Next
मँचेस्टरची महालढत
शरद कद्रेकर
Friday, June 14 | 02:00 PM
15 0 0
Share this story


मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे हातोहात संपली आहेत. दोन्ही संघांचे जगभरातील चाहते ओल्ड ट्रॅफर्डवर रविवार, १६ जून रोजी होणाऱ्या सामन्यात प्रत्यक्ष हजेरी लावतील, तर टीव्हीसंचापुढे कोट्यवधी रसिक खिळलेले असतील. एकीकडे दोन्ही देशांतील खेळाडूंची व्यूहरचना काय असेल, याचे आडाखे बांधले जात असतानाच वरुणराजाची अवकृपा होऊ नये अशी प्रार्थना सर्व खेळाडू आणि चाहते करत आहेत. 

भारताचा डावखुरा सलामीवीर, शतकवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून काही सामन्यांना मुकणार हे कळताच अनेकांना भारत-पाक सामन्याचीच अधिक चिंता वाटू लागली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासारख्या प्रबळ प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवणाऱ्या भारताला धवनच्या दुखापतीमुळे जबर धक्का बसला. आता  रोहित शर्मा, शिखर धवन ही बिनीची जोडी फुटल्यामुळे डावखुऱ्या धवनऐवजी लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता बळावली आहे. 

भारत-पाकिस्तान या दोन्ही संघाच्या अलिकडच्या कामगिरीवर नजर टाकल्यास भारताचेच पारडे जड दिसते. परंतु  विश्वचषकासारख्या स्पर्धेत तसेच इंग्लडमधील लहरी हवामान लक्षात घेता, प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी कामगिरी कशी होते, त्यावर सारे अवलंबून आहे. रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या यांच्यासह येणाऱ्या आणखी एका फलंदाजाला (केदार जाधव, दिनेश कार्तिक किंवा रवींद्र जाडेजा) पाकविरुध्द धावांच्या राशी उभाराव्या लागतील. ओल्ड ट्रॅफर्डच्या ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होतो तसेच खेळपट्टीही सुरुवातीला गोलंदाजाना अनुकूल ठरते. त्यामुळे नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, महमद शमी या तेज त्रिकुटासह हार्दिक पंड्या आणि यजुर्वेद चहल या गोलंदाजांना पाकच्या धावसंख्येला लगाम घालावा लागेल.

कर्णधार सर्फराज अहमदच्या पाकिस्तानी संघात शोएब मलिक, महमद हफीज या दोन माजी कर्णधारांसह फकर झमान, बाबर आझम, आसिफ अली, इमाम उल हक सारखे फलंदाज असून इमाद वसीम, महमद आमीर, वहाब रियाज, हसन अली, शदाब खान यांसारख्या गोलंदाजांचा ताफाही सर्फराजकडे मौजूद आहे.

विश्वचषकस्पर्धेत भारताने पाकिस्तावर सहा विजय मिळवितांना डबल हॅटट्रिक साधली आहे. १९९२-२०१५ दरम्यानच्या सातपैकी सहा विश्वचषकस्पर्धांत भारताने पाकवर सरशी साधली. २००७ मध्ये भारत-पाकचे आव्हान साखळीतच संपुष्टात आल्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामनाच झाला नाही. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीने भारताला विजयपथावर नेले. विराट कोहलीच्या भारतीय संघात रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, दस्तुखुद्द कोहली या अनुभवी शिलेदारांचा समावेश आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार नाबाद शतक झळकावताना व्यावसायिक बाणा दाखवला. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाशी मुकाबला करताना भारताच्या अव्वल पाच फलंदाजांना सूर गवसला. धवनला दुखापत झाल्यामुळे आता रोहितला नव्या साथीदारासह सलामी द्यावी लागेल. वहाब, अमीर, शदाब प्रभृतींच्या माऱ्याला भारतीय संघ नेटाने सामोरा जाईल आणि पाकवरील विजयाची भारताची परंपरा अखंडित राहील, अशी  आशा आहे. जसप्रीत बुमराह, महमद शमी, भुवनेश्वरकुमार या तेज त्रिकुटाच्या धारदार आक्रमणाला युजवेंद्र चहलच्या फिरकीची साथ लाभल्यास पाकला झटपट गुंडाळण्याचे भारताचे डावपेच सफल होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दोन वर्षांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एजबॅस्टनवरील साखळी लढतीत भारताने ३ बाद ३१९ अशी मजल मारली. रोहित शर्माने ९१ धावा फटकावल्या. उमेश यादवच्या तेज माऱ्यापुढे पाकचा डाव १६४ धावांतच आटोपला. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने १२४ धावांनी मोठा विजय संपादला. ओव्हलवरील अंतिम लढतीत मात्र चित्र पालटले. फकर झमानच्या फटकेबाज शतकामुळे (१०६ चेंडूत ११४ धावा) पाकिस्तानने ४ बाद ३३८ अशी मजल मारली. फकर झमान तसा सुदैवीच. जसप्रीत बुमराहने डावाच्या सुरुवातीलाच त्याचा त्रिफळा उडविला, परंतु पंचांनी नोबॉलची खूण केल्यामुळे फकर बचावला. त्याने शानदार, चौफेर फटकेबाजीसह शतकी खेळी केली. भारताचा डाव १५८ धावांतच आटोपला. त्यातही मोठा वाटा होता हार्दिक पंड्याचा. त्याने ४३ चेंडूतच ७६ धावा फटकावल्यामुळे भारताने १५८ पर्यंत मजल मारली. पाकने १८० धावांनी विजय मिळवून आयसीसी चॅपियन्स ट्रॉफी मिळवली. आयसीसी वनडे स्पर्धेच्या अंतिम लढतीतील सर्वात मोठा विजय पाकिस्तानने मिळविला. शतकवीर फकर झमान सामनावीर ठरला.

टी-२० विश्वचषकस्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या संघाने २००७ मध्ये विजेतेपद पटकावून भारतीय क्रिकेट शौकिनांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांसारख्या बुर्जुगांनी माघार घेतल्यावर धोनीकडे नवोदितांचा समावेश असलेला संघ सोपवण्यात आला. या स्पर्धेत भारताने पाकवर एकदा नव्हे तर दोनदा विजय संपादला. प्रथम साखळी लढतीत, नंतर अंतिम फेरीत! साखळी लढत बरेाबरीत (टाय) सुटल्यावर बॉल आऊटवर भारताने सामना जिंकला. अंतिम फेरीत सामन्यातील अखेरचे व निर्णायक षटक टाकण्यासाठी धोनीने जोगिंदरसिंगसारख्या नवोदित खेळाडूच्या हाती चेंडू सोपविला, श्रीशांतने मिसबा उल हकचा झेल घेऊन भारताला सामना जिंकून दिला.

दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावताना भारतावर मिळवलेल्या विजयाचा आम्ही आता फारसा विचार करत नाही. विश्वचषक ही प्रतिष्ठेची स्पर्धा असून त्याचा ढाचादेखील बदलला आहे. केवळ भारताविरुध्दच्याच लढतीवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, असे पाकचा कर्णधार सर्फराझ अहमद सांगतो. फकर झमान, इमाम उल हक यांचा हा पहिलाच विश्वचषक असून दोघांचाही भर आक्रमणावर असतो. दोघांनाही सूर गवसलाय ही पाकची जमेची बाजू.

विराट कोहलीसारख्या अव्वल फलंदाजाला झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी पाक गेालंदाजांचे हात शिवशिवत असतील, याउलट पाकविरुध्द शतक झळकावण्यासाठी कर्णधार विराट उत्सुक असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link