Next
खेळकर पाणमांजर
अतुल साठे
Friday, April 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नावात मांजर असले तरी मांजराशी काही साधर्म्य नसलेला हा प्राणी दिसायला मुंगुसासारखा दिसतो. हा प्राणी शिकार शोधणे व एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मुख्यत्वे जलाशयांचा वापर करतो. या चपळ प्राण्याचे वास्तव्य पाण्याच्या जवळपास असते. अनेकदा पाण्यात किंवा आसपास पाणमांजर आपापसांत खेळताना दिसतात. घसरत पाण्यात जाणे व दगडांशी खेळणे अशा प्रकारच्या त्यांच्या लीला पाहायला
गंमत वाटते.
जगात पाणमांजराच्या १३ प्रजाती आहेत. मुलायम, युरेशियन व छोट्या नखांचे पाणमांजर या तीन प्रजाती भारतात सापडतात. पाणमांजराला ऑट्टर (इंग्रजी), उद बिलाव (हिंदी), लुद्रा (सिंधी), पानी कुत्ता (मध्य भारत), नीर नाई (कन्नड, तमिळ व मल्याळम), नीरु कुकू (तेलुगु) व पिआरू (बर्मीज) अशी विविध नावे आहेत. मुलायम पाणमांजरचा आढळ अतिउंच डोंगर व वाळवंट सोडून भारतीय उपखंडाचा बराचसा भाग, इराकमधील काही पाणथळ प्रदेश व आग्नेय आशियात आहे. महाराष्ट्रात या प्रजातीचा आढळ मराठवाड्यातील काही अतिशुष्क भाग सोडले तर बहुतांश नैसर्गिक अधिवासांत आहे. युरेशियन पाणमांजर हिमालय, ईशान्येकडील काही राज्ये, तमिळनाडू, श्रीलंका, युरोप, मध्य आशिया, रशिया, चीनचा पूर्वेकडचा भाग, उत्तर आफ्रिकेतील काही देश व आग्नेय आशियाच्या काही भागांत सापडते. छोट्या नखांचे पाणमांजर हिमालयाच्या पायथ्याकडील भाग, ईशान्येकडील राज्ये, दक्षिण भारतातील पर्वतीय व किनारी प्रदेश (तामिळनाडू, केरळ व कर्नाटकमधील दक्षिण भाग), बांगलादेश, आग्नेय आशिया व चीनच्या दक्षिणेकडील भागात सापडते.

जळाच्या सान्निध्यात
पाणमांजराचे शरीर लांब व सडपातळ असते आणि पाय आखूड असतात. ‘बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स’ या संदर्भग्रंथानुसार मुलायम पाणमांजराच्या शरीराची लांबी २५ ते २९ इंच, शेपटी १६ ते १८ इंच, तर वजन ७ ते ११ किलो असते. युरेशियन पाणमांजराच्या शरीराची लांबी २४ ते ३२ इंच, तर शेपटी १८ इंच असते. छोट्या नखांचे पाणमांजर ही जगातील सर्वात छोटी प्रजाती असून त्याच्या शरीराची लांबी १८ ते २२ इंच, शेपटी १० ते १३ इंच, तर वजन अवघे ३ ते ६ किलो असते. बहुतांश प्रजातींच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचा पडदा असतो, ज्यामुळे त्यांना पोहायला मदत होते. तसेच, ते काही काळ पाण्याखाली श्वास रोखून धरू शकतात. काही प्रजातींमध्ये त्वचेवरील लांब केसांच्या खाली आखूड केस असतात, ज्यांचा उपयोग काही प्रमाणात कोरडे राहायला व पाण्यात तरंगायला होतो. पाणवठ्याच्या काठावर दिसणारे पायाचे ठसे व आसपासच्या खडकांवर पडलेली विष्टा यावरून तिथे पाणमांजरांचे अस्तित्व असल्याचे लक्षात येते.
मुलायम पाणमांजराचा रंग तपकिरी किंवा काळपट असतो, युरेशियन प्रजातीचा रंग थोडा फिका, तर छोट्या नखांच्या पाणमांजराचा रंग गडद तपकिरी असतो. युरेशियन पाणमांजराचे केस जास्त भरगच्च व दाट असतात. छोट्या नखांच्या पाणमांजराचे वैशिष्ट्य असे की नावाप्रमाणेच त्याची नखे आखूड असतात. सर्व प्रजातींमध्ये शेपट्या मोठ्या व मजबूत असतात. पाणमांजरांचे घरटे पाण्याजवळ मोठ्या झाडाच्या मुळांखाली मातीत किंवा खडकाच्या कपारीत असते, ज्याचे एक दार पाण्याखालूनही असू शकते. भारतातील तीनही प्रजाती सहकुटुंब किंवा समूहाने राहतात. शिट्टी मारणे व हलक्या आवाजात भुंकणे अशा प्रकारचे आवाज ते काढतात.

पाण्यातील शिकारी
मांसभक्षी असणाऱ्या पाणमांजरांच्या विविध प्रजातींच्या आहारात मासे, बेडूक, खेकडे, झिंगे, छोटे पक्षी, छोटे प्राणी व अपृष्ठवंशीय जीवांचा समावेश आहे. पाणमांजरांची नखे टोकदार असतात, ज्यांमुळे मासे पकडणे सोपे जाते. छोट्या नखांच्या पाणमांजराच्या आहारात माशांपेक्षा खेकडे, गोगलगायी व अन्य लहान जीवांचा अधिक समावेश असतो. काही प्रजाती क्वचित पानेसुद्धा खातात. भक्ष्य पकडायला पाणमांजर पाण्यात पाठलाग करते, तसेच नदी किंवा तलावाच्या तळाशीसुद्धा जाते. नदी व तलावांप्रमाणेच पाणमांजरे कालवे, कृत्रिम जलाशय, खारफुटी वने (काही प्रजाती), पाण्याने भरलेली शेते, खाड्या व लगतच्या समुद्रातही अन्न शोधतात. काही प्रजाती तोंडावरील मिश्यांच्या साहाय्याने पाण्यातील कंपनांवरून भक्ष्यांचा ठावठिकाणा हुडकून काढतात. युरेशियन पाणमांजरे हिमालयात उन्हाळ्यामध्ये अंडी घालायला जाणाऱ्या माशांच्या मागावर ओढ्यांतून १२,००० फूट किंवा त्याहून अधिक उंचीवरही जातात. शुष्क भागांत जेव्हा उन्हाळ्यात डबकी व ओढे आटतात, तेव्हा पाणमांजरे जमिनीवरसुद्धा बरेच अंतर जाऊन भक्ष्य शोधतात. बहुतांश प्रजाती दिवसा भक्ष्य शोधत फिरतात. शिकार अनेकदा समूहाने केली जाते. काही प्रजातींमध्ये समूहाने पाठलाग करून माशांना उथळ पाण्यात आणून पकडले जाते.
ओडिशा, बांगलादेश, सिंध व काही आग्नेय आशियातील देशांत एक जुनी पद्धत आहे, ज्यामध्ये मासेमारीसाठी पाणमांजरे वापरली जातात. पाठलाग करून माशांना कोळ्यांच्या जाळ्यांच्या दिशेने पिटाळण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. पर्शियन, सेल्टिक, अमेरिकन मूळ निवासी, प्राचीन कोरियन व स्कँडीनेव्हियन देशांतील प्राचीन नॉर्स अशा बऱ्याच स्थानिक परंपरांमध्ये पाणमांजराला पवित्र मानले जायचे. त्याच्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. मात्र प्राचीन काळी असलेली सुज्ञता आधुनिक मानवाने गमावली असल्याने तसेच नदी व ओढ्यांतील प्रदूषण, रासायनिक कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर आणि जंगलांचा ऱ्हास होत असल्याने पाणमांजरांना धोका संभवतो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने मुलायम व छोट्या नखांच्या पाणमांजरांची वर्गवारी ‘असुरक्षित’ या प्रकारात केली आहे. आपण हे लक्षात घ्यायला हवे की मानवी जीवनशैली जेवढी पर्यावरणस्नेही राहील, तितका पाणमांजरांसहित सर्व प्रकारच्या वन्यजीवांना असलेला धोका कमी होईल. अन्यथा या गोंडस प्राण्याविना जंगल व त्यातील नदी-नाले अगदीच सुने-सुने वाटतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link