Next
नाथसंप्रदायाचा चिकित्साकोश
निरंजन घाटे
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार’ हा प्र.न. जोशी संकलित नाथसंप्रदायाचा सांगोपांग चिकित्साकोश आहे. नाथसंप्रदायाबद्दल मला लहानपणापासून कुतूहल होतं. आजच्या मुंबईत कुणाचाच पायपोस कुणाच्याच पायात नसतो. तिथे आता आपल्या संस्कृतीच्या ठळक खुणा पुसटशासुद्धा शिल्लक राहिलेल्या नाहीत. माझा जन्म आणि बालपणाचा बराच काळ मुंबईशी नाळसंबंध सांगणारा आहे. त्यात मी ऐन गिरणगावात परळ आणि लालबागच्या सीमारेषेवर वाढलो. त्यामुळे  ज्या अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. त्यात बैरागीपण होते. हे बैरागी दोन प्रकारचे असत. एक काखेला झोळी, हातात कुबडी घेतलेले बैरागी, यांना रामदासी बैरागी म्हणत. ते ‘जय जय रघुवीर समर्थ’ असं म्हणून ‘भिक्षा वाढ माई’ म्हणून शिधा मागत. मग मोठ्या मनानं मनाचे श्लोक म्हणून पुढच्या दारी जात. ते चाळीत शिरून घराघरात दारासमोर उभे राहून भिक्षा मागत. त्यांच्याबद्दल कसलेही प्रवाद नव्हते. मुलांकडे ते हसून बघत आणि शुद्ध, स्वच्छ मराठीत  बोलत.
दुसरे बैरागी आले की दुकानदारांच्या कपाळावर आठ्या चढत. यांना चाळीत प्रवेश नव्हता. ते बहुधा हिंदीत बोलत. ‘अल्लख निरंजन’ असं पुकारत. दर गुरुवारी त्यांचा हा पुकारा कानावर पडे. तेही भगव्या वस्त्रांतच असत. हातात चिमटा असे. काखेला झोळी आणि कंबरेला खोचलेल्या दोरीला कटोरा लटकत असे. अंगभर भस्म फासलेलं, दंडाभोवती आणि गळ्यात रुद्राक्षमाळा असत. ‘आले साले कानफाटे’ असं म्हणत तळमजल्यावरचे दुकानदार त्यांना दानधर्म करत. बायका घाईघाईनं पदर सावरत मुलांना घरात खेचून दारं लावून घेत. मग शिळी पोळी, भात असं दुरूनच त्यांच्या झोळीत टाकत असत. हे नाथपंथीजोगी. यांच्याबद्दलचे अनेक प्रवाद साठवत वाढलो. ते मुलं पळवतात. स्मशानातील राख अंगास फासतात, कवटीत जेवण रांधतात वगैरे. पुढे ‘नवनाथ कथासार’ही वाचलं. हा ग्रंथ बऱ्याच मध्यमवर्गीयांच्या घरात आढळत असे, तसा तो आमच्या शेजाऱ्यांकडेही होता. त्याला ‘नवनाथाची पोथी’ असं म्हणत. ती पोथी ओवीबद्ध होती. तिच्याबरोबरच हा गद्यग्रंथही बांधून ठेवत. त्यांच्या दृष्टीनं दोन्ही पोथ्याच होत्या. ते बदली होऊन गेले तेव्हा शेजारच्या काकूंकडून मागून घेऊन मी तो वाचला होता. देवांचे अनेक उद्योग वाचनात आले. त्यात भर पडली आणि कुतूहल अधिकच वाढलं. कारण त्यातून अनेक नव्या शंका मनात उपस्थित झाल्या होत्या. पुढे पावागड वगैरेंची माहिती मिळाली, पण कुतूहलाचं शमन काही होत नव्हतं. उलट अशा काही घटना घडल्या की ते कुतूहल वाढतच गेलं. त्यामुळेच प्र.न. जोशींच्या ‘नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार’ हा नाथसंप्रदायविषयक कोश हाती पडला आणि अधाश्यासारखा चाळला. त्याच्या वाचनानंतर या संप्रदायाविषयीचं कुतूहल बहुंताश शमलं.
आपण ‘सर्वधर्म’ समभाव’ ही उक्ती सर्वकाल वापरत असतो. तसं वागत नाही, ते वेगळं; मात्र नाथसंप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली हजार-बाराशे वर्षं नाथसंप्रदाय ही उक्ती आचरणात आली आहे. या संप्रदायाचे बहुसंख्य अनुयायी हे हिंदू असले तरी त्यांच्यात जातपात असा भेद नाही. बरेच नाथपंथी जोगी हे जन्मानं घेणाऱ्यांची संख्या घटत चालली असली आणि शहरातून ते अदृश्य झाले असले तरी उत्तर भारतात ते दिसतात.
‘नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार’ या कोशाचे दोन भाग आहेत. पहिला भाग नाथपूर्व धर्मसाधना   हा असून त्यात नाथपूर्व धर्मसाधनेबरोबरच नाथसमकालीन धर्मसाधनेचाही विचार केलेला आहे. दुसरा भाग नाथपंथाच्या उदयापासून आजमितीस अस्तित्वात असलेल्या नाथपंथाच्या वाटचालीचा मागोवा घेतो. नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून अस्तित्वात आला असावा, हे निश्चित सांगणं अवघड आहे. त्यामुळे या ग्रंथाचे दोन भाग हे अंदाजे केलेले आहेत, हे उघड आहे. मात्र दहाव्या शतकापूर्वी नाथपंथाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळत नाहीत. त्यामुळेच दहाव्या शतकापूर्वी भारतातील धार्मिक स्थित्यंतरं, बौद्ध, जैन, चार्वाकांचे लोकायत, वैष्णव-शैव मतमतांतरं, तांत्रिक साधनेचा प्रसार आदी पंथोपंथाच्या गजबजाटाचं सयुक्तिक दर्शन पहिल्या भागात आपल्याला घडतं.
ग्रंथाची सुरुवात सर्व संग्राहक नाथपंथ या छोटेखानी लेखानं होते. मग वैदिक धर्माचा ऊहापोह करत लेखक उपनिषदं, अथर्ववेद, रामायण-महाभारतातील धर्मदर्शन यांचा मागोवा घेत गीता आणि त्यानंतर तांत्रिक साधनेच्या उगमापाशी येतो. असं करत लेखक नाथसंप्रदायापर्यंत पोचतो आणि नाथसमकालीन धर्मसाधना या विभागाशी आपल्याला आणतो. प्र.न. जोशी हे हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला बोट धरून न्यावं त्या पद्धतीनं हे विवेचन करतात. परिणामी सर्वसाधारणपणे धर्म आणि अध्यात्मादी ग्रंथांच्या विवेचनात आढळणारी क्लिष्टता या कोशात आढळत नाही. विशेषत: ‘नाथसमाकलिन धर्मसाधना’ या विभागात हे वैशिष्ट्य प्रकर्षानं लक्षात येतं.
हा  विभाग वाचताना आणखी एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव होते, ती म्हणजे भारतातील विविध पंथांचा गजबजाट आणि त्यांचा मागोवा घेण्याची जोशींनी दाखवलेली चिकाटी. मुख्य म्हणजे, यातील महत्त्वाच्या पंथांची त्यांनी थोडक्यात दिलेली माहिती. त्यांनी नुसती या पंथांची नामावली देऊन काम भागवलेलं नाही तर त्या पंथांचं प्रमुख दैवत, उपासनापद्धती, त्या पंथांतील प्रमुख व्यक्ती आणि पंथाचं तत्त्वज्ञान यांचीही अगदी महत्त्वाची माहिती मुद्देसूद दिलेली आहे. मात्र ती अल्पाक्षरी आहे. वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत आदी ग्रंथांतील देवता, त्यांची विविध रूपं, त्या देवतांचा विकास यांची त्या त्या काळातील धर्मकृत्यांशी सांगड घालून ती ते आपल्यापुढे मांडतात. उदाहरणार्थ, रामायणकालीन संस्कृतीत धर्मपालनाला महत्त्व होतं. तो काळ प्रामुख्यानं यज्ञसंस्कृतीचा होता. तरीही सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र ज्योतिषमुहूर्त, शकुन-अपशकुन यांना महत्त्व प्राप्त झालं होतं. दैव, नशीब यांवरही लोकांची श्रद्धा होती. वेदकालातील देवतांचं रामायणकालीन मानवीकरण झालं होतं. महाभारतात स्नान, संध्या, हवन, जपजाप्य यांना यज्ञाइतकंच महत्त्व होतं. शिव-विष्णू यांचंही महत्त्व वाढलं होतं. देवीची असंख्य रूपं महाभारतात निर्माण झालेली दिसतात. याच काळात गीतेची रचनाही झाली. याच काळात ‘पांचरात्र’ या धर्ममताचा उगम झाला. यात तंत्रविद्येचा रहस्यमय भाग होता. वैदिक आणि पौराणिक धर्माला ‘पांचरात्र’ धर्म म्हणून मान्य नव्हता.  अशा प्रकारची विपुल माहिती या विविध पंथांच्या परिचयविभागात आढळते. नाथपंथाच्या समकालीन धर्मपंथांची यादीच इतकी मोठी आहे की ती पाहतानाच छाती दडपून जाते. यानंतर नाथपंथाच्या उदयासंबंधीचं विवेचन येतं. ते वाचताना ‘ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये’ या  म्हणण्याचा प्रत्यय येतो. पार महाभारतकाळापर्यंत नाथपंथाचा उदय मागे नेणारे नाथपंथी आहेत. या सर्व ऊहापोहातून एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे नाथपंथी उपासना ही शैव आणि बौद्ध यांच्या संकरानं विकसित झाली असावी. तीवर शाक्त आणि तिबेटी वज्रयानी परंपरांचा अधिक प्रभाव आहे.
नाथपंथ भारताच्या कुठल्या भौगोलिक परिसरात निर्माण झाला असावा, याबाबत मतमतांतरं असली तरी सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नाथपंथाचा उगम उत्तर भारतातील, त्यातही थोडासा गंगेच्या मुखाकडील भागातील असावा, असं बहुतांश अभ्यासकांचं म्हणणं आहे. याचं कारण उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग, बंगाल तसंच, ईशान्य भारतात बौद्ध आणि शाक्त सांप्रदायिकांध्ये रूढी, परंपरा आणि विविध विधी यांचं आदानप्रदान होणं सहज शक्य होतं, असं असलं तरीसुद्धा हा निष्कर्ष सर्वमान्य झालेला नाही. बऱ्याच आधुनिक अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्र ही नाथपंथाची खरी जन्मभूमी आहे. यासाठी दोन पुरावे सादर केले जातात. एक म्हणजे शिलालेख, ताम्रपट असे लिखित पुरावे आणि दुसरे म्हणजे नाथपंथाच्या महत्त्वाच्या स्थानांचं महाराष्ट्रातील वैपुल्य. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मठ त्र्यंबकेश्वरजवळील गोरक्षमठ इसवी सन ८६६ मधील म्हणजे मत्स्येंद्र- गोरक्षनाथ यांच्या काळातील आहे.
खानदेशातील तळोदे तोरणामाळ येथील मठ फार प्राचीन आहे. तेथील एका अभिलेखावरून त्या काळी तोरणमाळ हे संस्थान बरंच मोठं होतं. त्यात ११५ नाथपंथी मठ होते. त्या मठांना अल्लाउद्दीन खिलजीनं जमीन दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. नाथपंथीयांच्या वेशभूषेलाही महत्त्व आहे. त्यांच्या वेशभूषेतील प्रत्येक घटकाचं महत्त्व आहे. तसंच या वेशभूषेतील काही घटक असे आहेत की ते विशिष्ट साधना केलेल्या जोग्यालाच वापरता येतात. कुठलाही नाथपंथी जोगी त्रिशूळ वापरू शकत नाही. तो अधिकार केवळ विशिष्ट सिद्धी प्राप्त केलेल्या व्यक्तीलाच असतो. नाथपंथी जोग्यांच्या वेशभूषेत एकूण १७ गोष्टी असल्या तरी कुणीही उऊठसूट या १७ गोष्टींचा वापर करू शकत नाही, असा नियम आहे. उदाहरणार्थ, रुद्राक्षमाळ. त्यासाठी विशिष्ट सिद्धी प्राप्त असावी लागते. (याचा अर्थ हे वापरणाऱ्या सर्वांनी अशा सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत, असा धरू नये. आजकाल इतर क्षेत्रांप्रमाणे या पंथामध्येही भोंदूगिरी वाढली आहे.)
या कोशात आणखी बरीच माहिती आहे. परंतु ती बहुतांश नाथपंथी क्षेत्र, नाथपंथी अधिकारी व्यक्ती, नाथपंथी ग्रंथ आणि ग्रंथकर्ते यांची आहे. आचार, साधना आणि तत्त्वज्ञान यांच्याबाबत खूप विस्तृत चर्चा केलेली आहे. आपल्यासारख्या जनसामान्यांच्या मनातील या पंथाबद्दलचे कुतूहल शमवणारा आणि भरपूर माहिती देणारा हा कोश अनेक स्तोत्रं, तंत्रं आणि मंत्र तसंच यंत्रासंबंधी माहिती देत संपतो. तेव्हा आपल्या मनात या पंथाबद्दल गैरसमज असतील तर ते दूर करतोच, शिवाय नवी माहितीही देतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link