Next
डोक्याला खुराक
अमृता दुर्वे
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this storyफोनवरची अॅप्स म्हटलं, की सोशल मीडिया, बातम्या, चॅट वा मेसेजिंग, गेम्स किंवा मग कामासाठी लागणारी अॅप्स डोळ्यांसमोर येतात. परंतु याच अॅप्सच्या जगात अशी काही अॅप्स आहेत जी तुम्हाला तुमचा मेंदू घासून-पुसून लख्ख, ताजातवाना आणि तल्लख ठेवायला मदत करतील. म्हणजे, थोडक्यात काय तर तुमच्या मेंदूला आवश्यक तो खुराक पुरवतील. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आवडतील आणि गुंगवून ठेवतील अशी ही अॅप्स आहेत. रिकाम्या वेळेत टाइमपास म्हणून किंवा मग एक चांगली सवय म्हणून ही अॅप्स वापरून पाहा.

Elevate
एकाग्रता, माहितीचा अर्थ लावण्याचा वेग, स्मरणशक्ती आणि गणिती कौशल्य वाढवण्यासाठी हे अॅप सर्वोत्तम आहे. यामध्ये  ३५ पेक्षा जास्त ब्रेन गेम्स आहेत. हे गेम्स वैज्ञानिक संशोधनानंतर न्यूरोसायंटिस्ट आणि शिक्षणतज्ज्ञांनी मिळून विकसित केले आहेत. दररोज किंवा आठवड्यातून किमान तीनदा या अॅपचा वापर करावा असं या अॅपच्या कर्त्यांनी सुचवलेलं आहे. तुमची प्रगती कशी होतेय हेदेखील या अॅपवर तुम्हाला पाहता येईल. या अॅपची पेड व्हर्जन घेतल्यास तुम्हाला अधिक गेम्स आणि अॅपचा अनलिमिटेड अॅक्सेस मिळेल.

Peak
या अॅपचा भर आहे तो आकलनशक्ती वाढवण्याकडे. प्रोब्लेम सॉल्व्हिंग, स्मरणशक्ती, संवादकौशल्य, बुद्धी वाढवण्यासाठी या अॅपचा वापर करायला हरकत नाही. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा ब्रेनमॅप मिळेल ज्यामुळे तुमची बलस्थानं काय आहेत, ते समजू शकेल. त्यामुळे तुम्ही कोणत्या कॅटेगरीजमध्ये उत्तम आहात आणि कोणत्या गोष्टींवर काम करायची गरज आहे, हेदेखील अॅप तुम्हाला सांगेल. यात तुमच्यासोबत एक कोच असेल, जो वेगवेगळे वर्कआऊट तुम्हाला सुचवेल. मात्र या कोचसाठी तुम्हाला अॅपची पेड व्हर्जन (प्रो व्हर्जन) घ्यावी लागेल. या व्हर्जनमध्ये तुम्हाला सर्व गेम्ससाठी पूर्ण अॅक्सेसही मिळेल. या अॅपची चांगली बाजू म्हणजे अॅपचा रंगीबेरंगी इंटरफेस. यामुळे अॅपचा वापर रंजक होतो.

Lumosity

या अॅपमध्ये तुम्हाला रोज काही छोटे छोटे, पटकन सोडवता येणारे गेम्स खेळता येतील आणि अॅक्टिव्हिटीज करता येतील. यात ४० पेक्षा जास्त विविध पर्याय आहेत. यात सुरुवातीलाच तुम्हाला फिट टेस्टच्या मदतीने तुमची आताची पातळी जोखता येईल, आणि मग तुमची प्रगती या अॅपमध्ये दाखवली जाईल. या टेस्टमध्ये तुमचे मानसिक चापल्य, लक्षपूर्वक पाहण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती तपासली जाईल. लुमोसिटीच्या टीममध्ये न्यूरोसायंटिस्ट, सायकॉलॉजिस्ट आणि गेम डेव्हलपर्स आहेत. त्यामुळे हे सगळे गेम्स खेळायला वा समजायला सोपे आहेत. शिवाय तुमचे रिझल्ट्स गेमच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठीही वापरले जातात. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे लुमोसिटीचे हे गेम्स तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरूनही खेळता येतील. त्यासाठी अॅप डाऊलोड करायची गरज नाही.

Clockwork Brain Training
ही आहेत पटापट सोडवता येण्याजोगी कोडी. बाकी सगळ्या गोष्टींसोबतच हे अॅप तुमचे भाषाकौशल्य सुधारायलाही मदत करेल. इतर कोणत्याही गेमप्रमाणे यातही तुम्ही जसजसे पुढे जाल, तशी कोड्यांची काठिण्यपातळी वाढत जाईल. दर आठवड्याला आणि महिन्याला पाठवण्यात येणाऱ्या आलेखांवरून तुम्हाला तुमची प्रगती किती झाली आहे, ते जाणून घेता येईल. हा गेम पूर्णपणे फ्री आहे. गेम खेळताना विविध लेव्हल्सवर तुम्हाला मिळणारी टोकन्स वापरून तुम्ही नवीन गेम मोड्स आणि अपग्रेड्स व अनलॉक करू शकता.

Yellow

या सगळ्या अॅप्सपैकी मला सगळ्यात जास्त आवडलेले हे अॅप. कारण यामध्ये तुमचं उद्दिष्ट एकच आहे, तुमच्या फोनचा स्क्रीन पूर्णपणे यलो म्हणजे पिवळा करणं आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे गेम्स खेळायचे आहेत. गंमत अशी, की ही कोडी सोडवण्यासाठी कोणत्याही सूचना तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्हाला तुमचे  डोके वापरूनच काय ते करायचे आहे. दरवेळी एक नवं कोडं, एक नवीन चाल. कधी पॅटर्न, कधी आकडे, कधी लॉजिक. जर तुम्हाला पहिल्या फटक्यात कोडं सोडवणं जमलं नाही तर तुम्हाला दोन हिंट मिळतील, आणि त्यासाठी या अॅपच्या फ्री व्हर्जनमध्ये तुम्हाला जाहिराती पाहाव्या लागतील. जाहिराती न पाहता थेट हिंट्स हव्या असतील तर तुम्हाला या अॅपचे पेड व्हर्जन घेता येईल. यामध्ये कसलाही अॅनालिसीस नाही, प्रगतीचे आलेख नाहीत. तरीही एकदा तुम्हाला यातली गंमत कळली की कोडी सोडवताना मजा येईल. एका साध्या गोष्टीभोवती एकूणच अॅप किती रंजक करता येऊ शकतं, यासाठी हा गेम खेळायलाच हवा. फक्त एकच - हे अॅप फक्त अॅण्ड्रॉई़डवरच उपलब्ध आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link