Next
‘प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणार’
प्रतिनिधी
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतील ‘ता इसरलंय…’ हा संवाद आणि तो संवाद बोलणारा पांडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या संवादामुळे घराघरामध्ये पोहोचलेला लेखक- अभिनेता प्रल्हाद कुडतरकर हा ‘रात्रीस खेळ चाले’च्या दुसऱ्या भागातूनही देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या निमित्तानं प्रल्हादसोबत साधलेला हा खास संवाद...

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेनं प्रेक्षकांना शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवलं होतं, आता येणाऱ्या दुसऱ्या पर्वाबद्दल काय सांगाल?

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या पहिल्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळे लोकांना आवडणारी पात्रं, भीती, मजा ही असणारच आहे. पहिला भाग जिथे संपला तिथूनच पुढचा भाग सुरू करणार नाही. त्यामुळे दुसऱ्या पर्वात नेमकं काय असणार, याची उत्सुकता आम्ही कायम ठेवली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

या मालिकेच्या भागाचं लेखन कोणी केलं आहे?
 लतिका सावंत आणि राजू घाग यांनी माझ्यासोबत ही कथा लिहिली आहे. मी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर राजू सावंत यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

मालिकेच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता मालिकेचा दुसरा भाग करताना किती उत्सुकता आहे?
रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्याचबरोबर जबाबदारीदेखील तितकीच वाढलेली आहे. आमची संपूर्ण टीम ही जबाबदारी पेलण्यास सज्ज झाली आहे.

दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली?
या मालिकेची कथा इतकी सस्पेन्स आहे की आता त्याचा दुसरा भाग येतोय म्हटल्यावर प्रेक्षक स्वतःच त्यांना वाटेल त्या बाजूनं कथेचा विचार करायला लागले आहेत. ते स्वतः कथा तयार करत आहेत.

मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्येही तेच कलाकार आणि तोच वाडा पाहायला मिळणार का?
हो. आम्ही पुन्हा त्याच नाईकांच्याच वाड्यात चित्रीकरण करत आहोत. तसंच मालिकेच्या पहिल्या सत्रामध्ये असलेल्या सर्व व्यक्तिरेखा या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून काही नव्या पात्रांचा या कथेत सहभाग असणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link