Next
सौंदर्यस्पर्श
मनीषा सोमण
Friday, October 04 | 03:30 AM
15 0 0
Share this story

हॅलो मनीषा, मी माया बोलतेय...’ साधारण २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी सात-साडेसात वाजता फोन आला... माया नावाची माझी कोणीच मैत्रीण नव्हती, मग कोण बोलत असावं? मला काहीच उलगडा होईना.... कोण बोलत असावं याचा अंदाज घेतच मी म्हणाले, ‘नाही...’
‘ओळखलं नाहीस का? अग मी माया... माया परांजपे!’
त्या गेल्याची बातमी ऐकली तेव्हाही त्यांचं ते पहिल्यांदा ऐकलेलं फोनवरचं वाक्य जसंच्या तसं मनात पुन्हा उमटलं!...
वयानं आणि कतृत्त्वानंही  मोठ्या असलेल्या बाई स्वत:ची ओळख ‘माया...’ म्हणून करून देत असत.
पुण्याच्या वैद्यकीय पार्श्वभूमी असणाऱ्या तुळपुळे यांच्या घरात जन्माला आलेल्या मायाताईंना लहानपणापासूनच व्यवसायाचे धडे मिळाले होते. वडिलांना वैद्यकीय व्यवसायात फारसं स्वारस्य नसल्यानं मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून ते हॉटेलक्षेत्रात उतरले. त्यांच्या वडिलांचं पुण्यातलं ‘बॉम्बे रेस्टॉरंट’ इतकं लोकप्रिय होतं की त्यावेळी ना.सी. फडके यांच्या एका कादंबरीतही त्यांच्या या रेस्टॉरंटच्या नावाचा उल्लेख आहे. त्या जेमतेम सात वर्षांच्या असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आईनं ते रेस्टॉरंट चालवलं.
तिथेच आपल्या पायावर उभं राहाण्याचा आणि व्यावसायिक वृत्तीचा पाया घातला गेला. बी.एससीचं शिक्षण पूर्ण होतानाच विजय परांजपे यांच्याशी लग्न होऊन त्या जिनिव्हाला गेल्या. पुण्याहून थेट जिनिव्हाला गेलेली, धड इंग्रजीही बोलता न येणारी मुलगी तिथे सायनॅमाईडमध्ये नोकरी करू लागली.  
पुढे मुंबईत स्थाईक झाल्यावरही त्या ‘ओव्हेशन इंटरनॅशनल’ कंपनीत नोकरी करू लागल्या. इथेच त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. त्या कंपनीला ब्युटी पार्लर सुरू करायची होती म्हणून काही मुलींना ट्रेनिंगसाठी निवडलं, त्यात मायाताईंना संधी मिळाली. १९६६साली त्यांनी ब्युटीशिअनचं ट्रेनिंग घेतलं. ती कंपनी बंद पडल्यानं त्यांना अनुभव घेण्याची संधी मिळाली नाही, म्हणून त्यांनी घरातच पार्लर सुरू केलं. घर-दोन मुलं सांभाळून होईल तितकं काम करत होत्या. परंतु या क्षेत्रातलं फारसं ज्ञान नसल्यानं व्यवसाय वाढवणं शक्य नव्हतं.
हे लक्षात आल्यावर यजमानांच्या पाठिंब्यानं आणि मुलांची जबाबदारी घ्यायला आई असल्यानं त्या १९७१साली लंडनला जाऊन सौंदर्यशास्त्रातील उच्चशिक्षण घेऊन आल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ‘ब्युटीशिअन’ या त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आजच्या सुप्रसिद्ध ‘ब्युटीक ब्युटी पार्लर’चा जन्म झाला.
थोड्या कालावधीत त्यांनी एकाची दोन पार्लर केली. व्यवसायाचा पसारा वाढत असतानाच, रसायनशास्त्राचा विशेष अभ्यास असणाऱ्या त्यांच्या यजमानांनी, काही सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती केली. त्याकाळी आपल्याकडे अधिकतर परदेशी सौंदर्यप्रसाधनं मिळत. ती खूप महाग असत. त्यामानाने  मायाताईकडची सौंदर्यप्रसाधनं स्वस्त होती आणि दर्जेदारही होती. पुणे आणि मुंबईत पार्लरची तसेच ब्युटी प्रॉडक्टची चांगली घडी बसली आहे असं वाटत असतांनाच अचानक सगळंच ठप्प झालं ते विजयजींच्या अचानक निधनानं. आणखी काही ब्युटी प्रॉडक्ट बाजारात आणण्याचं त्यांचं स्वप्न काही सत्यात उतरू शकलं नाही, पण मायाताईंना पार्लरच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही.
विविध देशांत जाऊन त्यांनी सौंदर्यशास्त्रातले अनेक कोर्स केले. या क्षेत्रातलं जितकं शक्य होतं तितकं सगळं शिक्षण घेतलं. त्याचा इथल्या त्यांच्या क्लायंटना उपयोग तर झालाच, त्याचवेळी त्यांच्याकडे काही मुली प्रशिक्षणासाठी विचारणा करू लागल्या. ‘ब्युटीक’ पार्लर, सौंदर्यप्रसाधनं याचबरोबर ‘ब्युटीक इन्स्टिट्यूट’चीही सुरुवात झाली.
ज्या काळात ब्युटी पार्लर किंवा ब्युटीशिअनकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला नव्हता, त्याकडे उगाचच फॅड किंवा चोचले किंवा चक्क नटवेगिरी म्हणून बघितलं जात असे, त्या काळात मायाताईंनी या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. एक सुशिक्षीत, उच्चमध्यमवर्गीय घरातली स्त्री बायको-सून-आई या जबाबदाऱ्या पार पाडत या व्यवसायात जम बसवू शकते, तर मग आपली लेक किंवा सूनही या व्यवसायात आली तरी चालेल, हा विश्वास त्यांनी मध्यमवर्गीय समाजाच्या मनात निर्माण केला. त्यांनी हजारो मुलींना व्यवसायाची संधी मिळवून दिली. हे सगळ्यात मोठं यश असल्याचं त्या कायम म्हणत. आज जी छोट्या छोट्या गावातल्या गल्लीबोळातही ब्युटीपार्लर दिसताहेत त्याचं सगळं श्रेय मायाताईंना जातं, याबद्दल कोणाचंही दुमत नसेल.
सौंदर्याची निगा आणि संवर्धन या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं काम या क्षेत्रासाठी केलं आहे. ‘सिडेस्को’, ‘बॅबटॅक’ हे सौंदर्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम केवळ त्यांच्या प्रयत्नानं भारतात सुरू झाले. त्यामुळे भारतात प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी जगात कुठेही, इतर कोणतीही परीक्षा न देता ब्युटी सलोन वा पार्लर सुरू करू शकतो! महाराष्ट्र शासनाच्या टेक्निकल कोर्सेमध्ये सौंदर्यशास्त्राची वर्णी लागली तीही केवळ त्यांच्याच प्रयत्नांमुळे. ‘ब्युटीक’ ब्युटी पार्लर, स्पा इन्स्टिट्यूटमधून हजारो मुलं/मुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. या कामगिरीबद्दल मायाताईंना अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत.
मायाताई जितक्या उत्तम व्यावसायिक आणि सौंदर्यशास्त्रतज्ज्ञ होत्या, तितक्याच उत्तम गृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम माणूस होत्या. त्याचा अनुभव मी घेतला आहे. दोन परदेशी ब्युटीशिअन्सबरोबर त्यांच्या खारच्या घरी त्यांनी जेवायला बोलावलं होतं. त्या दिवशीचा सगळा स्वयंपाक मायाताईंनी स्वत:च केला होता. मला अजूनही त्या दिवशीचा बेत लख्ख आठवतोय. बटाट्याचे, पालकचे, पनीरचे वगैरे विविध प्रकारचे परोठे, शिरा आणि मसालेभात. सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट झाले होते. हे त्यांना सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘पदार्थ ढवळताना किंवा परतताना सुटणाऱ्या खमंग दरवळीमुळे तो आपल्याला खावासा वाटला तर समजावं पदार्थ छान झालाय आणि पदार्थ करताना योग्य प्रमाणात तिखट-मीठ-मसाला घालण्याबरोबरच, हा पदार्थ इतरांनी खावा ही इच्छा जर मनात असेल तर साधारणपणे स्वयंपाक बिघडत नाही.’ असा विचार फक्त सुगृहिणीच करू शकते!
तब्येतीनं इतक्या फिट असणाऱ्या, नेहमी प्रसन्न-नीटनेटक्या राहाणाऱ्या, दिलखुलास बोलणाऱ्या मायाताई वयाच्या अवघ्या पंचाहत्तराव्या वर्षी जाव्यात! कदाचित देवालाही त्या तशाच छान, नीटनेटक्या, प्रसन्न असलेल्याच कायम सगळ्यांच्या स्मृतीत असाव्यात, असं वाटत असावं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link