Next
गुल
अरुण घाडीगावकर
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


१९७०-८० च्या दशकात मुंबई-पुण्यात हौशी, प्रायोगिक-समांतर नाटकाची चळवळ जोशात होती. काही नवं, चांगलं, वेगळं, हटके करू पाहणाऱ्या कलाकारांसाठी ‘छबिलदास रंगमंच’ हा हक्काचा झाला होता. याच काळात समांतर रंगभूमीचं केंद्र मुंबई-पुण्याबाहेरही सरकू लागलं होतं. राज्यनाट्यस्पर्धेवर तोपर्यंत, मुंबई-पुण्याच्याच नाट्यसंस्थांचा वरचष्मा असायचा. परंतु त्यानंतर सातारा, नाशिक, औरंगाबाद अशा मुंबई-पुण्याबाहेरील नाट्यसंस्थांनी रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्या नाटकांमधून येणारे आशय-विषय, मांडण्याची धाटणी, नेपथ्य-प्रकाशादी तंत्रांमधून होणारे प्रयोग, अभिनय आणि एकूणच सादरीकरण यामुळे मुंबई- पुण्याच्या संस्थांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. यात ‘औरंगाबाद केंद्रा’नं आपलं स्थान निर्माण केलं होतं.
इथल्या विद्यापीठात ‘नाट्यविभागा’मुळ रंगभूमीचा सर्वांगानं विचार व्हायला लागला. रंगभूमीच्या इतिहासाचा विचार करतानाच तिच्या वैचारिक, प्रायोगिक विकासासाठी काय करता येईल, याचा साकल्यानं विचार होऊ लागला. प्रा. लक्ष्मण देशपांडे, दिलीप घारे यांच्यासारखे शिक्षक कलाकारांच्या प्रतिभेला मुक्तपणे फुलवत होते. औरंगाबाद केंद्रातून चंद्रकांत कुलकर्णीसारखे दिग्दर्शक, अजित दळवी, प्रशांत दळवींसारखे नाटककार, प्रतीक्षा लोणकरसारख्या अभिनेत्री, जितेंद्र कुलकर्णी, श्रीपाद प्रभाकरसारखे व्यवस्थापक निर्माण झाले. सामाजिक भान असणारा, तरल अभिव्यक्तीचा कवी दासू वैद्यही एकांकिकांमधून आपलं योगदान देत होता. अल्पावधीतच ‘जिगीषा’ या संस्थेनं, आपल्या एकांकिका, नाटकांमुळे नाट्यसृष्टीत दबदबा निर्माण केला.
याच कलाकारांबरोबरच आणखी दोन कलाकारांची नावं सतत चर्चेत होती ती मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई. समधर्मी, समविचारी आणि प्रामुख्यानं काही नवं करू पाहणाऱ्या उत्साही तरुण कलाकारांचा एक कंपू होता. एकांकिकास्पर्धांमधून त्यांचा सहभाग असायचा. औरंगाबादेत ते पथनाट्यंही सादर करायचे. त्याचे विषय असायचे ते ‘साक्षरता अभियान’, ‘कुटुंब नियोजन’,‘दारूबंदी’ असे समाजाचं प्रबोधन करणारे. दीड हजारांवर पथनाट्यं त्यांनी सादर केली. सत्तरहून अधिक एकांकिका. त्यावेळी अशी एकही एकांकिकास्पर्धा नव्हती, जिथं मकरंद, मंगेश यांना अभिनयाचं पारितोषिक मिळालं नाही. कधी अभिनय, कधी दिग्दर्शन, कधी एकांकिका पारितोषिक प्राप्त करीत. त्यामुळेच या दोघांनी आपला दबदबा निर्माण केला... साऱ्या नाट्यसृष्टीस आपली दखल घ्यायला भाग पाडलं.
‘संस्थे’ला असं सातत्यानं यश मिळत गेलं की संस्थेच्या नशिबातील शाप डोकं वर काढतो. ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर म्हणतात तसं ‘नाट्यसंस्थेच्या निर्मितीचा नारळ फुटला की संस्थाही फुटीच्या मार्गावर येते.’ मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे यांच्या कंपूमधील कलाकारांचं पटेना. त्यांच्यात वाद होऊ लागले. मतभेद विकोपाला गेले आणि मग यातून मार्ग काढण्यासाठी मकरंद आणि मंगेश या दोघांनीही आपला ‘नवा मार्ग’ शोधला. मग शोध सुरू झाला तो द्विपात्री एकांकिकांचा. औरंगाबादमधील ‘जाणिवा’ आणि ‘महापौर चषक’ या दोन एकांकिकास्पर्धा ‘प्रेस्टिजिअस.’ या स्पर्धा जिंकणं म्हणजे सीतास्वयंवर जिंकल्याचा मान! मुंबई-पुण्याकडील हौशी नाट्यसंस्थांही या स्पर्धांमध्ये तयारीनिशी उतरत. अत्यंत दर्जेदार होणाऱ्या एकांकिका पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांचाही प्रतिसाद उदंड असे. प्रत्येक स्पर्धक संस्थांचा खास प्रेक्षकवर्ग असे आणि ते आपल्या कलाकारांना प्रोत्साहित करीत असत.
मंगेश आणि मकरंद हे दोनच शिलेदार. मग त्यांना प्रोत्साहित कोण करणार? सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचा हेमंत सोनावणे हा त्यांचा जिवलग. तो त्यावेळी हॉस्टेलवर राहायचा. तो या दोघांचा ‘फॅन.’ त्यांची एकांकिका ज्या दिवशी असेल, त्या दिवशी प्रेक्षक आणण्याची जबाबदारी त्याची. मग हॉस्टेलवर हेमंतचा आदेश निघे.‘आज मक्या-मंग्याचं नाटक आहे. कुणीही कॉलेज अटेंड करायचं नाही. नाटक बघायला यायचं.’ त्याच्या आवाजातील जरबेमुळे त्याचा ‘आदेश’ धुडकावण्याची हिंमत कुणापाशीच नसे. हा सारा प्रेक्षकवर्ग मक्या-मंग्याची एकांकिका पाहायला ‘संत एकनाथ रंगमंदिरात’ येईल. टाळ्या, शिट्ट्या यानं एक मस्त माहोल तयार व्हायचा. मकरंद, मंगेश यांना ही ऊर्जा, एकांकिका  प्रभावी करण्यास पुरेशी असायची, त्यांना मानसिक बळ देणारी असायची.
‘अंधारयात्री’, ‘उजेडफुला’ आणि ‘देता आधार की करू अंधार’ अशा द्विपात्री एकांकिका मकरंद-मंगेश यांनी गाजवल्या. ‘अंधारयात्री’ ही एकांकिका ‘मसणजोगी’च्या जीवनावरची. बाप आणि मुलाचं द्वंद्व. म्हाताऱ्या बापाला वाटत असतं की आपलं हे पिढीजात कर्म आपल्या मुलानं असंच पुढे चालू ठेवावं. तरुण मुलाला हे अमान्य. त्याला हे जिणं नकोय. म्हणून तो शहरात जातो. तिथं यशस्वी होतो आणि बापाला भेटायला परत गावी येतो. पण, बाप मरतो. रमाकांत मुळे यांची ही एकांकिका.
प्रसंग असा : बाप सरणावर, चिता पेटवायचीय आणि चिता पेटल्यावर मुलाचं स्वगत. या एकांकिकेचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरे यांनीच केलेलं. चिता ‘पेटलीय’ असा भास निर्माण करण्यासाठी त्यांनी रॉकेलच्या बोळ्याचीही व्यवस्था केली होती. बोळ्यांना ‘अग्नी’ देण्याचं काम मंगेश देसाई यांच्याकडे होतं. बोळ्यांवर रॉकेल टाकायचं असंही ठरलं. तिचा पेटवण्याचा ‘इफेक्ट’ मिळाला, स्वगत संपलं की आग लगेच विझवायची. बोळे पेटवताना आपण दिसणार नाही, याची दक्षता मंगेश देसाई यांनी घ्यायची होती.
एकांकिका मस्त रंगली. ‘क्लायमॅक्स’चा सीन आला. मंगेश देसाईंनी मॅचबॉक्स घेतली. तर त्यात एकच काडी. शिवाय मॅचबॉक्स ओलसर. त्यांनी काडी घासली, तर ती पेटेना. मग जरा जोर लावून ओढली तर काडीचं गुल उडालं आणि भलतीकडंच  पडलं. देसाई ते गुल शोधू लागले, ते मिळेना. आग लावता येईना. चितेवर निश्चेष्ट पडलेल्या मकरंद अनासपुरे यांना कळेना, की चिता पेटत का नाही? ते अस्वस्थ, पण हतबल.
यात वेळ गेला. ठरावीक वेळानंतर चितेवर लाल प्रकाश आला. पार्श्वसंगीत सुरू झालं... तसं मंगेश देसाईंनी आपलं स्वगत सुरू केलं. ‘स्वगत’ संपताच तो मुलगा (विंगेतून दिलेल्या) प्रकाशाच्या दिशेनं निघून जातो. ‘प्रकाशाच्या दिशेनं मुलाचं चालत जाणं’ प्रेक्षक आणि परीक्षक यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं. परंतु अखेरीस आवश्यक तो परिणाम आला नाही म्हणून, पडदा पडताच मकरंद आणि मंगेश यांच्यात ‘संस्कृत-प्राकृत’ भाषेत वाद ‘पेटला.’ ध्वनिक्षेपणयंत्रणा सुरू होती, म्हणून त्यांचे ते सारे संवाद प्रेक्षागृहापर्यंतही पोचले. प्रेक्षक त्याचा ‘आस्वाद’ घेऊ लागले. तेवढ्यात कुणीतरी ‘पडदा’ उघडला आणि ‘पेटल्या’ वादावर पडदा पडला. या साऱ्यातून त्यांनी निष्कर्ष काढला, ‘यापुढे बॅकस्टेजला साहाय्यासाठी कुठल्याही सिगारेट ओढणाऱ्या मित्राला घ्यायचं नाही.’  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link