Next
जबाबदारीनं वागण्याचा वसा
डॉ. शिरीषा साठे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पावसानं राज्यात सगळीकडे दाणादाण उडवली आहे. पूर, जुने वाडे कोसळणं, पूल पाण्याखाली जाणं, वाहतुकीची कोंडी होणं अशा बातम्या सध्या रोज वाचत आहोत, बघत आहोत. या बातम्या वाचल्या की निसर्गापुढे माणूस किती खुजा आहे, याची जाणीव होते. याच्या जोडीनं आणखीही काही बातम्या वाचायला मिळतात. त्या वाचून मात्र मनात प्रश्न उभे राहतात. ‘पुराचं पाणी बघायला जमलेल्या लोकांमुळे आणि त्यांनी पार्क केलेल्या वाहनांनी वाहतूककोंडी झाली’, ‘पर्यटकांनी वर्षांसहलीमध्ये दारू पिऊन गोंधळ घातला’, ‘धबधब्याजवळ धोक्याच्या ठिकाणी तरुण मुलं सेल्फी काढण्यात मग्न, अग्निशमनदलाच्या लोकांनी जायला मनाई केली तरी त्यांची नजर चुकवून गेले आणि स्वत:चा जीव धोक्यात घातला’, ‘दरीमधे पडलेल्या तरुणांना स्वयंसेवकांनी प्रयत्नांची शर्थ करून वाचवलं’, ‘एका धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणींचे मृतदेह शोधून काढले. या धबधब्यामध्ये जाऊ नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या’, ‘अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली, की पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असता तर अशी दुर्घटना घडलीच नसती...’
आता हा लेख लिहीत असताना एक बातमी चॅनेलवर बघितली की एका पाच-सहा वर्षांच्या चिमुरडीचा व्हिडिओ, ज्यात तिनं काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याचा आनंद आणि आतापर्यंत मरण पावलेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून स्विमसूट घालून पुलावरून उडी मारली. ती पोहणारी वाटत होती. खाडीमध्ये आणखी कोणीतरी (बहुधा तिचे वडील) आधीच उतरले होते. बातमी अशी होती की ही तिच्या पालकांची कल्पना होती...!
हे सगळं का? कशासाठी? काय साधतं यानं? सहा वर्षांच्या मुलीला काश्मीरप्रश्न, कलम ३७० यांतलं काय कळत होतं? इतर कुठलीही सुरक्षायंत्रणा नसताना हे धाडस का? आणि मुळातच पोलिस, अग्निशमनदल, CRPF चे जवान यांनी आपत्ती आल्यानंतर किंवा दुर्दैवानं अपघात झाल्यानंतर मदत करायची, की बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांसाठी आपलं जीवन धोक्यात घालायचं? गिर्यारोहक स्वत: गिर्यारोहण करताना आधी सराव करतात, मेहनत घेतात, आखणी करतात आणि सुरक्षेची काळजी घेऊन गिर्यारोहणाचा आनंद घेतात. कुठल्याही साहसी खेळाचं प्रशिक्षण घेणं, सराव करणं, सुरक्षेची खबरदारी घेऊन धाडस करणं आणि बेफिकीरीनं वागणं यात फरक नाही का? पूर बघायला जाऊन गर्दी करू नका, पाण्याजवळ जाऊ नका, लहान मुलांना पाण्याजवळ नेऊ नका, हे पोलिसांनी जनतेला करायचं आवाहन आहे का? आपत्कालीन परिस्थितीत सेल्फी काढत बसू नका, ही सरकारी यंत्रणांनी देण्याची सूचना
आहे का?
मूळ मुद्दा ‘सामाजिक शिस्तीचा’ आणि ‘सामाजिक मूल्याचा’ आहे. सार्वजनिक नियम न पाळणं; मग सिग्नल असो, रस्त्यावर थुंकणं असो, कचरा कुठेही फेकणं असो, प्लास्टिकचा वापर असो, नदीपात्रात कचरा फेकणं असो; या सर्वांच्या मागे एक मानसिकता, त्या संदर्भातील विचार, त्यामागील धारणा आणि मुख्य म्हणजे त्यामागची सामाजिक मूल्य अशी सर्व साखळी असते. आदर स्वत:चा, इतरांचा, आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा, आपल्या नैसर्गिक संसाधनांचा- हे मूल्य मुलांमध्ये अशा वातावरणात रुजेल का? पर्यटनाला गेल्यानंतर दारू पिऊन, बाटल्या फोडून, कचरा तिथेच टाकून येणारी माणसं हे कोणाचे तरी पालक असतात ना? किंवा अशाच समाजामध्ये लहानाची मोठी झालेली माणसं असतात ना?
मुलं ऐकत नाहीत, जबाबदारीनं वागत नाहीत, उद्दामपणे वागतात, उद्धट बोलतात, त्यांना पैशांची, माणसांची किंमत नाही, अशा तक्रारी घेऊन पालक समुपदेशनासाठी येतात, तेव्हा आश्चर्य वाटतं की जे उगवायला पाहिजे ते पेरायला हवं; हा साधा निसर्गनियम त्यांना माहीत नाही का? की आदर हे मूल्य त्यांना फक्त घरात आणि त्यांच्याशी वागण्यापुरतंच मर्यादित वाटतं? त्याचा सार्वजनिक जीवनातील वर्तनाशी, नियमांशी काही संबंध नाही, असं आपण मानून चाललो
आहोत का?
‘जबाबदारी’ हे मूल्य रुजायला हवं असेल तर कार्यकारणभावाची जाणीव असणं, आपण केलेल्या कृतीच्या परिणामांचं भान असणं ही बैठक मुलांच्या मनात रुजली पाहिजे. मग पुढच्या पायरीवर दुसऱ्याच्या कृतीचा आपल्यावर परिणाम होतो, हे लक्षात येतं. त्याच्या पुढच्या पायरीवर याचा विचार करून स्वत:चे काही नियम ठरवावे आणि त्यानुसार वागावं, हे घडू शकतं. याचं एक साधं तत्त्व आहे - Don’t do those things to others, that you don’t like others to do
to you.
याच्या पुढची पायरी म्हणजे संवेदनशीलता, सहिष्णुता आणि स्वयंप्रेरणेनं केलेलं समाजाभिमुख वर्तन. पालकवर्गामध्ये शिक्षण-प्रशिक्षणामध्ये ज्यावेळी ‘मुलाबाबत काय घडायलं हवं?’ असं मी विचारते, तेव्हा एक उत्तर हमखास येतं, की ‘माझं मूल एक चांगली व्यक्ती झालं पाहिजे, जबाबदार नागरिक झालं पाहिजे.’ कसं होणार? शाळेनं मानलं की ते पालकांचं काम आहे. पालकांनी मानलं की ते शाळेचं काम आहे. दोघांनी मानलं की ते समाजाचं काम आहे. समाजानं मानलं की ते शासकीय यंत्रणेचं काम आहे. सगळ्यांनी मिळून मानलं की ते माध्यमांचं काम आहे...! म्हणजे हे लहानपणाच्या ‘पासिंग द पार्सल’ खेळासारखं होणार. यामध्ये ‘मी काय करायला पाहिजे,’ हा विचार कधी होणार? समाज आपल्या घरातच तयार होतो, हे आपण कधी लक्षात घेणार?
पोलिसांनी सगळीकडे फक्त सूचना न देता कडेकोड बंदोबस्त ठेवला असता तर मुली धबधब्यावर जाऊच शकल्या नसत्या आणि त्यांचा जीव जाण्याची दुर्घटना घडलीच नसती असं म्हणणारे नागरिक, मुलं पडल्यानंतर जमिनीला ‘हात रे’ करणाऱ्या पालकाचं मोठं रूप आहेत, असं वाटत नाही का?
या निमित्तानं सर्वांना विचारावंसं वाटतं की सार्वजनिक जीवनात अत्यंत जबाबदारीनं वागण्याचा वसा घेऊया का? जमलं तर आजूबाजूच्या चार व्यक्तींनाही सांगू, परंतु किमान स्वत:पुरतं तरी ठरवूया का?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link