Next
खिळवून ठेवणारं ‘भारत भाग्य विधाता’!
राकेश जाधव
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story


page 23-1
साधारण अंगयष्टी, अंगभर पंचा लपेटलेला आणि हातात आधार म्हणून काठी घेतलेली, कधीच खोटं न बोलण्याचं व्रत आयुष्यभर जपणारी आणि अहिंसेच्या मार्गानं हिंसात्मक गोष्टींचा प्रखर व ठाम विरोध करून भारताच्या स्वातंत्र्यइतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारी व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी! त्यांच्या मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा बनण्याच्या प्रवासाचा जिवंत अनुभव देणारं नाटक सध्या रंगभूमीवर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवत आहे. त्या नाटकाचं नाव- भारत भाग्य विधाता.
‘महात्मा गांधी’ हे नाव माहीत नाही, अशी एकही व्यक्ती भारतात सापडणार नाही. शालेय जीवनात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास शिकत असताना प्रत्येकानं गांधीजींचं चरित्र वाचलेलं असतंच. त्यामुळे प्रत्येकाला गांधीजींच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कार्याची जुजबी ओळख असते. तशी ती यापूर्वी रंगभूमीवर गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेल्या विविध नाट्यकृतींनी करून दिलेली आहे, परंतु ‘भारत भाग्य विधाता’ हे नाटक केवळ गांधीजींच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानच नाही तर त्यांचे  विचारही अतिशय साध्यासोप्या भाषेत समजावण्यात कमालीचं यशस्वी ठरतं. हेच या नाटकाचं वेगळेपण आहे.
‘साधारण दीडशे वर्षं राज्य करणारं ब्रिटिश सरकार आता भारताला स्वतंत्र करणार आहे. सारे जण त्याच आनंदात आहेत. देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अगदी पंडित नेहरूही देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घ्यायला उत्सुक आहेत. परंतु शपथग्रहणाच्या आधी ते सरदार पटेलांना विचारतात, की बापू कुठे आहेत? ते शपथग्रहणसोहळ्याला उपस्थित राहतील अशी त्यांना आशा असते, मात्र त्यावेळी गांधीजी कलकत्त्याला असतात. कारण तिथे हिंदू-मुस्लीम दंगल सुरू झालेली असते. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांधीजी प्रयत्नांची शर्थ करत असतात. कारण गांधींजीच्या स्वप्नातील भारत असा नसतो...’ ‘भारत भाग्य विधाता’ची सुरुवात या प्रसंगानं होते. हा पहिलाच प्रसंग इतका ठाशीव झाला आहे की त्याआधारे पुढचं सगळं नाटक प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतं. गांधीजींचं बालपण, त्यात खोटं न वागण्याचा अवलंबलेला कठीण मार्ग, तरुणपणी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अपमानाचा अहिंसात्मक मार्गानं केलेला प्रतिकार, मिठाचा सत्याग्रह, दांडीयात्रा, चलेजाव आंदोलन अशा एकापाठोपाठ एक अनेक प्रसंगांच्या मालिकेनं नाटक फुलायला लागतं आणि प्रेक्षकांनी अपेक्षित केलेल्या शेवटपर्यंत पोचतं. मात्र तो शेवटही काहीसा धक्कादायक आणि प्रेक्षकांना चुटपूट लावणारा आहे. नाटकातले सारे प्रसंग इतक्या उत्कृष्टपणे कलाकारांद्वारे रंगभूमीवर सादर केले जातात की आपण एखादा चित्रपटच पाहतोय असं वाटू लागतं. या प्रत्येक प्रसंगाचं वेगळेपण समर्पक प्रकाशयोजना आणि पूरक पार्श्वसंगीतामुळे अधिक ठळकपणे जाणवतं.
गांधीजींच्या आयुष्याची दोन तत्त्वं म्हणजे सत्य आणि अहिंसा. या दोन शस्त्रांच्या आधारे अहिंसेच्या मार्गानं ब्रिटिशांशी बेधडक लढणाऱ्या गांधीजींचं जीवनचरित्र केवळ दीड तासाच्या नाट्यकृतीतून प्रभावीपणे मांडण्याचं अवघड काम लेखक प्रकाश कपाडिया यांच्या लेखणीनं आणि राजेश जोशी यांच्या कल्पक दिग्दर्शनानं केलं आहे. यातील संवाद समजायला सोपे असून ते काही प्रसंगांत प्रेक्षकांच्या ओठांवर हसू तर काही वेळा डोळ्यांत नकळत अश्रू आणतात. त्यासाठी लेखक कपाडिया यांच्या लेखणीला सलाम! रंगमंचावर साधारण पन्नासहून अधिक कलाकार सुमारे दीडशेहून अधिक व्यक्तिरेखा रंगवतात. या सगळ्यांची चांगली मोट बांधून नाटक गतिमान ठेवण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लीलया पेललं आहे.
या नाटकाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे या संपूर्ण नाटकात कुठेच ‘ब्लॅकआऊट’ होत नाही. एक प्रसंग संपला की त्यालाच लागून अगदी बेमालूमपणे दुसरा प्रसंग सुरू होतो. त्यामुळे रंगमंचावरील कलाकारांच्या ऊर्जेचाही कस हे नाटक लावतं. चिराग व्होरा (तरुण गांधी), पुलकित सोलंकी (वृद्धावस्थेतील गांधी), पार्थसारथी (गांधीजींचे आध्यात्मिक गरू श्रीमद राजचंद्र) आणि नीलम पांचाळ (गांधीजींच्या सहचारिणी कस्तुरबा) हे कलाकार नैसर्गिक अभिनय काय असतो, त्याचे काय मापदंड असतात याचा सर्वोत्कृष्ट नमुना सादर करतात. श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर, यांनी या नाटकाची निर्मिती केली असून सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांनी हे नाटक प्रस्तुत केलं आहे.
कथा, दिग्दर्शन आणि ‘नो ब्लॅकआऊट’ यासोबतच या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रंगमंचावर एकाच वेळी दिसणारे तीन गांधीजी! हे तीनही गांधीजी आपापसात संवाद साधताना प्रेक्षकांशीही संवाद साधतात आणि ‘गांधीविचार’ प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात रुजवण्याचं काम करतात. त्यामुळे गांधीजींच्या विचारांना मानणारे आणि त्यांचे विचार न मानणारे, अशा सर्व स्तरांतील प्रेक्षकांसाठी हे नाटक एक ‘मस्ट वॉच’ आहे, हे निश्चित.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link