Next
इस्कॉनच्या गीताप्रकाशनात फेरफार
योगेश खरे
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this story


ताम्रपटावर भगवद्गीता कोरण्याचा विक्रम नावावर असलेले नाशिकचे मुस्लीम अभ्यासक जमीलभाई मोहंमद हनिफ रंगरेज यांनी इस्कॉन प्रकाशित इंग्रजी-मराठी गीतेच्या प्रकाशनांना आव्हान दिले आहे. इस्कॉनतर्फे प्रसार केल्या जाणाऱ्या भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण लॅन्ड यांनी प्रकाशित केलेल्या ‘भगवद्गीता अॅज इट इज’ आणि ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ या इंग्रजी-मराठी भाषांत प्रकाशित केलेल्या गीतेच्या पुस्तकांमध्ये गंभीर फेरफार केले असल्याचा रंगरेज यांचा आक्षेप आहे. श्लोक लहान-मोठे करणे, वाढवणे असे प्रकार झाले असून केंद्र व राज्य सरकारांनी या प्रकाशनांवर त्वरित बंदी आणावी, अशी त्यांची मागणी आहे.

जमील रंगरेज यांनी ताम्रपटावर भगवद्गीता कोरली, त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही दखल घेतली. ऑगस्ट २००२ मध्ये अवघ्या १४५ दिवसांत २५ किलो ३२० ग्रॅमच्या ताम्रपटांवर गीतेच्या १८ अध्यायांचे ७१०६ शब्द रंगरेज यांनी कोरले. हे काम करताना रंगरेज यांनी अनेक प्रकाशनांच्या भगवद्गीतांचे वाचन केले. त्यातून त्यांना या ग्रंथाची अधिक गोडी निर्माण झाली. प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेताना विविध पुस्तकांचे त्यांनी बारकाईने वाचन केले. त्यासाठी त्यांनी गीतेची ३२ प्रकाशने जमा केली. त्याचा शब्दन् शब्द वाचून काढला. व्यासमुनीरचित या ग्रंथामध्ये एकूण अठरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत. गीतेचा आंतरराष्ट्रीय प्रचार-प्रसार करणारे भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, हरे कृष्ण लॅन्ड यांनी प्रकाशित केलेल्या गीतेत मूळ ग्रंथापेक्षा अनेक फेरफार झाले असल्याचे त्यांना आढळले. पहिल्या अध्यायातील अठरावा आणि एकोणिसावा श्लोक, तसेच २० ते ४६ या श्लोकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या अध्यायातील २९ वा श्लोक, दहाव्या अध्यायातील १४ वा श्लोक, १३ व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि १८ व्या अध्यायातील ५९ व्या श्लोकात अक्षम्य चुका झाल्या आहेत, असा रंगरेज यांचा दावा आहे. अनेक ठिकाणी श्लोकांचे भावार्थ बदलण्यात आले आहेत. श्लोक लहान-मोठे करण्यात आले आहेत. तसेच ते वाढवले आहेत. अशा प्रकारे श्लोकांमध्ये बदल करण्याचा इस्कॉन यांना अधिकार काय, अशी विचारणा रंगरेज यांनी केली आहे. इस्कॉन मात्र याबातीत काहीही बोलण्यास तयार नाही. या चुकांमुळे पुढील पिढीपर्यंत चुकीचे ज्ञान पोहोचू शकते. हा धोका टळावा, यासाठी त्यात लवकर दुरुस्ती व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या ग्रंथाबरोबरच गीता प्रेसने प्रकाशित केलेल्या गीतेतील मुद्रणाच्या चुकाही त्यांनी शोधून काढल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच या चुका दुरुस्त कराव्यात, अन्यथा हा ग्रंथ चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ शकतो, असे रंगरेज यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link