Next
आंब्याचे सासव
वसुधा गवांदे
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. बाजारात कैऱ्या, पिकायला ठेवलेले आंबे दिसू लागले आहेत. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला कैरीच्या बाठीची कढी सांगितली होती. आज आंब्याचं सासव सांगणार आहे. शहरातल्या मुलांना हा पदार्थ फारसा माहीत नसेल. तेव्हा आवर्जून करून बघा आणि मुलांना खायला द्या. या मोसमी पदार्थाशीही त्यांची ओळख व्हायला हवी. सासव करण्यासाठी पाच ते सहा रायवळ आंबे घ्या किंवा पायरी आंबे घेतले तरी चालतील. पाव वाटी ओलं खोबरं, तिखट, मीठ, गूळ आणि मोहरी.
सासव करण्यासाठी शक्यतो अती पिकलेला किंवा एकदम कच्चा आंबा घेऊ नये. अर्धवट पिकलेला किंवा ज्याला आपण कोवळा आंबा म्हणतो तो घ्यावा. सासवाला आंबट-गोड-तिखट अशी मिश्र चव असते. आजकाल हा पदार्थ विस्मृतीत गेला आहे. आपण आज तो करून बघणार आहोत. मला खात्री आहे की या पदार्थाबरोबर माहेरवाशिणींच्या अनेक आठवणी जाग्या होतील. चला तर मग, करुया सुरुवात...
आंब्यांचा रस काढून चमच्यानं सारखा करून घ्या. रसाच्या गुठळ्या राहू देऊ नका. आता अर्धा ते पाऊण चमचा मोहरी कढईमधे कोरडी भाजून घ्या. ती भाजलेली मोहरी आणि ओलं खोबरं पाणी घालून वाटून घ्या. आंब्याच्या रसात तिखट, चिमूटभर हळद अणि गूळ घाला. वाटणात मीठ घालून ते रसात ओता. आंब्याच्या मगाशी काढलेल्या बाठी आता या मिश्रणात टाका व गॅसवर एक उकळी काढा. एक मोठा चमचा पाणी घालून मिश्रण सारखे करा आणि गरमगरम सासव खायला द्या. आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींनी युक्त असा हा पदार्थ मुलांना नक्की आवडेल. तुम्ही हे सासव थोडं दाट करून पोळीबरोबरही खाऊ शकता. काही लोक यामध्ये हिंग, लाल सुक्या मिरच्या, मेथीपूडही घालतात. गावरान रायवळ आंब्यापासून बनणारा हा पदार्थ खासच लागतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link