Next
माझी पन्नाशी आणि मी
पुष्कर श्रोत्री
Friday, May 03 | 05:00 PM
15 0 0
Share this story

अनेकविध भूमिका साकारणारा नट, उत्तम निवेदक, दिग्दर्शक आणि अजातशत्रू असा माणूस म्हणजे पुष्कर श्रोत्री. आजपासून पुढील पाच आठवडे आपल्याशी संवाद साधणार आहे खास त्याच्या शैलीत.


नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. परवाच 
(३० एप्रिल) मी पन्नासाव्या वर्षांत पदार्पण केलं. वयाची पन्नाशी आणि करिअरची पंचविशी असा दुहेरी योग यावर्षी जुळून आला होता. लोक मला म्हणतात, ‘अरे तू पन्नाशीचा वाटत नाहीस मग जाहीरपणे वय सांगतोस कशाला?’ परंतु मला असं वाटतं, की वय ही लपवण्याची गोष्ट नाही तर अभिमानानं सांगण्याची आणि सन्मानानं स्वीकारण्याची गोष्ट आहे. मी दिसायला चांगला आहे, नाकी-डोळी नीटस आहे, धट्टाकट्टा आहे हे खरं असलं तरी यात माझं कर्तृत्व काहीच नाही. माझ्या आई-वडिलांची ती देणगी आहे. सुदैवाने मला चांगले आई-वडील, चांगली शाळा, चांगलं महाविद्यालय, चांगले मित्र-मैत्रीण लाभले. वाढदिवस साजरा करण्याचं जेव्हा मी ठरवत होतो तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. सर्वसाधारणपणे पन्नासावा वाढदिवस म्हटला की लोक पार्ट्या करतात, दारू पितात, फिरायला जातात, मित्रांबरोबर मजा करतात आणि मग वाढदिवस संपतो. मला यापैकी काही करण्यात अप्रूप नाही की याचं आकर्षणही नाही. मला असं काहीतरी करायचं होतं, ज्याचा फायदा मला नाही तर इतरांना होईल. मी लहानपणापासून माझ्या आई-वडिलांना बघत आलोय. आपल्या गरजेपुरतं आपल्याला मिळालं ना मग आता इतरांना फायदा होईल असं केलं पाहिजे हे त्यांचे संस्कार. समाजात अशी काही माणसं आहेत की जी मूलभूत गोष्टींपासून वंचित असतात. आपल्याला जे सहजासहजी मिळतं ते त्यांना कष्ट करूनही मिळत नाही. अशा लोकांसाठी यानिमित्तानं काहीतरी करायला हवं हा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी त्या दिशेने शोध सुरू केला. 

‘समाजाचं आपण देणं लागतो. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.’ अशी वाक्य मी फेकत नाही कारण ती ऐकताच क्षणी क्लिष्ट आणि खोटी वाटू शकतात. त्यापेक्षा थेट कृती करण्यावर माझा भर होता. मग मी डोळे उघडे ठेवून आजूबाजूला शोधायला लागलो. ठाण्यामध्ये बटू सावंत नावाचे एक गृहस्थ ‘सिग्नल शाळा’ नावाची एक शाळा चालवतात. ट्रॅफिक सिग्नलवरच्या किंवा उड्डाणपुलांच्या खाली जे वस्तीला आलेले असतात अशा भिकाऱ्यांच्या मुलांसाठी ते शाळा चालवतात. मी जेव्हा बारकाईनं त्यांच्या या कामाची पाहणी केली तेव्हा त्या शाळेतून पुढे आलेल्या एका अत्यंत गरीब मुलाला या वर्षी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाल्याचं कळलं. बटू सावंत हे एका वेगळ्या ध्यासानं, प्रेरणेनं झपाटून जाऊन आणि अक्षरशः वेडे होऊन हे काम गेली काही वर्षं नेमाने करत आहेत. त्यांना आपण मदत केली पाहिजे असं मला मनापासून वाटलं. दुसरी एक संस्था मला दिसली ती कोल्हापूरची ‘चेतना विकास’ ही संस्था. पवन खेबूडकर हे त्याचे संचालक. समाजातील चुकीच्या गोष्टी, अनिष्ट घटना पटकन लोकांसमोर येतात पण समाजाच्या भल्यासाठी झटणारे हात मात्र आपल्याला दिसत नाहीत. या लोकांचं काम खरंच खूप मोठं आणि खूप आवाहनात्मक आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही असं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. बरं, हे सगळं कुणासाठी तर समाजातील वंचित घटकांसाठी. कोल्हापुरातील ‘चेतना विकास’ ही संस्था गतिमंद, विकलांग मुलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी झटत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं काम करत आहे. समाजानं अशा मुलांकडे सहानुभूतीनं न पाहता सन्मानानं पाहावं व आपणसुद्धा समाजातील महत्त्वाचा घटक आहोत ही भावना त्यांच्याही मनात रुजावी ही या संस्थेच्या कामामागील प्रेरणा आहे. या संस्थेलाही मदत केली पाहिजे असं मला वाटलं. तिसरी संस्था म्हणजे ‘कलाश्रय’. रंगभूमीवर एक काळ गाजवलेले काही कलाकार कधीकधी त्यांच्या वृद्धापकाळी मात्र वाईट अवस्थेत जगात असतात. अशा पडद्यावरच्या  आणि पडद्यामागच्या काही कलाकारांसाठी विशाखा सुभेदार ‘कलाश्रय’ नावाचा वृद्धाश्रम सुरू करत आहे. या कामात तिला मदत करायचं मी ठरवलं आहे. 

तर अशा या तीन संस्थाना मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आर्थिक मदत करणार आहे. त्यासाठी येत्या रविवारी, ५ मे रोजी पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहात माझ्या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. या तिन्ही नाटकांचं उत्पन्न मी या संस्थांना देणार आहे. याशिवाय माझ्या तिन्ही निर्मात्यांचे पैसे मी त्यांना देणार आहे कारण एक प्रयोग लावण्यामागे त्यांना किती खर्च असतो हे मला माहीत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मी संस्थांना मदत करणार आहे तर त्याचा भुर्दंड निर्मात्यांना कशाला? हाच विचार मी प्रेक्षकांच्या बाबतीतही केला आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनाही भुर्दंड नको म्हणून मी तिकिटांची किंमत अत्यंत कमी ठेवली असून पाचशे, चारशे आणि तीनशे रुपयांच्या तिकिटात त्यांना तीन नाटकं पाहायला मिळणार आहेत. ‘आम्ही आणि आमचे बाप’,  ‘अ परफेक्ट मर्डर’ व ‘हसवा फसवी’ ही तिन्ही नाटकं रंगभूमीवरची सध्याची आघाडीची नाटकं असून त्यात मी वेगवेगळ्या बारा भूमिका करत आहे. माझं प्रेक्षकांना असं आवाहन आहे की तुम्ही अवश्य या. तुमच्या तिकिटाची जी काही रक्कम असेल ती वरील तीन संस्थांच्या माध्यमातून चांगल्या कार्यासाठी जाणार आहे. ही संकल्पना जरी माझ्या डोक्यातून आली असली तरी याची मुळं आई-वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमध्ये, माझ्या बालपणामध्ये रुजलेली आहे.. आपल्याला पुरेसं मिळालं आहे ना मग बाकीचं देऊन टाकुया, ही देण्याची वृत्ती आई-बाबांमध्ये होती. विश्वास सोहोनी यांच्या एकांकिकेतील एक वाक्य कायम माझ्या स्मरणात राहिलं आहे, ‘आपली पोळी आपण खाणं ही प्रकृती आहे पण आपल्यातील अर्धी पोळी काढून दुसऱ्याला देणं ही खरी संस्कृती.’ आज पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करताना माझ्या मनात नेमक्या ह्याच भावना आहेत की आपल्याला पुरतंय ना, मग थोडं दुसऱ्याला देउया. हा वारसा देणाऱ्या आई-वडिलांच्या पंखांखाली मी कसा घडलो, हे पुढच्या भागात. धन्यवाद!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link