Next
हिंदुत्वाचा अर्थ
दिनकर गांगल
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story

वसंत जोशी हा माझा साठ वर्षांचा जुना मित्र. तो एलआयसीतून निवृत्त झाला. त्याची नंतरची वीस-बावीस वर्षं ‘रुटीन’ गेली असती, पण त्याला २००३ साली योगसाधनेचा, त्यातही ‘ओंकारा’चा मंत्र गवसला आणि त्याचे आयुष्य पालटून गेले! त्याने तो मंत्रोच्चार पुण्यातील पंधराएक हजार लोकांना गेल्या पंधरा वर्षांत शिकवला आहे व त्यातील बऱ्याच जणांचे म्हणणे असे, की त्यामुळे त्यांचे आयुष्य निरामय-निरोगी बनले आहे.

त्याचा गुरू म्हणजे आमचा दुसरा मित्रच, श्रीकृष्ण मराठे. त्याला चमत्काराने वाटेल अशा रीतीने ती मंत्रसिद्धी प्राप्त झाली. त्याला उच्चपदी नोकरीत असताना अॅडिसन्स डिसीज नावाचा असाध्य रोग झाला. तो कॉर्टिझॉनची गोळी आयात करून, ती नियमित व आयुष्यभर घेतली असता बचावणार होता. तरी त्याची रोगप्रतिकारशक्ती क्षीण झाली होती, म्हणून त्याला बंद खोलीत राहावे लागे. त्याला योगायोगाने बंगलोरच्या ‘प्रशांती आरोग्यधाम केंद्रा’चा पत्ता लागला. केंद्राने प्रयोग म्हणून त्याच्या असाध्य व्याधीवर योगोपचार करण्याचे आव्हान घेतले व त्यातून श्रीकृष्ण मराठे व्याधिमुक्त झाला. तो ‘ओंकारनादसाधने’चा उपासक बनला. त्याने स्वत:ची भर त्या योगोपचार पद्धतीत घातली. त्याला आता बंगलोरला कधी ‘लेक्चर’ला जावे लागते. साधक ठाणे येथे त्याच्या घरी येत असतात, त्याचे ‘माझी आरोग्ययात्रा’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचा त्याच नावाचा ‘व्हॉट्सअॅप’ ग्रूपदेखील आहे. श्रीकृष्ण मराठे त्यांच्यासमवेत माणसाच्या मनाची उन्नती याविषयी चिंतन-मनन व प्रयोगही करत असतो. त्यामधून वेगळ्या पद्धतीची ज्ञाननिर्मिती चालू असते. अशा प्रकारच्या ज्ञानाच्या मापनाची व्यवस्था भारतात विकसित झालेली नाही.

वसंत जोशी, श्रीकृष्ण मराठे यांच्यापैकी कोणी रूढार्थाने धार्मिक-भाविक नाही. परंतु त्यांची श्रद्धा योगपरंपरा व साधना यावर आहे आणि त्यांचा विश्वास तो भारताचा सांस्कृतिक ठेवा होय असा आहे. बहुसंख्य भारतीय हिंदू या देशाच्या वेद-पुराणकाळापासून आलेल्या सांस्कृतिक परंपरेवर विश्वास ठेवतात. त्यांतील बरेच जण त्यांच्या पद्धतीने परंपरेचे पाइक असतात व त्याचवेळी तिचा शोध घेत असतात. आम्हाला ‘थिंक महाराष्ट्र’च्या माहितीसंकलनाच्या मोहिमेत अशी मंडळी भेटतात. तीच गोष्ट भारतीय ख्रिश्चनांची. बहुतेक भारतीय ख्रिश्चनांना येथे धर्मांतर कसे घडले तो इतिहास जसा ज्ञात आहे, त्याचप्रमाणे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतातील सेवाभावास दिशा कशी दिली याचीही जाणीव आहे. बहुसंख्य भारतीय मुसलमान येथेच धर्मांतरित झालेले आहेत. त्यांची मुळे या भूमीतील आहेत. त्यांनी भारताच्या स्थापत्यादी कलावारशामध्ये मोलाची भर घातली आहे. भारतीय पारशी, भारतीय ज्यू, भारतीय जैन, भारतीय शीख, भारतीय बौद्ध अशा प्रत्येक धर्मपंथांची कहाणी वेगवेगळी असेल, पण ती माणसे येथील आहेत. लिंगायतांसारखे ‘हिंदू’ पंथ त्यांना धर्माचे स्थान मिळावे म्हणून मागणी करत आहेत. अशा ऊर्मी-अपेक्षा बदलत्या काळाबरोबर निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या सर्व समाजाच्याच वाढत राहणार आहेत. ते तर प्रगतीचे चिन्ह आहे. म्हणून ‘सबका साथ सबका विकास’सारखी घोषणा सर्वसामान्य माणसाला खुणावते. परंतु माध्यमांतून दिसणारे लाक्षणिक चित्र वेगळाच इशारा देते. ती सूचना एकात्मतेऐवजी दुहीची द्योतक असते. त्यातील महत्त्वाचा घटक असतो, धर्म.

धर्म या देशाचा घात करणार, अशी भीती माझ्या मनात हल्ली कधी कधी तयार होते, कारण देशात हिंदू या शब्दावरून मतप्रवाहांची दोन भिन्न टोके तयार होत आहेत. ढोबळपणे, त्यांना हिंदुत्वानुकूल मत व हिंदुत्वविरोधी मत असे म्हणता येईल. ते मतप्रवाह राष्ट्रीय स्वातंत्र्यचळवळीपासून अस्तित्वात आहेत, परंतु त्यामध्ये कडवटपणा, विखार गेल्या आठ-दहा वर्षांत येऊ लागला आहे. राजकारणात त्यांची विभागणी नरेंद्र मोदी यांना अनुकूल व त्यांना प्रतिकूल अशी जोरजोरात व्यक्त होताना दिसते. मर्कटांनी मद्य प्यावे तशी राजकारण्यांना आणि राजकीय चर्चा करणाऱ्यांना ते हिंदू असल्याची वा सेक्युलर असल्याची झिंग येते आणि माध्यमे, जणू विंचवाप्रमाणे दंश मद्य प्यालेल्या मर्कटांना करत असतात. त्यामधून हलकल्लोळ घडतो. विनाशाची बीजे त्यात आहेत, हे माझे भय.

हे सारे सुरू झाले बाबरी मशीद पडली तेव्हापासून. तो मतांच्या ध्रुवीकरणाचा आरंभबिंदू ठरला. तो रोग तीस वर्षांनंतर पूर्ण पिकला आहे. हिंदू नावाचा धर्म या देशात कधी खरेच अस्तित्वात होता का? मला देवळे दिसतात, देवांच्या पालख्या-काठ्या निघतात, त्यांचे रीतिरिवाज असतात. बुवा कीर्तने-प्रवचने करतात. सध्या नामस्मरणाचे चलन जास्त प्रचलित आहे. परंतु त्यात धर्म कोठे असतो? तीन जगतगुरू सांगितले जातात- त्यात आपले तुकोबा तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयी भावरूपाने असतात. तो भाव संस्कृतीचा असतो आणि ते सारे मार्ग मोक्षाच्या म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या दिशेने असतात.

हिंदू संस्कृती या नावाखाली या देशात अनेक उपासनापंथ दोन हजार वर्षें सुखाने नांदले. त्यांच्यामध्ये स्थानिक पातळीवर कधी वितंडवाद होऊन मारामाऱ्या घडून गेल्या. देशपातळीवर म्हणावे असेही संघर्ष शैव-वैष्णवांचे झाले. त्यातून पोटपंथ निर्माण होत गेले. परंतु त्यांची बाधा देशाच्या दैनंदिन व्यवहारात व प्रगतीत फार कधी आली नाही. काही राजांनी कधी लोकांच्या सांस्कृतिक भावविश्वात ढवळाढवळ केलीही; पण त्यातूनच तावूनसुलाखून निघाल्यामुळे, धर्माच्या बाबतीत भारतात एवढी लोकशाही आहे, की जवळजवळ प्रत्येक कुटुंब ‘धर्म’ या नावाखाली त्याला हवे तसे वर्तन करू शकते, त्या कुटुंबात परंपरा या शब्दाचा अर्थ न जाणता हव्या त्या रूढी पाळल्या जातात. त्यामधून कोठे अंधश्रद्धांना पेवही फुटते. भारतातील ख्रिश्चन, मुस्लीम व अन्य धर्मीयांतही स्थानिक संस्कृतीतील तशाच अंधश्रद्धा आढळतात. वास्तविक त्यांच्या त्यांच्या मूळ धर्मात शिस्त आहे – विधींचे कठोर नियम ठरवले गेले आहेत. परंतु त्यांनी भारतात धार्मिक वर्तनातील लवचीकता स्वीकारलेली दिसते. वसईतील ख्रिश्चन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यातील एक गट स्वत:ला सामवेदी म्हणवतो आणि वसईच्या एकूण धर्मगुरूंनी मराठी ज्ञानोपासनेत फार मोठी भर घातली आहे.  हिंदू संस्कृतीत सगळ्या गैरवर्तनास माफी आहे, प्रायश्चित्त घेता येते व उ:शापही लगेच मिळू शकतो. तशी उदारता व सर्वसमावेशकता हा तर या भूमीचा गुण आहे. बाबरी मशीद घटनेनंतर भाजप सत्तेत आला त्या बेताची गोष्ट. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी एका टेलिव्हिजन चर्चेत हिंदू संस्कृती असेच वर्णन मनी धरून हिंदू-ख्रिश्चन, हिंदू-मुसलमान, हिंदू-ज्यू असे नामोल्लेख केले होते. मी जेव्हा विचारी भाजप पुढाऱ्यांशी वा प्रवक्त्यांशी त्याबाबत बोललो तेव्हा त्यांनाही ते वर्णन मान्य दिसले. माझे त्यांना सांगणे असते, की ‘हिंदू’ याऐवजी ‘भारतीय’ हा उल्लेख त्या ठिकाणी यथार्थ होईल आणि मग या देशातील हिंदूंचे वर्णनदेखील भारतीय हिंदू असे होऊ शकेल. तशी तर सनातन, हिंदू अशा संज्ञांवरून येथे इतकी मतभिन्नता आहे, की त्यावरूनसुद्धा अटीतटीच्या फळ्या पडू शकतील. सावरकर भारतीय राष्ट्रनिष्ठेला ‘हिंदू’ म्हणतात, पण ज्या नावाचे राष्ट्रच अस्तित्वात नाही त्याचा अभिमान करण्यापेक्षा भारत या नावाचा गौरव अधिक राष्ट्रीय स्वरूपाचा ठरणार नाही का? आणि सावरकर यांनाही अंतिमत: हिंदू अथवा भारतीय यापेक्षा ते ‘मनुष्य’ आहेत व ‘माणुसकी’ हाच त्यांचा धर्म आहे असे वाटत होते; त्यांचाही बदललेल्या सद्यपरिस्थितीत ‘हिंदू’ हा आग्रह राहिला नसता कदाचित!

जगातील वेगवेगळ्या संस्कृती नष्ट झाल्या, परंतु भारतीय संस्कृती टिकली, कारण ती काळानुसार बदलत गेली. भारतीय जीवनशैली या भूमीत येथील भूगोल व हवामान यानुसार निर्माण झाली. गेल्या चार-पाचशे वर्षांत भारतात आलेले पाश्चात्त्य विचार स्वागतार्हच होते. त्यातून भारताला स्वातंत्र्याचे मोल कळले, परंतु त्यापाठोपाठ आलेले पाश्चात्त्य विषम हवामानातील जीवनशैलीचे अंधानुकरण भारतीयांचा आत्मविश्वास गमावण्यास कारण बनले आहे. भारताने विज्ञानाचा अंगीकार केला हीदेखील कौतुकाची गोष्ट, परंतु तंत्रज्ञानाचा अंधपणे केलेला स्वीकार धेडगुजरीपणाचा होऊन गेला आहे. सिमेंटची दोनशे वर्षांपूर्वी झालेली आयात ही येथील पर्यावरणाच्या विनाशास सुरुवात करणारी ठरली असे म्हणतात. राहणी पाश्चात्य संस्कारांची, मुखी विचार पाश्चात्त्य भूमीत विकसित झालेले आधुनिक आणि मने मात्र पुरातन भारतीय विचारांत गुंतलेली, अशी विसंगती गेली दोन शतके भारतीय जनता सहन करत आहे.

वास्तविक हिंदू या नावाने जी संमिश्र भारतीय जीवनशैली या देशात घडली आहे ती विलोभनीय आहे. ती निसर्गानुकूल आहे. पर्यावरणास अभिमुख आहे. सर्व सणवारांची मांडणी तशी झाली आहे. गावोगावच्या यात्राजत्रा या संमिश्र असतात. गेल्या दोन हजार वर्षांत प्रथम बेने इस्रायली आणि इराणमधून पारशी लोक येथे आले. ते येथे समरसून गेले. नंतर मुसलमान आले. त्यांनी येथील कलाविश्वात मोठी भर घातली. एकाच वेळी देशातील प्रत्येक समुदायाने स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवून एकत्र जगण्याचा अभूतपूर्व प्रयोग या देशात घडून आला आहे. त्यातून संगीत, स्थापत्यादी कला, योग-आयुर्वेदासारखे विज्ञान अशा मोठ्या, जगाला मार्गदर्शक परंपरा निर्माण झाल्या आहेत. स्वातंत्र्यचळवळीने त्या सर्वांमधील एकात्मतेला आणखी अर्थ मिळवून दिला, परंतु नंतरच्या राजकारणाने, विशेषत: निवडणुकांनी मात्र त्यांतील जाती-धर्म-पंथ यांचा वेगवेगळेपणा गोंजारत समाजात दुही निर्माण केली आहे. तिला तीव्र मतभिन्नतेने प्रखरता लाभली आहे.

समाजातील निष्पक्ष, जागरूक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. त्यांनी भारतीय इतिहासाचा व वर्तमानाचा स्वतंत्र बुद्धीने विचार करून, स्वत:चे ठाम मत मांडण्याची वेळ आली आहे. अन्यथा विचारांची ही यादवी देशाचा वारसा उद्ध्वस्त करील. अलेक्झांडर-सिकंदर यांच्यासारखे जगज्जेते सम्राट इतिहासाच्या अभ्यासात फक्त राहिले आहेत आणि शेक्सपीयर, तुकाराम (विंदा करंदीकर यांच्या भाषेत विल्या व तुक्या) यांच्यासारख्या संवेदनाशील व्यक्ती लोकांची मने पिढ्यानुपिढ्या समृद्ध करत आहेत. भारतीय संस्कृतीचे संचित ते आहे. मराठे-जोशी यांच्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींचे जीवन तोच सांस्कृतिक वारसा अर्थपूर्ण करत असते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link