Next
कडवा लढवय्या
रविराज गायकवाड
Friday, July 19 | 04:00 PM
15 0 0
Share this story


रविवार, १४ जुलै २०१९.

लंडनमध्ये सेंट जॉन्स वूड रोडवर क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर वर्ल्ड कपची फायनल सुरू होती. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष त्या मैदानाकडं होतं. त्याच वेळी लंडनमध्येच विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर टेनिस जगतातील दोन वाघांची झुंज सुरू होती. सर्बियाचा नोवाक ज्योकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर. मैदानावर रॉजरच्या समर्थकांची संख्या जास्त होती. त्यामुळं ‘रॉजर, रॉजर’च्या घोषणा सुरू होत्या. परंतु, त्यांना प्रत्युत्तर केवळ जोरदार फटक्यांनी मिळत होतं. एका क्षणी ज्योकोविचनं ‘रॉजर, रॉजर’ असं ओरडणाऱ्यांकडं एक नजर टाकलीदेखील. अर्थात ते शांत झाले नाहीत. ज्या वेळी ज्योकोविचनं सामना जिंकला त्या वेळी ‘रॉजर, रॉजर’ ओरडणारेही उठून उभे राहत टाळ्या वाजवू लागले. एखाद्या खेळाडूच्या विजयाला त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे समर्थक दाद देतात तेव्हा त्या खेळाडूची महानता सिद्ध होते…

ज्योकोविच किती मोठा खेळाडू आहे, हे सांगण्यासाठी इतकं उदाहरण पुरेसं आहे. ज्योकोविचच्या बाबतीत असं एकदा घडलं होतं. २०१३ मध्ये विम्बल्डनमध्येच नोवाक ज्योकोविच आणि अँडी मरे यांच्यात फायनल झाली होती. अँडी मरे ब्रिटनचा त्यामुळे मैदानावर त्याला सर्वाधिक पाठिंबा होता. त्याचा परिणाम ज्योकोविचच्या खेळावर झाल्याचं दिसून आलं होतं. अँडी मरेपेक्षा कितीतरी पटीनं क्षमता असलेल्या ज्योकोविचनं तो सामना ६-४, ७-५, ६-४ असा सरळ सेटमध्ये गमावला होता. या वेळीही तसं होईल का, अशी पुसटशी शंका मनात उपस्थित झाली होती. परंतु, गेल्या सहा वर्षांत ज्योकोविचमध्ये झालेला बदल तो हाच असल्याचं यंदाच्या फायनलमधून दिसून आलं.

कोणत्या खेळाला जास्त स्टॅमिना लागतो? हॉकी, फूटबॉल, टेबल टेनिस, क्रिकेट, बुद्धिबळ? बरेच खेळ सांघिक आहेत. त्यामुळं त्यांची तुलना करणे सयुक्तिक ठरत नाही. गांभीर्यानं विचार केला तर टेनिस कोर्टवर तीन-तीन, चार-चार तास उभं राहणं हे सगळ्यांत कठीण काम आहे. त्यातही एखादी मॅच पाच तास चालली तर, त्या खेळाडूचं काय होत असेल हे त्यालाच माहीत. अर्थात शरीराला ताण देण्याची सवय या खेळाडूंना असते. यंदाच्या विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर आणि नोवाक ज्योकोविच यांच्यात ४ तास ५७ मिनिटं सामना रंगला. एखाद्या क्रिकेट वर्ल्डकपची फायनल जशी व्हायला हवी तशी ती इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाली. त्याच पद्धतीनं विम्बल्डनची फायनल फेडरर आणि ज्योकोविच यांच्यात झाली. फेडरर ३७ वर्षांचा. आजवर सर्वांधिक २० ग्रँडस्लॅम पदकं घेतलेला हा खेळाडू मैदानावर उतरतो आणि स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचतो हीच बाब त्याच्या जिगरबाज प्रवृत्तीची साक्ष देते. फेडरर महान आहेच. जर, फेडरर जिंकला असता तर, हा लेख त्याच्यावर लिहिला गेला असता. परंतु, खेळामध्ये ‘जो जिता वही सिकंदर’. त्यामुळं आज वेळ ज्योकोविचची आहे. 

पुरुषांच्या टेनिस जगतात सध्याच्या घडीला नोवाक ज्योकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे तीन महान खेळाडू. आंद्रे आगासी आणि पीट सॅम्प्रसचा काळ संपत आला आणि रॉजर फेडररचा काळ सुरू झाला. २००३ मध्ये फेडररनं पहिल्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर नदाल आला. त्यानंतर २००५ मध्ये नदालनं पहिल्यांदा क्लेकोर्टवर फ्रेंच ओपनमधून आपलं ग्रँडस्लॅमचं खातं उघडलं. त्यानं फेडररचा वारू फ्रेंच ओपनमध्ये रोखला आणि त्यानंतर आला नोवाक ज्योकोविच. त्याचं ग्रँडस्लॅम खातं उघडलं २००८ मध्ये. फेडरर आणि नदाल यांच्यापेक्ष ज्योकोविच नवखा. पण, गेल्या दहा-अकरा वर्षांत नदाल आणि फेडररला कोर्टवर कोणी दमवलं असेल तर ते एकट्या ज्योकोविचनं. अनेकदा त्या दोघांच्या तोंडचा घास ज्योकोविचनं हिरावून घेतलाय. फेडरर २० आणि नदाल १८ ग्रँडस्लॅम घेऊन बसले असले तरी, ज्योकोविचनं १६ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावून आपण या रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. युरोपमधील सर्बियासारख्या टिकलीएवढ्या देशातून ज्योकोविच आला आणि त्यानं टेनिसचं अख्खं जग गाजवलंय. आज, ज्योकोविचमुळं गुगल मॅपवर सर्बिया देश शोधला जातोय.

ज्योकोविचनं त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दम्याचा त्रास असेल किंवा जायबंदी होणं, त्याचं करिअर चढ-उतारांनी भरलेलं आहे. एखाद्यानं ज्योकोविच संपला असं म्हणावं आणि त्यानं पुन्हा उफाळून यावं, असं अनेकदा झालं. मुळात २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून पहिलं ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ज्योकोविचला दुसरा ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी तीन वर्षे लागली. ज्योकोविचची कारकीर्द एखाद-दुसऱ्या ग्रँडस्लॅमपुरती मर्यादित राहिली, असे वाटत असताना त्यानं अनेकांचे अंदाज खोटे ठरवले. आज तो महान खेळाडूंच्या पंक्तीत बसला आहे. त्याच्या क्षमतेला, कौशल्याला नदाल आणि फेडररचे कट्टर चाहतेही नाकारत नाहीत. लांडगा हा प्राणी आपल्याकडं लबाड म्हणून, ओळखला जातो. ज्योकोविच याच्या सर्बियाचा लांडगा हा राष्ट्रीय प्राणी. ज्योकोविचही तसाच लबाड, टेनिस कोर्टबाहेर स्वच्छंदी जगणारा मात्र, कोर्टवर पाऊल ठेवल्यानंतर चिवट झुंज देऊन प्रतिस्पर्ध्याची लीलया शिकार करणारा. तितकाच भेदक आणि चपळही. आता हा सर्बियन लांडगा अजून किती शिकारी करतो, हे ज्योकोविचच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. 

कसा आहे ज्योकोविचचा खेळ?

अटीतटीच्या सामन्यांमध्ये ज्योकोविच पहिला सेट एकतर्फी जिंकतो आणि दुसरा सेट तेवढा एकतर्फी गमावतो. तिसरा सेट मात्र ज्योकोविचचाच असतो, असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. प्रत्यक्ष कोर्टवर त्याची जी काही घालमेल सुरू असते, ती स्कोअर बोर्डवर दिसत असते. ज्योकोविचला क्ले कोर्टवर फारसं यश आलेलं नसलं तरी (अपवाद २०१६च्या विजेतेपदाचा) त्याला ‘ऑल कोर्ट प्लेअर’ असं संबोधलं जातं. ज्योकोविच हा बेसलाईन प्लेअर असून, आक्रमकही आहे. त्यांच दोन्ही हातांनी येणारे ग्राऊंडस्ट्रोक्स प्रतिस्पर्ध्यांना निरुत्तर करतात. त्याचा टेनिस कोर्टवरचा वावर त्याला आणखीनच उजवा ठरवतो. ज्योकोविचचा बॅकहँड सध्याच्या घडीचा सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं. त्याची सर्व्हिस हे त्याचे सर्वांत मोठे शस्त्र आहे. त्याद्वारे तो अनेकदा फ्री पॉइंट्स मिळवून जातो. 

बोरिस बेकरचे कोचिंग

बोरिस बेकर टेनिस जगातील महान खेळाडूंपैकी एक. निवृत्तीनंतर बीबीसीसाठी कॉमेंट्री करणाऱ्या बेकरला ज्योकोविचने डिसेंबर २०१३मध्ये आपला मुख्य प्रशिक्षक घोषित केले होते. ज्योकोविचने आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून ही घोषणा केली होती. त्या वेळी अनेकांनी बेकरच्या नियुक्तीवर ज्योकोविचला वेड्यात काढलं होतं. परंतु, त्यानं बेकरवर विश्वास ठेवला. केवळ २०१४ च्या हंगामासाठी ही घोषणा केली होती. पण, गुरु-शिष्याचं हे नातं पुढं काही काळ घट्ट राहिलं. डिसेंबर २०१६ मध्ये दोघांनी व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आणला. या काळात बेकरच्या मार्गदर्शनाखाली ज्योकोविचनं सहा ग्रँडस्लॅम आणि १४ मास्टर्स टायटल जिंकली आहेत. बेकरच्या मार्गदर्शनाखालीच ज्योकोविचमध्ये एक प्रगल्भता आल्याचं मानलं जातं.  

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

 उल्लेखनीय 
  • सर्वाधिक सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा एकमेव टेनिसपटू. 
  • तीन वेगवेगळ्या टेनिस कोर्टवर सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा एकमेव टेनिसपटू. 
  • करिअरमधील १६ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये केवळ एकदाच फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर विजय (२०१६).
  • क्ले कोर्टवर हुकूमत गाजवण्यात आले अपयश. 

 ग्रँडस्लॅम कामगिरी

  • ऑस्ट्रेलियन ओपन :  २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९.
  • फ्रेंच ओपन : २०१६.
  • विम्बल्डन : २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९.
  • अमेरिकन ओपन : २०११, २०१५, २०१८.
वर्षभरात दमदार कामगिरी

जानेवारी २०१८ मध्ये त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली होती.  
शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांत पुन्हा सुरू केला सराव.
गेल्या ३४ पैकी ३३ सामन्यांमध्ये ज्योकोविचने विजय मिळवला आहे.
यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये सेमिफायनलमध्ये तो पराभूत झाला.
वर्षभरात खेळलेल्या ५ पैकी ४ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजेतेपद.
यात दोन विम्बल्डन, एक अमेरिकन आणि एका ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश.
२०१४-१५ नंतर २०१८-२०१९ सलग दोन वर्षे विम्बल्डन जिंकण्याची ज्योकोविचची दुसरी वेळ. 

काय म्हणाला ज्योकोविच?

“ पाचवा सेट तुफानच होता. मॅच कोणत्याही क्षणी कोणाच्याही हातात जाऊ शकत होती. मी कदाचित लवकर मॅच जिंकली असती. परंतु  विम्बल्डनची फायनल आणि समोर रॉजरसारखा प्रतिस्पर्धी असल्यामुळं हे अपेक्षितच होतं. या सेटमध्ये मी दोन वेळा मॅच पॉइंट गमावले. त्यानंतरही स्वतःवर विश्वास ठेवला होता. मला माहीत होतं की, मी क्षमतेपेक्षा कमी खेळत आहे. हा विश्वासच मला पुढं घेऊन गेला. गेल्या वर्षभरात खूप चांगलं काही घडलं आहे. मी केवळ ग्रँडस्लॅम स्पर्धांवर लक्ष केंद्रित केलंय. त्याचा फायदा होताना दिसत आहे. मी माझ्यातील १०० टक्के क्षमता कोर्टवर देत आहे. त्याचा परिणाम निश्चितच सुखावणारा आहे.” 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link