Next
नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने…
विशेष प्रतिनिधी
Friday, February 15 | 05:00 PM
15 0 0
Share this story

नाटक आणि राजकारण हे मराठी माणसाचे वेड आहे, असे म्हटले जाते. नेमक्या या दोन्ही विषयांत सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मराठी नाटकांना बहर आला आहे, तर दुसरीकडे राजकारणाचे रंग उधळले जात आहेत. पुढच्या आठवड्यात नागपूर येथे नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यसंमेलन सुरू होत आहे. एकेकाळी चित्रपटांनी नाटकांना झाकोळून टाकले होते, पण आता मराठी नाटक आणि मराठी चित्रपटांची एकमेकांना समांतर अशी वाटचाल चालू आहे. चित्रपटांतील भूमिकेसाठी नाटक टाळणारे कलाकार आता व्यस्त चित्रीकरणातून वेळ काढून नाटकांत आवर्जून काम करू लागले आहेत. मोठ्या व्यावसायिक रंगभूमीबरोबरच छोटी प्रयोगशील रंगभूमीही सध्या क्रियाशील आहे. नाटक आणि चित्रपटांचा अवकाश कमी पडू लागला म्हणून की काय आता टीव्ही मालिका आणि वेबसीरिजचे नवेकोरे दालन या कलाकारांसाठी खुले झाले आहे. मनोरंजनाची माध्यमे पूर्वी कधीही नव्हती इतकी आज बहरात आहेत. याचे श्रेय या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ‘झी’ समूहाला द्यावे लागेल. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात ‘झी’ समूहाच्या टीव्ही वाहिन्यांनी आमूलाग्र क्रांती केली. मराठी भाषा मरणपंथाला लागत असताना ‘झी’ समूहाने आपल्या मराठी वाहिन्यांवर दर्जेदार मराठी कार्यक्रम सुरू करून मराठी भाषेची अनमोल सेवा केली आहे. आज मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांचे राहणीमान अफाट उंचीवर गेले आहे ते त्यामुळेच. ‘झी’ समूहाने टीव्हीच्या क्षेत्रात क्रांती केल्यानंतर डळमळीत अवस्थेत असलेल्या मराठी चित्रपटांनाही आधार दिला आणि आज परिस्थिती अशी आहे, की एकाच आठवड्यात अनेक दर्जेदार व वेगळ्या विषयांना स्पर्श करणारे मराठी चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करू लागले आहेत. मराठी चित्रपटांची ‘लाखाची गोष्ट’ आता ‘कोटींची गोष्ट’ झाली आहे. मराठी मनोरंजनाची ही सर्व क्षेत्रे व्यापल्यानंतर नाटकांच्या क्षेत्रातही ‘झी’ समूह आता आपला ठसा उमटवत आहे. आता मराठी नाटकांना नाट्यगृहे अपुरी पडू लागली आहेत. मराठी नाटक हे असे ऐन बहरात असताना प्रेमानंद गज्वींसारख्या वेगळ्या विषयांवर नाट्यलेखन करून समाजाचे लक्ष वेधणाऱ्या नाटककाराच्या अध्यक्षतेखाली येत्या २२ तारखेपासून नागपूर येथे नाट्यसंमेलन सुरू होत आहे, हे लक्षात घेऊन ‘झी मराठी दिशा’ने या अंकातील ‘नाट्यसंमेलन’ विशेष विभागातून सध्याच्या नाट्यचळवळीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी या क्षेत्रातल्या नामवंतानी लेख लिहिले आहेत. साहित्यसंमेलन किंवा नाट्यसंमेलनात वादप्रतिवाद होत असतात, तसे ते या नाट्यसंमेलनातही कदाचित होतील, पण त्यातून निरर्थक कटुता वाढण्याऐवजी नाट्यचळवळीला पुढे नेण्यास मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. मराठीत सध्या दर्जेदार संहिता नाहीत असा सूर नाट्यनिर्मात्यांकडून ऐकू येतो, त्यामुळे काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नव्या परिवेषात सादर केली जातात. या नाट्यसंमेलनात नवे नाटककार, समाजाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील नाट्यसंहिता लिहिण्यावर विचार व्हावा. मराठीत नाटककारांची उच्च परंपरा आहे. ही परंपरा पेलणे हे मोठे आव्हान आहे. मराठी टीव्ही मालिका, चित्रपटकथा व वेबसीरिज लिहिणारी मंडळी प्रतिभावान आहे, त्यांनी नाट्यलेखनाकडेही तितक्याच गंभीरपणे पाहिले तर नव्या नाट्यसंहितांची समस्या सुटू शकते. मनोरंजनाची माध्यमे वाढत असल्यामुळे संहितांचे माध्यमांतर करण्याचे प्रयोगही होत आहेत. त्यातून नक्कीच नवे काही निर्माण होईल यात काही 
शंका नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link