Next
हसण्यामागे लपलेले विज्ञान
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, January 11 | 05:00 PM
15 0 0
Share this storyकुतूहल कट्ट्यावर गप्पा रंगात आल्या होत्या. प्रथमेश सांगत होता, “पेशंटने अगदी व्याकूळ आवाजात डॉक्टरांना विचारले की, “डॉक्टर, उद्याच्या ऑपरेशननंतर मी नक्की जगणार ना? डॉक्टर म्हणाले, “या ऑपरेशननंतर शंभरातले नव्व्याण्णव पेशंट मरतात. माझे या आधीचे सर्व नव्व्याण्णव पेशंट मेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जगणार, हे नक्की!”

प्रथमेशचे बोलणे संपताच सगळे जण हास्यकल्लोळात बुडून गेले.
“आज कुतूहल कट्ट्यावर विज्ञानाची जागा विनोदाने घेतली की काय?” आत शिरत सोहमने विचारले.
“विज्ञानाला विनोदाचं वावडं नसतं,” राहुलदादा म्हणाला, “आपण विनोद हसण्यावारी नेत असलो तरी शास्त्रज्ञ मात्र तो विज्ञानावारी नेतात.”
“हसण्यामागे काय विज्ञान लपलेलं आहे?” शाश्वतने विचारले.

“आपण का हसतो, याचा वैज्ञानिकांनी शोध घेतला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दोन गोष्टींमधली विसंगती आपल्याला हसवते,” तनुजाताई म्हणाली, “प्रथमेशच्या विनोदातले डॉक्टर आकडेवारीचा उपयोग करून पेशंटला धीर द्यायला जातात, पण प्रत्यक्षात ती आकडेवारी पेशंटला हादरवेल अशी आहे. ही विसंगती आपल्याला हसवते.”
“पण छोटी बाळंसुद्धा गुदगुल्या केल्यावर हसतात, ती कशी?” सोहमने विचारले.

“विसंगतीखेरीज हसण्याची इतरही अनेक कारणं असतात. गुदगुल्या केल्यावर बाळ हसतं ते सुखद संवेदनेचा आनंद प्रकट करण्यासाठी.” विद्याताई म्हणाली.
“हो,” सानिया म्हणाली, “आनंद, मजा, सुख अशा आल्हाददायक भावना दाखवण्यासाठी किंवा आपण सगळेजण एका गटातले आहोत, अशी सकारात्मक भावना दाखवण्यासाठीही आपण हसतो.”

“काही वेळा तणाव नाहीसा झाल्यावरही हसू येतं,” मुक्ता म्हणाली “आपलं काही चुकलं तरी सावरून घेण्याकरता आपण हसतो. चुकीमुळे चेहरा गोरामोरा झालेला असतानाचं ते अस्वस्थ हसू असतं.”

“किंबहुना, हसणं हा ‘शब्देवीण संवादु’च आहे,” स्वप्निलदादा सांगू लागला, “भाषा जन्माला येण्याआधी सुमारे दीड कोटी वर्षांपूर्वीपासून भावनांची देवाणघेवाण करण्याचं साधन म्हणून हसण्याचा वापर केला गेला. हा वापर केवळ मानवापुरताच मर्यादित नाही. गोरिला, चिंपांझी, ओरांगउटान हे वानरवर्गातले प्राणी गुदगुल्या केल्यावर किंवा शिवाशिवीसारखे खेळ खेळताना हसल्यागत आवाज काढतात.”

“आजही शब्दांमध्ये भावना व्यक्त करण्यापेक्षा एखाद्या स्मितातून किंवा हास्यातून आपण कितीतरी कमी वेळात खूप जास्त भावना व्यक्त करतो,” राहुलदादा म्हणाला, “हसणं ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. डोळ्यांजवळ येणारी टोकदार वस्तू पाहून आपला डोळा पटकन मिटतो ती संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, तर हसणं ही संवादात्मक प्रतिक्षिप्त क्रिया आहे.”

“काही वेळा गटातल्या एखाद्याच्या हसण्याची लागण इतरांना होऊन सगळेजण हसायला लागतात,” स्वप्निलदादा सांगू लागला, “चित्रपट किंवा चित्रवाणी मालिकांमध्ये संवादांबरोबर सामूहिक हसण्याचंही ध्वनिमुद्रण टाकलेलं असतं. त्या आवाजाने प्रेक्षकही हसायला उद्युक्त होतात.”  
“विनोदी कार्यक्रम मित्र-मैत्रिणींबरोबर बघताना अधिक हशा पिकून गंमत येते ती याचमुळे,” विद्याताई म्हणाली.
“अशा वेळी माझं तर हसून-हसून पोट दुखायला लागतं,” अमना म्हणाली.

“पण अशा पोटभर हसण्याचे फायदेही खूप असतात,” विद्याताई म्हणाली, “हसण्यामुळे नकारात्मक भावना दूर होऊन तणावाचा निचरा होतो. नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांनी घेतल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं. सकारात्मकतेमुळे मनात विधायक विचार येऊन एखाद्या समस्येवर तोडगा शोधणं सोपं जातं. शिवाय, आपण आपली समस्या तर्कशुद्ध विचार करून सोडवू शकतो, या आत्मविश्वासामुळे मनोबलही उंचावतं.”
“हसण्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारून रक्तप्रवाह वाढतो. हसण्यामुळे शरीरात जे अंतःस्राव निर्माण होतात, त्याचा हृदयरोगामध्ये खूप फायदा होऊ शकतो,” स्वप्निलदादा म्हणाला.

“अरे वा! म्हणजे हसेल तो मजेत जगेल, असं म्हणायला हरकत नाही,” प्रथमेश म्हणाला, “पण प्रत्येक विनोद सगळ्यांनाच हसवत नाही. असं का?”
“एखाद्या गोष्टीचं आपल्याला हसू येईल की नाही हे वय, लिंग, भाषा, शिक्षण आणि संस्कृती अशा आपल्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतं,” तनुजाताई म्हणाली, “एकदा मिल्खासिंग आराम करत होता. बाजूने जाणाऱ्या एकाने त्याला विचारलं, आर यू रिलॅक्सिंग? त्यावर मिल्खासिंग म्हणाला, नो, आय ॲम मिल्खासिंग! हा विनोद मराठीत अनुवादित केला तर हसू येणार नाही.”

“हसू आपल्या बौद्धिक परिपक्वतेवरही अवलंबून असतं. पडणं, कोलांटी उडी मारणं अशा गोष्टींनी लहान मुलांना हसू येतं. तर हसवता हसवता गंभीर होऊन अंतर्मुख व्हायला लावणारा विनोद सुजाण व्यक्तींना अधिक भावतो,” स्वप्निलदादा म्हणाला.
“हसवणारा आणि तरी गंभीर बनवणारा विनोद कसा असू शकेल?” मुक्ताला प्रश्न पडला.

“मी सांगतो,” स्वप्निलदादा म्हणाला, “एकदा इसापला त्याच्या धन्यानं बाजारातून सामान आणायला पाठवलं. इसापला वाटेत कोतवाल भेटला. त्याने इसापला विचारलं, कुठे चाललास? त्यावर इसाप म्हणाला, मी कुठे चाललो आहे ते मलाही माहीत नाही! तोच प्रश्न पुनःपुन्हा विचारल्यावरही इसाप तेच उत्तर देत राहिला. तेव्हा चिडून कोतवालाने त्याला कोठडीत टाकून त्याच्या धन्याला बोलावून घेतलं. कोतवालाने सांगितलेली हकिकत ऐकून धन्याने बुचकळ्यात पडून इसापला विचारलं की, मी तुला बाजारातून सामान आणायला पाठवलेलं असताना तू असं का सांगितलंस? त्यावर इसाप म्हणाला, मी खरं तेच सांगितलं. मी इथे येणार आहे हे मला तरी कुठे ठाऊक होतं? इसापचं हे उत्तर ऐकून आपण हसता-हसता गंभीर आणि अंतर्मुख होतो. आयुष्याच्या वाटचालीत आपण कुठे चाललो आहोत, हे अनेकदा आपल्यालाही माहीत नसतं!”

“वा! हसवता-हसवता जीवनाचं गंभीर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या विनोदाची जातकुळी वेगळीच आहे,” कौतुकाने मुक्ता म्हणाली, “हसण्यासारख्या हलक्या-फुलक्या गोष्टीमागचं विज्ञान शोधणारे शास्त्रज्ञ आणि असे तत्त्वज्ञ यांचं जवळचं वैचारिक नातं असणार. उगीच नाही विज्ञानाला एकेकाळी नैसर्गिक तत्त्वज्ञान म्हणजे नॅचरल फिलॉसॉफी म्हणायचे!”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link