Next
लवचिकतेतून यश
मानसी बिडकर
Friday, July 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

शीलाताई मूळच्या महाडच्या. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण महाडमधून पूर्ण करून त्या लग्नानंतर पुण्यात आल्या. सासरी एकत्र कुटुंबपद्धती आणि खेळीमेळीचं वातावरण होतं. त्यांच्या सासरचा कॅसेट शॉपचा व्यवसाय होता. त्यात त्यांनी थोडी थोडी मदत करायला सुरुवात केली. १९९३ मध्ये त्यांच्या दिरांनी ‘अनंत एन्टरप्राइसेस’ची स्थापना केली. या कंपनीमध्ये वेगवेगळ्या स्प्रिंग्ज उत्पादित करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यांचा मूळ व्यवसाय धारिया यांनी चालवायला घेतला. शीलाताईंना त्या क्षेत्रातील काहीच अनुभव नव्हता. त्यांचं शिक्षण केमिस्ट्रीमध्ये होतं आणि व्यवसाय मेकॅनिकल उत्पादनांचा होता. या उद्योगातील सर्व गोष्टी शिकून घेणं हे एक आव्हान होतं. ते आव्हान त्यांनी स्वीकारायचंं ठरवलं आणि १९९८ साली त्यांनी स्प्रिंग उत्पादन करायला सुरुवात केली. स्प्रिंगमधील बारीकसारीक गोष्टींचं ज्ञान बारकाईनं घ्यायला सुरुवात केली. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना भेटी दिल्या. त्यातूनच त्यांना कोल्हापूर, सातारा, बेंगळुरू, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या सासरच्या सर्व मंडळींनी अतिशय चांगला पाठिंबा दिला. त्यांच्या कंपनीचा पुण्यात, कोथरूडमध्ये साधारण १००० चौरस फूट एवढा फॅक्टरी सेटअप होता आणि नारायण पेठेमध्ये १००० चौरस फुटांचं ऑफिस.
शीलाताईंनी मशिनरीमध्येसुद्धा वाढ केली. आता त्यांच्या युनिटमध्ये एकंदर २० वेगवेगळ्या मशिन्स आहेत, ज्याच्या आधारे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रिंग्जचे उत्पादन करतात. त्यांनी कंपनी विस्तारली. कामगारांची संख्याही वाढवली. आता त्यांच्या कंपनीमध्ये २०-२२ कामगार कार्यरत असून त्यांना आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी प्रशिक्षणही दिले जाते. त्यांना वर्षातून एकदा बाहेर सहलीलाही नेले जाते. कामगारांचे कल्याण तेच कंपनीचे कल्याण असं मानून शीला धारिया त्यांना मेडिक्लेम पॉलिसी, बेस्ट वर्कर अॅवॉर्ड, इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देतात.
कंपनीचा विस्तार करताना स्प्रिंगच्या गुणवत्तेकडे त्यांचं अजिबात दुर्लक्ष झालं नाही. त्यांच्या कंपनीला आय. एस. ओ. ९००१-२०१५ हे गुणवत्ता मानांकन मिळालं आहे. त्यांनी ‘ब्रम्हो मिसाईल’करिता एकूण २६ प्रकारच्या स्प्रिंग्ज उत्पादित केल्या आहेत. गोदरेज, टाटा मोटर्स, थरमॅक्स यांसारख्या कंपन्यांना त्या स्प्रिंग्जचा पुरवठा करतात.
या व्यवसायात शीला धारिया यांना अनेक बरेवाईट अनुभव आले. एका नामांकित कंपनीने शीलाताईंकडून २५-२५ प्रकारच्या स्प्रिंग्ज विकसित करून घेतल्या. परंतु अचानक कॉस्टिंगचा मुद्दा काढून त्यांनी ऑर्डर्स थांबवल्या. शीलाताईंनी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्याकडून तो स्टॉक घेतला नाही. बरंच नुकसान सोसावं लागलं. परंतु शीलाताई याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईट ऑफ बिझनेस असं म्हणून पाहतात. जास्त जोमाने, जास्त कष्ट घेऊन त्यांनी कंपनीचा तोटा भरून काढला.
महिला उद्योजक म्हणून घर, उद्योग सांभाळणं ही कसरत असते. त्याचप्रमाणे मार्केटमधील चढ-उतार, कामगारांचं व्यवस्थापन, स्पर्धा ही आव्हानं आहेत की ज्याच्यावर त्या मात करू पाहतात. पूर्ण ऑटोमॅटिक सेट अप करणं, एक्स्पोर्ट ऑर्डर मिळवणं ही त्यांची उद्दिष्टं आहेत. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रदर्शनांतून भाग घेत असतात.
१९९८ मध्ये त्यांना आउटस्टँडिंग युनिटचा पुरस्कार एम. सी. सी. आई. ए. पुणेकडून मिळाला. त्याचप्रमाणे ‘इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार’ २००५ मध्ये, २०१८ मध्ये ‘आम्ही उद्योगिनी’तर्फे त्यांना पुरस्कार मिळाला. आता त्यांची मुलगी रिचा एम.बी.ए. करून त्यांना मार्केटिंगसाठी मदत करीत आहे. पुरुषी आधिपत्य असलेल्या मेकॅनिकल उत्पादन क्षेत्रामध्ये शीला धारिया यांनी चांगलाच ठसा उमटवला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link