Next
...आणि अनुभवांनी शिदोरी भरत गेली!
सुनील बर्वे
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, मागचा लेख आवडल्याचं कळवलंत त्याबद्दल धन्यवाद! या भागात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे ते मला समृद्ध करणाऱ्या कलाकृतींविषयी.

‘आत्मविश्वास’ चित्रपटाच्या सुमारासच दूरदर्शनवरच्या विविध मालिकांमधून मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळत होती, तर दुसरीकडे ‘मोरूची मावशी’ नाटक अक्षरश: सुसाट धावत होतं. हे मी १९८९-९० सालातलं सांगतोय. दूरदर्शनवर ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘असे पाहुणे येती’, ‘कुंपणापलीकडचे शेत’, ‘इमारत’ या मालिका चालू होत्या. त्यातील ‘इमारत’ ही मालिका प्रिया तेंडुलकर करत होत्या आणि त्यात स्वतः विजय तेंडुलकर माझे सहकलाकार होते. त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं तो एक वेगळा आणि कायम स्मरणात राहील असा सुखद अनुभव होता.

दरम्यान ‘कलावैभव’च्या मोहन तोंडवळकरांनी मला त्यांच्या नव्या नाटकाविषयी विचारलं. ‘वन रूम किचन’ नावाचं नाटक गंगाराम गवाणकर करत होते. शकुंतला नरे, प्रदीप वेलणकर, सयाजी शिंदे अशी मंडळी त्यात होती. त्या नाटकातही मी जवळपास दोन वर्षं काम केलं. त्याचं दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं होतं. सगळे अनुभवी कलाकार सोबतीला होते त्यामुळे माझा प्रवास त्यांच्याबरोबर चांगला राहिला. त्यानंतर जे नाटक मिळालं त्या नाटकानं कलाकार म्हणून मला खूप समृद्ध केलं, ते म्हणजे ‘चारचौघी!’ दीपा लागू, आसावरी जोशी, वंदना गुप्ते आणि प्रतीक्षा लोणकर अशी जबरदस्त फौज होती त्या नाटकाची! मला आठवतंय, त्या नाटकाचा शुभारंभ १५ ऑगस्ट १९९१ रोजी होणार होता आणि त्याच्या बरोबर पंधराच दिवस आधी म्हणजे ३० जुलैला मला ते नाटक मिळालं होतं. ते नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचं खणखणीत वाजणारं नाणं होतं. नाटक दणक्यात सुरू झालं. त्या नाटकाचा वेगळेपणा असा होता, की प्रेक्षकांसाठी त्या नाटकावर चर्चा आयोजित केली जायची. हा प्रकार तोपर्यंत मी कधी पहिला नव्हता. ‘चारचौघी’च्या निमित्तानं आम्ही अनेक ठिकाणी गप्पा, चर्चासत्रांना सामोरं जायचो. नाटक झालं, की त्या गावात किंवा शहरात नाटकावर चर्चा व्हायची. त्यानिमित्तानं प्रेक्षकांशी नाट्यगृहाच्या बाहेर पडून संवाद साधला जाऊ लागला. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं.

नाटकातून मी कामं केलेली होती, पण प्रेक्षकांशी संवाद साधणं, कलाकृतीविषयी बोलणं, आपलं मत मांडणं, प्रेक्षकांचा दृष्टिकोन समजून घेणं या वेगळ्या प्रक्रियेतून मी जात होतो, ज्याचा मला पुढे खूप फायदा झाला. चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रतीक्षा, दीपाताई, वंदना गुप्ते ही सगळी मंडळी इतकं छान आणि अभ्यासपूर्ण बोलायची, की ते ऐकायलासुद्धा मजा यायची. या नाटकाच्या निमित्तानं मला नाटकाबाहेरच्या अनेक दिग्गजांचे विचार ऐकायला मिळायचे. विद्या बाळ असतील, पुष्पा भावे असतील अशा अनेकांनी या नाटकाबद्दल आणि त्यातील विषयाबद्दल मांडलेले विचार मला त्याकाळात ऐकायला मिळाले आणि तो निश्चितच एक समृद्ध करणारा अनुभव होता. माझ्या ज्ञानात खूप भर पडत गेली. आयुष्यात वाचनाला किती महत्त्व आहे व एका कलाकाराच्या दृष्टीनं चौफेर वाचन किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव झाली. एखाद्या लेखकानं दिलेली वाक्यं पाठ करून स्टेजवर म्हणणं वेगळं; परंतु जर तुमचा अभ्यास असेल किंवा वैचारिक बैठक पक्की असेल तर तुमच्या कामावर त्याचं प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही, याची शिकवण मला त्या काळात मिळाली आणि ती मला पुढे कायम उपयोगी पडली. मुळात त्या नाटकातील व्यक्तिरेखा इतक्या ताकदीनं लिहिल्या होत्या की त्या उठून दिसायच्याच. पु. ल. देशपांडे आमचं नाटक पाहायला आले होते तेव्हा म्हणाले होते की, “अरे, चारचौघीतही तुम्ही तिघे उठून दिसताय.” त्यामुळे माझ्या कारकिर्दीत ‘चारचौघी’चा मोलाचा वाटा आहे.

त्याच दरम्यान मी पहिला हिंदी चित्रपटसुद्धा केला, ज्याचं नाव होतं ‘टुन्नू की टिना’. त्या चित्रपटाची निर्मिती ‘फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया’नं केली होती. या चित्रपटाविषयी मी पुढच्या भागात सविस्तर बोलणारच आहे, कारण त्या चित्रपटानंही मला खूप काही शिकवलं आणि समृद्ध केलं. तो चित्रपट आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेला. छोटा पडदा आणि रंगभूमीवर मी एव्हाना स्थिरावलो होतो. तोच मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. माझा मित्र महेश मांजरेकरनं तेव्हा ‘आई’ चित्रपटाची संहिता लिहिली होती आणि त्यावर त्याचं काम सुरू होतं. आमच्या दोघांच्या करिअरची सुरुवात एकत्र झाल्यामुळे आणि आधीपासून आमची मैत्री असल्यामुळे आम्ही नेहमीच एकमेकांना कामात मदत करायचो. अर्थात महेशचा चित्रपटक्षेत्राविषयीचा खूपच अभ्यास जास्त होता. आपल्या एखाद्या मित्रानं एखादं चांगलं प्रोजेक्ट हाती घ्यावं आणि त्याच्यासकट सगळ्यांनी त्यात गढून जावं तसं माझं ‘आई’ चित्रपटाच्या वेळी झालं.

आम्ही दोघंही त्या चित्रपटाच्या निर्मितीत गर्क होऊन गेलो. दिलीप कुलकर्णी, नीना कुलकर्णी, प्रशांत सुभेदार असे अनुभवी कलाकार होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा, गप्पा या होतच होत्या. हे सगळं मी सांगतोय कारण माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात हे अनुभव मला खूप काही शिकवून गेले आहेत. जिथे जिथे चांगलं घडत होतं ते मी टिपत होतो आणि त्यातून माझ्यातील कलाकार घडत होता. तो चित्रपट करताना खूप मजा आली. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेतून जाताना जे सगळं शिकून घेत होतो ते शिक्षण नक्कीच आनंददायी होतं. चित्रपटाचं संगीत, रेकॉर्डिंग, शूटिंगपासून ते प्रिव्ह्यू शो करण्यापर्यंत सगळं शिकून घेतलं. निर्मितीपूर्व प्रक्रियेपासून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही काय काय करावं लागतं हे मी त्यावेळी शिकलो. माझी अनुभवांची शिदोरी भरत गेली आणि मग एका अशा अनवट वळणावर माझी गाठ पडली ती हिंदी चित्रपटाशी आणि मराठीतल्या पहिल्या-वहिल्या अल्बमशी... तो ‘गारवा’ आजही  सुखावतो. भेटूच पुढच्या भागात!

(क्रमश:)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link