Next
अक्षय ऊर्जा!
शोभा नाखरे
Friday, February 01 | 04:00 PM
15 0 0
Share this story“गेल्या १०-१२ वर्षांत माझ्या घरात वायरमन, प्लंबर, सुतार काम करण्यासाठी आलेला नाही, सर्व हत्यारे घरी आहेत, अगदी शर्टदेखील मी स्वतः अल्टर करतो,” दृष्टी नसूनही आत्मविश्वासाने हे सारे करणाऱ्या सागर पाटीलचे अनुभव ऐकून मी अवाक् झाले!

अलिबागजवळ नवखार (डावळी-रांजणखार) गावचे पाटील कुटुंब! नारळी-पोफळीच्या बागांत वसलेले गाव. विठाबाई पाटील आणि हिराजी पाटील यांना दोन मुलगे झाले. नात्यातल्या नात्यात झालेल्या लग्नामुळे असेल, पण या दोन्ही मुलांना जन्मतः मोतीबिंदू! चौथ्या महिन्यापासून तपासण्या व शस्त्रक्रिया यांचा ससेमिरा मागे लागला. सागरला डाव्या डोळ्यात काचबिंदू होता. त्याला दिसतच नव्हते. उजव्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्या डोळ्याने दिसू लागले, पण दुर्दैवाने नवव्या वर्षी फूटपट्टी लागून पूर्ण दृष्टी गेली त्याची. घरात आईवडिलांनी, नातलगांनी संपूर्ण सहकार्य केले, पण एक प्रतिक्रिया सागरला वेदना देऊन गेली; “हे आंधळे ऋषी काय शिकतील? हे तर भिकाच मागतील.” राग-वेदना मनात उचंबळल्या. त्याक्षणी त्याने ठाम निश्चय केला की, आयुष्यात काहीतरी करायचेच.

घाटकोपरच्या तारामावशीच्या पुढाकाराने ‘हॅपी होम अंधशाळेत’ तो जाऊ लागला. शिस्तप्रिय मुख्याध्यापिका मेहर बॅनर्जींसह सर्व शिक्षकांनी सागरला स्वीकारले. आठवडाभर वसतिगृहात राहून तो शुक्रवारी मावशीकडे जायचा. परत रविवारी शाळेत! या वाटचालीत संतापी, रागीट सागरचा स्वभाव सहनशील झाला. शाळेत ब्रेल लिपीसह मातीकाम, सुतारकाम, संगीतही शिकला. नाट्यकलाही बहरली. उस्ताद झाकीर हुसेन, संजना कपूर यांच्याबरोबर त्याला सादरीकरण करायला मिळाले. क्लेमाॅडेलिंगसाठी त्याला राष्ट्रीय स्तरावर पहिले बक्षीस, सुवर्णपदक मिळाले. तबला, संगीतातही प्रावीण्य मिळवले. दहावीत प्रथम श्रेणी. रुईया महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतल्यावर इलेक्ट्रॉनिक ब्रेलर मशीनबरोबरच खूप मोठा मित्रपरिवार मिळाला. बारावीच्या परीक्षेनंतर त्याची मित्रमंडळी गावी राहायला आली, तेव्हा परिसरातले लोक सजग झाले, अधिक आपुलकीने वागू लागले.

बुद्धिबळपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावर पहिल्या १५ जणांत येण्याचा मानही सागरला मिळाला. वास्तविक त्याला विज्ञानशाखेची आवड होती, परंतु  अॅक्सेसेबल इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतानाही, दृष्टिहीनांना विज्ञानशाखेत प्रवेश दिला जाणार नाही, असे त्याला सांगितले गेले. शिकता शिकता तो ‘इन्शुरन्स एजन्सी’ चालवू लागला.

संगणक, टेपरेकॉर्डर, रेडिओ दुरुस्ती अशी सर्व कामे तो छंद म्हणून करू लागला. सुटे भाग आणून चार्जेबल ट्युबलाईट्स, दिवे, टाॅर्च बनवू लागला.  कच्च्या मालासाठी, ग्रँटरोडहून सुटे भाग घेऊ लागला. सागरच्या प्रामाणिक वृत्तीमुळे दुकानदार त्याला उत्तम प्रतीचा माल देऊ लागले, जेणेकरून त्याला दहिसरहून परत परत माल बदलायला यावे लागू नये. लाखो रुपयांचा माल ते त्याला उसना देऊ लागले. उलट नवीन काही वस्तू आल्यास ते त्याला आवर्जून कळवू लागले.  ‘विजेची उपकरणे हाताळताना शॉकची भीती वाटत नाही का?’ या प्रश्नावर सागर हसून म्हणाला, “अहो, हात न भाजता सोल्डरिंग करतो मी!” ‘Shock Proof India’ हे माझे स्वप्न आहे. भारतात खूप लोक शॉक लागल्याने मरतात.  त्याचे मुंबईतील राहते घर व नवखारमधील घर सौरऊर्जेवर चालत आहे.

सोलारवर चालणाऱ्या वस्तू, चार्जेबल रेडिओ, ब्लूटूथ स्पीकर, चार्जेबल दिवे, ट्युबलाईटस, टाॅर्च, सोलार शिलाई मशीन अशा विविध वस्तू सागर बनवतो आणि दुरुस्तही करतो. त्याने खास स्वत:साठी टेस्टरला दिव्याऐवजी बीपर, तसेच धन/ऋण ओळखण्यासाठी व्हायब्रेटर अशा अनेक वस्तू बनवल्या आहेत. दृष्टिहीन असूनही डोळसपणे इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करणारे सागर पाटील हे भारतातील पहिले अंध व्यावसायिक असावेत. सागरने बनवलेल्या ह्या वस्तू टाटा पॉवर, महेंद्र अँड महेंद्र, बेस्टमधील कामगार आणि सामान्य व्यक्तीही वापरतात. तसेच वैद्यकीय तपासणीसाठीसुद्धा अनेक डॉक्टर त्याच्या रिचार्जेबल टॉर्चचा वापर करतात.
जनसामान्यांना तंत्रज्ञान, सौरऊर्जा, एल.इ.डी., शेती, पर्यटन याबाबतीत  मार्गदर्शन व अर्थार्जनासाठी मदत करणे, हे उद्दिष्ट ठेवून सागरने मध्यंतरी सागरने इलेक्ट्रिकच्या वस्तू (LED Bulb) व  विशेषत: दिव्यांच्या माळा बनविण्याचे प्रशिक्षण खास अंध व्यक्तींना देणारी कार्यशाळा पुण्यात घेतली.

रुईया महाविद्यालयात असताना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मिळालेल्या सागरची ‘कधीही पुरस्कारासाठी अर्ज करणार नाही’ अशी ठाम भूमिका आहे. सागरच्या या प्रवासात हिमालयासारखी खंबीरपणे उभी असलेली आई, पत्नी नेत्रा, छोटा पार्थ, सागरचा मित्रपरिवार आणि कॉलेजमधील शिक्षक सदैव पाठीशी असतात.

सोसलेल्या माणसांचे, साहस सारे झेलताना,
तेच उद्यमी लावतील, दीप रात्री आपुल्या उशाला

हे शब्द खरे करणारा, अक्षय ऊर्जा उरात असलेला, डोळस माणसालाही लाजवेल असा सागर अनेकांसाठी वाटाड्या ठरो!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link