून दोघेही महान आहेत. नदालचा खेळ ताकदीचा आहे. जोकोविच त्यात कमी पडतो असं अनेकाचं मत आहे. पण, २०१२च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जोकोविचनं आपण कोणापेक्षा कमी नसल्याचं दाखवलंय. टेनिसच्या इतिहासातील हा सर्वाधिक काळ चाललेला अंतिम सामना आहे. तब्बल ५ तास ५३ मिनिटं चाललेल्या या सामन्यात ५-७, ६-४, ६-२, ६-७, ७-५ असा विजय मिळवून जोकोविचनं इतिहास रचला होता. दोघांच्या कारकिर्दीला जायबंदी होण्याचा फटका  बसला, दोघांनीही तेवढाच संघर्ष केला. पण, जोकोविचनं आरोग्याच्या समस्यांवर मात करून मिळवलेलं यश अधिक कौतुकास्पद वाटतं.

एकमेव फ्रेंच विजेतेपद       
जोकोविचची कारकीर्द चढउतारांनी भरलेली आहे. २००८ मध्ये ऑलिम्पिक ब्रॉन्झ आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद, अशी चांगली सुरुवात केली होती. पण, दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी त्याला पुन्हा तीन वर्षं वाट पाहावी लागली. २०११ मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि यूएस ओपन अशी एकाच वर्षी तीन विजेतपदं पटकावली होती. पण, करिअर स्लॅम पूर्ण करण्यासाठी त्याला तब्बल आठ वर्षे वाट पाहावी लागली. २०१६ मध्ये त्यानं क्ले कोर्टवर अर्थात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि चारही ग्रॅँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची किमया करून करिअर स्लॅम पूर्ण केलं. अर्थात, ती स्पर्धाही त्याच्यासाठी खूप नशीबवान ठरली. क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा राफेल नदाल, स्पर्धेदरम्यान जखमी झाला. तिसऱ्या राऊंडमध्ये त्याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळं जोकोविचला फायनल्समध्ये तगडा प्रतिस्पर्धीच मिळाला नाही. अंतिम सामन्यात त्याचा सामना ब्रिटनच्या अँडी मरेशी होती. त्यानं तो सामना ३-६ अशा पिछाडीवरून, ६-१, ६-२, ६-४ असा खिशात टाकला होता. जोकोविचचं आजवरचं हे एकमेव फ्रेंच ओपन विजेतेपद आहे.

सॅम्प्रस ठरला प्रेरणा
जोकोविचच्या घरात आजवर कोणी टेनिस रॅकेटला हातही लावलेला नव्हता. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या जोकोविचनं यशाचं, लोकप्रियतेचं शिखर गाठलं. जोकोविचचं टेनिस करिअर तसं अपघातानंच सुरू झालं. त्याचा जन्म सर्बियातल्या कोपौनिक नावाच्या छोट्याशा गावात झाला. आई-वडील एक छोटं रेस्टॉरंट चालवायचे. तो लहान असताना रेस्टॉरंटसमोरच तीन नवीन टेनिस कोर्ट सुरू झाली होती. तिथं जोकोविचनं पहिल्यांदा टेनिस रॅकेट हातात घेतली. वयाच्या चौथ्या वर्षापासून सातव्या वर्षापर्यंत त्या टेनिस कोर्टवर केवळ मजा म्हणून टेनिस खेळायला सुरुवात झाली. त्यावेळी खेळ, व्हिजन या गोष्टी जोकोविचच काय त्याच्या वडिलांकडेही नव्हत्या. पण, वयाच्या सातव्या वर्षी थोडीफार दृष्टी तयार झाली. जोकोविच टेनिसजगताची स्वप्नं पाहू लागला. पिट सॅम्प्रसला विंबल्डनचं विजेतेपद हातात घेताना पाहून जोकोविच भारावला होता. त्यानं घरातला एक छोटा कप घेऊन त्याला विंबल्डनच्या ट्रॉफीचा आकार देऊन विजेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगायला सुरुवात केली.

आजवरची ग्रँडस्लॅम विजेतेपदं
फ्रेंच ओपन - २०१६
अमेरिकन ओपन - २०११, २०१५, २०१८
विंम्बल्डन - २०११, २०१४, २०१५, २०१८
ऑस्ट्रेलियन ओपन - २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link