Next
वॉरेन बफे यांचे गुंतवणुकीचे धडे
प्राजक्ता कशेळकर
Friday, September 06 | 02:30 PM
15 0 0
Share this story


शेअर्स किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानंच वॉरेन बफे यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वानं ‘ओरॅकल ऑफ ओमाहा’ असं नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेन यांनी मिळवलेलं यश अद्वितीय असंच आहे. अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेन यांनी ३० ऑगस्ट रोजी ८९वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूकप्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेलं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला. संपूर्ण जगभरात त्यांची गुंतवणूकपद्धती अंगिकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा एक पंथच तयार झाला आहे. भारतातीलही अनेक गुंतवणूकतज्ज्ञ दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या शनिवारी वॉरेनच्या बर्कशायर हॅथवे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारणसभेला अमेरिकेतील ओमाहा शहरात प्रत्यक्ष हजेरी लावतात. अशा या जगविख्यात, सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे विचार या लेखमालिकेत अनेकदा उद्धृत केले होते. त्यांचे विचार समजून घेऊन आचरणात आणले तर त्यांचा वाढदिवस साजरा झाला असं होईल.

‘जेव्हा शेअर बाजारात पराकोटीचा हावरेपणा निर्माण होतो तेव्हा तिथून पळ काढा. जेव्हा पराकोटीची चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा मात्र तुम्ही गुंतवणूक करा.’

हा वॉरेन बफे यांचा सल्ला सद्यस्थितीत नक्कीच लागू होतो. गेल्या काही महिन्यांत बाजारात मोठ्या अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि परिस्थिती अजून चिघळली तर पराकोटीची चिंताजनक होऊ शकेल. मात्र हा कालखंड शेअर बाजारातून निघून जाण्याचा नव्हे तर वाट बघून आणखी गुंतवणूक करण्याचा आहे. थोडंसं इतिहासात डोकावून पाहा. २००१ साली डॉट-कॉमचा फुगा फुटला किंवा २००८ साली फिनान्शियल क्रायसिस किंवा २०१० सालचा युरोपीयन डेट क्रायसिस किंवा त्यानंतर २०१३ सालचे टॅपर टॅन्ट्रम (taper tantrum) यापैकी कुठल्याही वेळी तुम्ही मोठी गुंतवणूक केली असती तर पुढील २-४ वर्षांत ती सहज २-३ पट झाली असती.

‘गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करा आणि तिला वाढायला वेळ द्या.’
वयाच्या अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी-विक्री करायला सुरुवात केलेल्या वॉरेन बफे यांना ‘आपण उशिरा सुरुवात केली’ याचं वैषम्य वाटतं. गुंतवणूक ही झाडं लावण्यासारखीच प्रक्रिया आहे. आपण आज बिया पेरल्या तर पुढच्या १०-२० वर्षांनंतर त्याची फळं चाखता येतील. थोडी थोडी सुरुवात करा, परंतु लवकर सुरुवात करा, कारण आपण गेलेला काळ विकत घेऊ शकत नाही. इथं हे नमूद करण्यासारखं आहे, की वॉरेन बफे यांच्या सध्याच्या ८४ अब्ज डॉलर संपत्तीपैकी ९९ टक्के संपत्ती त्यांच्या वयाच्या ५२व्या वर्षानंतर निर्माण झालेली आहे. १९८२ साली ३७.५ कोटी डॉलर असलेली त्यांची संपत्ती गेल्या ३७ वर्षांत तब्बल २२४ पट झाली आहे. यालाच आपण ‘चक्रवाढीची जादू’ म्हणतो.

‘आपण नक्की काय करत आहोत हे न समजणं ही गुंतवणूकक्षेत्रातली सर्वात मोठी जोखीम आहे.’

आज असंख्य गुंतवणूकदार ‘म्युच्युअल फंड सही है’च्या जाहिराती पाहून किंवा इंटरनेटवरील माहिती वाचून उत्साहानं गुंतवणूक करायला सुरुवात करतात. मात्र त्यांची अवस्था ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा,’ अशी असते. आपल्याला गुंतवणुकीतून काय मिळू शकतं याचा लोभ असतो, पण त्यासाठी काय सहन करावं लागू शकतं त्याची कल्पना नसते. बाजाराच्या चढउतारांनी मग अशा लोकांची घालमेल होते आणि त्यातून भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. हे टाळण्यासाठी या प्रवासातील खाचखळगे अनुभवी तज्ज्ञांकडून समजून घेतले तर नक्कीच कपाळमोक्ष टाळता येईल.

‘जगबुडीच्या भाकितांना काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमची नौका बनवली आहे का?’
सध्या ‘आर्थिक मंदी येणार,’ ‘जागतिक महामंदीची सुरुवात आहे’ वगैरे विषय अनेकांच्या तोंडी आहेत. क्षणभर मानलं, की खरंच जगावर/भारतावर मोठं आर्थिक संकट येऊ घातलं आहे आणि शेअर बाजार कोसळणार आहे. परंतु तुमचं भाकीत खरं ठरलं, तर त्याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तुम्ही आतापासूनच थोडे थोडे पैसे वाचवून मोठी पुंजी तयार केली नसेल तर अशा संकटाच्या क्षणी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे काहीच नसेल. मग भाकितं करण्याचा काय उपयोग? म्हटलंच आहे ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.’

‘बाजारातील चढउतारांना घाबरू नका. अशीच गुंतवणूक करा, की जी अनंतकाळ ठेवायची वेळ आली तरी त्याचं वाईट वाटणार नाही.’
आपण जर आपल्या ५ लाखांच्या गुंतवणुकीचं बाजारमूल्य साडेचार लाख झालं (म्हणजे पन्नास हजारांचं नुकसान) म्हणून उदास होत असू, तर हे लक्षात घेतलं पाहिजे, की वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीचं बाजारमूल्य एका दिवसात एक अब्ज डॉलर्सनं पडलंय, असं अनेकदा झालंय. २००८मध्ये वॉरेन बफे यांची संपत्ती ६२ अब्ज डॉलरवरून घसरून ३७ अब्ज झाली, आणि पुन्हा त्याच पातळीवर येण्यासाठी २०१५ साल उजाडलं. तुम्ही कितीही तज्ज्ञ, अनुभवी किंवा श्रीमंत गुंतवणूकदार असलात तरी बाजारातील चढउतार सहन करण्यापासून कोणाचीही सुटका नाही.
 
‘गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे, पण जवळ पुरेसे पैसे नाहीत अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका.’
आपल्या वार्षिक उत्पन्नाचा एक हिस्सा वॉरेन बफे नेहमीच बाजूला काढून ठेवतात आणि चांगली संधी जेव्हा केव्हा चालून येईल तेव्हा तिचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सदैव तयारी ठेवतात. बाजारात कधी कुठल्या अडचणी उद्भवतील आणि किमती कोसळतील सांगता येत नाहीत, त्यासाठीची आपली तयारी महत्त्वाची. या क्षणी बर्कशायर हॅथवे कंपनी तब्बल १२२ अब्ज डॉलर्सच्या डोंगरावर बसून आहे. सामान्य गुंतवणूकदारांनीदेखील म्युच्युअल फंडातील गुंतवणुका चालू ठेवताना आपला ‘आकस्मिक निधी’ तयार केला पाहिजे आणि तो नियमितपणे वाढवत नेला पाहिजे. अर्थात यासाठी सुयोग्य आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे.
सामान्य गुंतवणूकदारांनादेखील उपयोगी पडतील असे हे वॉरेन बफेट यांचे धडे प्रत्येकानंच गिरवले पाहिजेत. त्यांच्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासासाठी उपयुक्त सवयी आपण लावून घेऊ शकतो.
..................................................................

हे तुम्हाला माहीत आहे का?
  • वॉरेन बफे यांची गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवे हिचं बाजारमूल्य सुमारे ५०० अब्ज डॉलर आहे.
  • बर्कशायर हॅथवेच्या एका शेअरचं बाजारमूल्य सुमारे ३.१ लाख डॉलर, म्हणजेच सव्वादोन कोटी रुपये आहे.
  • गेल्या ५ वर्षांतील बर्कशायर हॅथवेची कामगिरी निराशाजनक ठरली. डाऊ जोन्स निर्देशांकातील ५४ टक्के वाढीच्या तुलनेत तिचं बाजारमूल्य केवळ ३३ टक्क्यांनी वाढलं.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link