Next
आता अपेक्षापूर्तीकडे
विशेष प्रतिनिधी
Friday, May 31 | 01:45 PM
15 0 0
Share this story

अभूतपूर्व जनादेशाने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आता आपली दुसरी कारकीर्द सुरू केली आहे. यावेळी जनतेने मनाशी काही विशिष्ट हेतू ठेवून मोदी यांच्यामागे पूर्ण बहुमत उभे केले आहे, जनतेला या सरकारकडून निश्चित अशी कामगिरी हवी आहे. देशापुढील परकी संकट, पंचमस्तंभियांच्या कारवाया यांना हे सरकार योग्य पद्धतीने तोंड देईल याची लोकांना खात्री आहे. परंतु सरकारची खरी कसोटी लागणार आहे ती देशांतर्गत समस्या, आर्थिक समस्या व सामाजिक विसंवाद यांना तोंड देताना. देशातील निम्म्या मतदारांनी सत्तारूढ आघाडीवर विश्वास दाखवला आहे. परंतु उरलेल्या ज्या ५० टक्के मतदारांनी सत्तारूढ आघाडीला मतदान केले नाही, त्यांनाही बरोबर घेऊन जाण्याची भाषा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, ही एक अत्यंत आश्वासक अशी गोष्ट आहे. निवडणुकीपूर्वी मोदी हे पुन्हा निवडून आल्यास देशात दुही माजेल अशी भविष्यवाणी त्यांचे विरोधक करीत होते, यासंबंधीचा लेखही ‘टाइम’ या अमेरिकन नियतकालिकात आला होता, त्यामुळे ही भविष्यवाणी खोटी ठरवणे हे मोदी सरकारपुढचे एक महत्त्वाचे काम राहील. मोदी सरकार हिंदुत्ववादी आहे म्हणजे ते बिगरहिंदूंच्या विरोधात काम करणार आहे, असाही एक अर्थ या सरकारचे विरोधक लावीत आहेत. मात्र मोदी यांनी आपल्या आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांपुढे बोलताना अल्पसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे वचन दिले आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. या सरकाला येत्या पाच वर्षांच्या काळात संपूर्ण भारतीय समाजाच्या आर्थिक अपेक्षा आणि सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. गोहत्याबंदी, राममंदिर हे प्रश्न एकीकडे हिंदूअस्मितेचे प्रश्न बनले आहेत, तर दुसरीकडे अहिंदूंमध्ये या प्रश्नामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही अस्मिता आणि असुरक्षितता यांच्यातील मध्यबिंदू काढून हिंदू व बिगरहिंदू या दोहोंचेही समाधान करण्याची अवघड जबाबदारी या सरकारवर आपोआपच येऊन पडली आहे. लोकांच्या धार्मिक परंपरा, राहण्याखाण्याच्या सवयी हा संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर कोणीही आक्रमण करणार नाही याची हमी या सरकारला द्यावी लागेल. सरकारने आर्थिक क्षेत्रात कितीही यशस्वी कामगिरी केली आणि सामाजिक सलोखा राखण्यात त्याला अपयश आले तर सरकार पूर्णपणे अपयशी ठरू शकते, याची मोदी यांना जाणीव नक्कीच असणार. त्यामुळे आपले सरकार आणखी पाच वर्षांनंतर यशस्वी ठरावे यासाठी ते कसून प्रयत्न करतील यात काहीच शंका नाही. मोदी यांनी या अभूतपूर्व यशानंतर विजयाचा उन्माद न दाखवता अत्यंत सामंजस्याने व गंभीरपणे आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु तसे शहाणपण त्यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना दाखवता आलेले नाही. त्यामुळे कुणाला रस्त्यात अडवून सक्तीने श्रीराम म्हणायला लावणे, गोमांस सापडले म्हणून बडवून काढणे अशा काही घटना घडल्या आहेत. त्या तुरळक असल्या तरी या सरकारला बदनाम करण्यासाठी त्या पुरेशा आहेत. त्यामुळे सरकारने अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करून त्यांना शिक्षा होईल असे पाहावे. तसेच, साध्वी प्रज्ञासिंग हा भाजपच्या हिंदुत्वाचा चेहरा देशातील अनेक हिंदूंनांही मान्य होणारा नाही. खुद्द मोदी यांनीच गांधी-गोडसे प्रकरणी प्रज्ञासिंग यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ‘आपण त्यांना माफ करणार नाही’ असे म्हटले आहे. पक्षाच्या नेत्यालाच आपल्या वक्तव्यांनी अडचणीत आणणाऱ्या अशा घातक लोकांची पक्षातून हकालपट्टी केली तर ‘सबका विश्वास’चे ध्येय साध्य होईल.!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link