Next
तीन महिने कामाचे, उरलेले निवडणुकीचे!
दीपक भातुसे
Friday, December 28 | 01:15 PM
15 0 0
Share this story

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने येत्या नवीन वर्षात तीन महिने कामाचे आणि नऊ महिने निवडणुकीचे अशीच परिस्थिती असणार आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. लोकसभा व महाराष्ट्राची विधानसभा या दोन्ही निवडणुका २०१९ मध्ये होणार असल्याने राज्यात भाजपसह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे नव्या वर्षाचा सूर्य उगवताना राजकीय क्षेत्रातील मरगळ दूर सारून पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागावे लागणार आहे. लोकसभेची निवडणूक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीसाठी कमी दिवस शिल्लक आहेत. भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याचा फैसला जानेवारी महिन्यातच करावा लागणार आहे. युती करायची नाही, यावर शिवसेना ठाम राहिली, तर त्यांना जानेवारीपासूनच भाजपविरोधात प्रचाराची सुरुवात करावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची प्राथमिक बोलणी सुरू झाली आहेत. जानेवारी महिन्यातच आघाडीच्या जागावाटपाची अंतिम घोषणा होणार आहे. तर दुसरीकडे महाआघाडीने जानेवारी महिन्यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवले आहे.  जानेवारीपासून राज्यात सुरू होणारा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा खाली बसायला मे महिना उजाडेल. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. त्यानंतर एप्रिल आणि मे महिना लोकसभा निवडणुकीचे कवित्व सुरू राहील. मे महिन्यात केंद्रात नवे सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने आचारसंहितेत जाणार असल्यामुळे राज्यातील सरकारलाही या कालावधीत कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे मे महिन्यात आचारसंहिता संपली, की राज्य सरकार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोडमध्ये जाईल. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय चित्रही बदलण्याची चिन्हे आहेत. लोकसभेत भाजपने सत्ता राखली, तर विधानसभा निवडणूक भाजपला सोपी जाऊ शकते. केंद्रातील सत्ता गमवावी लागली, तर मात्र भाजपला विधानसभेसाठी भरपूर मेहेनत करावी लागेल.

हाच न्याय काँग्रेसलाही लागू होईल. मे महिन्यातील लोकसभा निकालानंतर राज्य सरकारच्या हातात काम करण्यासाठी पुढे साडेतीन ते चार महिन्यांचाच कालावधी शिल्लक असेल. या कालावधीत विधानसभा निवडणुकीवर प्रभाव पाडणारे निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. याच कालावधीत युती-आघाडीतील जागा वाटपाच्या घडामोडींना वेग येईल.

सप्टेंबर २०१९ च्या मध्यावर राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी युती-आघाडीचे जागा वाटप पूर्ण करावे लागेल. ऑक्टोबर २०१९ च्या मध्यावर राज्यात विधानसभेची निवडणूक होऊन ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होईल. नवे सरकार आल्यानंतर नोव्हेंबरचा महिना नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि नव्या सरकारच्या स्थापनेत जाईल. डिसेंबर महिन्यातील थंडीत नव्या सरकारचे पहिले अधिवेशन होईल आणि राज्य २०२० च्या स्वागताच्या तयारीला लागेल. त्यामुळे येणारे २०१९ हे वर्ष राज्य कारभारापेक्षा निवडणुकीच्या धामधुमीचे वर्ष ठरणार आहे व त्यातही पहिले तीन महिनेच प्रत्यक्ष कामाचे मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link