Next
छुपी, धारदार ‘तलवार’ श्रेणी
समीर कर्वे
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this storyभारतातून सौदी अरेबियाकडे निघालेल्या ‘एमव्ही जग अमर’ या मालवाहू जहाजाला सोमालियन चाच्यांनी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एडनच्या आखातापाशी लक्ष्य केले होते. छोट्या बोटीच्या आधारे ‘एमव्ही जग अमर’चा ताबा घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र या जहाजाला संरक्षण पुरवणाऱ्या भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिशूल या युद्धनौकेने चाच्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. ‘आयएनएस त्रिशूल’वरून हेलिकॉप्टरद्वारे मरीन कमांडोज रवाना झाले आणि त्यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत यश आल्यावर त्रिशूलच्या नौसैनिकांनी त्यांच्या ब्रीदाचा जयघोष केला असणार, दुश्मन का नाश समूल, त्रिशूल त्रिशूल त्रिशूल!

सध्या ‘हाऊज द जोश’ ही युद्धआरोळी सर्वांना परिचित आहे. त्याचप्रमाणे ‘आयएनएस तलवार’ या श्रेणीतील आयएनएस त्रिशूलची ही अशी युद्धआरोळी आहे. ‘आयएनएस त्रिशूल’चे कप्तान अजय शुक्ला सांगत होते. चाचेगिरी हाणून पाडण्याची कारवाईही या सक्षम फ्रिगेटमुळेच शक्य झाली, असे ते अभिमानाने सांगतात. ‘आयएनएस त्रिशूल’ने या वर्षी नौदलदिनी नौदलप्रमुखांकडून मिळणाऱ्या सर्वोत्तम युद्धनौकेचा चषक पटकावला. चपळाई, धारदार शस्त्रास्त्रे आणि तरीही शत्रूच्या टेहळणीच्या कचाट्यापासून दडून राहण्याची क्षमता ही तलवार श्रेणीची खुबी आहे. तलवार श्रेणीतील युद्धनौका या फ्रिगेट प्रकारातील आहेत. स्टेल्थ म्हणजेच शत्रूच्या रडारच्या कक्षेत सहजासहजी न येण्याचे तंत्र भारतीय नौदलात आणण्याचे वारे तलवार श्रेणीपासून वाहू लागले.

 तलवार श्रेणीमध्ये आयएनएस तलवार (कमिशनिंग १८ जून २००३), त्रिशूल (२५ जून २००३), तबर (१९  एप्रिल २००४), तेग (२७ एप्रिल २०१२), तरकश (१२ नोव्हेंबर २०१२) व त्रिकंड (२९ जून २०१३) या शस्त्रांचे नामकरण असलेल्या फ्रिगेट प्रकारातील युद्धनौका आहेत. यापूर्वी आपण विनाशिकांच्या श्रेणीविषयी माहिती घेतली आहे. आता फ्रिगेट या बहुउद्देशीय परंतु विनाशिकांपेक्षा आकाराने थोड्याच लहान युद्धनौकांच्या श्रेणीविषयी. आरमार व नौकाबांधणी अभ्यासक डॉ. द. रा. केतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ व्या शतकात तीन डोलकाठ्यांवरची अनेक शिडे व पुढे त्रिकोणी शिड आणि त्यावर चाकांच्या तोफा असलेल्या नौकांना फ्रिगेट संबोधले जायचे. १८४६ च्या दरम्यान वाफेवर चालणाऱ्या फ्रिगेट्सही आल्या. तोफा आणि चपळाई हे त्यांचे वैशिष्ट्य असे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात फ्रिगेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. फ्रेंच नौदलात विनाशिकांना डी आद्याक्षर लावले, तरी त्यांचा उल्लेख फ्रिगेट असाच केला जातो. फ्रेंच लाफाएट श्रेणीद्वारे फ्रिगेट श्रेणीमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान आले, असे म्हटले जाते.  भारतात ब्रिटिश लिएंडर श्रेणीवर आधारित नीलगिरी श्रेणीच्या युद्धनौका व पुढे स्वदेशात बांधणी केलेल्या गोदावरी श्रेणीतील गंगा, गोमती, गोदावरी या साडेतीन हजार टनांपर्यंतच्या युद्धनौका फ्रिगेट्स प्रकारातील होत्या. १९९० च्या काळात भारतातही स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट्स असाव्यात, हा विचार पुढे आला. ते प्रत्यक्षात उतरण्यास २००० साल उजाडले. स्टेल्थ म्हणजे नेमके काय? स्टेल्थचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या युद्धनौकांचा विशिष्ट आकार. चौकोनांचे कोन रडारच्या टेहळणीकक्षेत येतात, त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे, तिथे हे कोन कापून तसा आकार देण्याचे तंत्र स्टेल्थसाठी वापरले जाते. त्यामुळे ही नौका रडारवर पटकन दिसत नाही. त्याचबरोबर तिचा आवाज कमी करणे व तिच्यातून बाहेर येणारी गरम हवा आटोक्यात ठेवणे, हेही तिच्या हालचाली गोपनीय ठेवण्यासाठी केले जाते.
तलवार श्रेणीतील भारतीय नौदलातील पहिल्या स्टेल्थ फ्रिगेट या रशियन बनावटीच्या क्रिवाक श्रेणीतील युद्धनौका आहेत. तलवार श्रेणीतील फ्रिगेट ४ हजार टनांच्या असून त्यावर श्टील१ ही मध्यम पल्ल्याची विमानवेधी क्षेपणास्त्रे आहेत. त्याचप्रमाणे जहाजविरोधी प्रकारातील आठ क्लब क्षेपणास्त्रे त्यावर आहेत. रॉकेट लाँचर, पाणबुडीचा वेध घेणारे पाणतीर, विमानवेधी इग्ला तोफ असा शस्त्रसंभार आणि जोडीला टेहळणी व प्रहाराची शक्ती वाढवणारे हेलिकॉप्टर त्यांच्यावर आहे. कामोव्ह २८, कामोव्ह ३१ किंवा चेतक हेलिकॉप्टर त्यांच्यावर असते. या फ्रिगेट्सचा वेग ताशी कमाल ३२ सागरी मैल आहे.
पारंपरिक सागरी युद्ध, चाचेगिरीच्या मुकाबल्यासारखी पहारेकऱ्याची भूमिका, शोध व बचावकार्य आणि राजनैतिक मोहिमांवर आपल्या राष्ट्राचा ध्वज फडकावत ठेवण्याची कामगिरी अशा चारही जबाबदाऱ्यांसाठी या फ्रिगेट सक्षम आहेत, असे कॅप्टन अजय शुक्ला यांनी सांगितले. ४ डिसेंबर २०१७ च्या नौदलदिनी आयएनएस त्रिशूल सलाला ओमानमध्ये गेली होती, तेव्हा भारतीय वंशाच्या २ हजार लोकांनी तिला भेट दिली, ही झाली तिची राजनैतिक सन्मानवृध्दीची भूमिका. 

गेल्या दशकभरापासून तलवार श्रेणीतील फ्रिगेट्सनी अरबी समुद्रापासून हिंदी महासागरापर्यंतच्या क्षेत्रातील सोमाली चाचेगिरीचा बीमोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. वर्षातले २०० दिवस या युद्धनौका समुद्री कामगिरीवर तैनात असतात. आयएनएस तबरने नोव्हेंबर २००८ मध्ये एडनच्या आखाताजवळच चाच्यांची एक मदरशिप बुडवण्याची कामगिरी केली होती. आयएनएस तलवारनेही २००९ मध्ये चाच्यांना अद्दल घडवली होती. यादवीग्रस्त येमेनमधून भारतीयांच्या सुटकेसाठी आखण्यात आलेल्या ऑपरेशन राहतमध्ये आयएनएस तरकशने योगदान दिले होते.  भारतीय नौदलात स्टेल्थ फ्रिगेट्सचे पर्व सुरू करणाऱ्या तलवार श्रेणीने हिंदी महासागरात आपले अस्तित्व वाढवण्यास मदत केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link