Next
स्वरज्योतीची तेजस्वी आठवण
धनश्री लेले
Friday, November 02 | 12:00 AM
15 0 0
Share this story

दिवाळीपहाटेचे कार्यक्रम हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. आपल्या राज्याच्या अनेक भागांत नानाविध कार्यक्रम दिवाळीच्या पहाटे असतात. बरं, घरातली दिवाळी सोडून हे कार्यक्रम पाहायला लोक येतात तरी का, असा प्रश्न मनात ठेवून जर कोणी गेलं तर प्रचंड गर्दी पाहून त्याला त्या प्रश्नाचं उत्तर आपसूक मिळतं. रसिक नटूनथटून आलेले असतात, अगदी पारंपरिक वेशभूषेत. इतके, की कधी कधी तर मंचावरच्या कलाकारांनाही न्यूनगंड यावा! सभागृह उत्तम सजवलेलं असतं, मंच फुलांनी, दिव्यांनी, पणत्यांनी, रांगोळ्यांनी देखणा केलेला असतो. सभागृहात गजरे, अत्तर यांचा घमघमाट पसरलेला असतो. म्हणजे बालगंधर्वांच्या नाटकाच्या वेळी असा माहोल असायचा, असं म्हणतात, त्याचीच एक झलक जणू अनुभवायला मिळते. हा कार्यक्रम जर एखाद्या देवळात किंवा ऐतिहासिक वास्तूत असेल तर त्याची सात्त्विकता आणखीच वाढते.

असाच स्मरणात राहिलेला एक कार्यक्रम नागपूरचा. देवकी पंडित यांचा. देवकीताईंबरोबर मी पहिल्यांदाच निवेदन करणार होते. आम्ही दोघीच मुंबईहून नागपूरला गेलो. बाकीचा संच तिकडचा होता. देवकीताईंचा स्वभाव कसा असेल, त्या कशा बोलतील, असे अनेक प्रश्न मनात होते. आदल्या दिवशी संध्याकाळीच आम्ही दोघी नागपूरला पोहोचलो. एकाच विमानानं गेलो होतो, तरी भेट मात्र नागपूर विमानतळावरच झाली. रात्री आमची सोय एका फार्महाऊसवर करण्यात आली होती. जागा चांगली होती, पण तिथे खूप मोठे मोठे डास होते. मी भिडस्तपणानं काही बोलले नाही. मात्र देवकीताईंनी मात्र आयोजकांना जागा बदलण्याबद्दल सांगितलं. आणि मला एवढंच म्हणाल्या, ‘’अगं, सकाळी गायचं तर रात्रीची झोप शांत लागली पाहिजे ना. गैरसोय सांगताना भिडस्तपणा असता कामा नये, कारण शेवटी उद्याचा कार्यक्रम महत्त्वाचा. तुम्ही रात्री कसं सांभाळून घेतलंत हे दुसऱ्या दिवशी कोणी विचारणार नसतं. तेव्हा तुमची कामगिरी फक्त पाहिली जाणार असते.” किती छान सांगितलं देवाकीताईंनी! मी नव्यानंच आले होते या क्षेत्रात. या कलाकारांबरोबर काम करताना किती शिकायला मिळतं!

आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. त्या साधारण काय काय गातील याचा एक अंदाज त्यांनी मला दिला. मग त्या अनुषंगानं आमच्या कितीतरी विषयांवर गप्पा झाल्या. स्त्री संत, कबीरदास, अभिषेकीबुवा, भावगीत, नाट्यपदं... कितीतरी!  खूप मजा आली. त्यांचा अनुभव, त्यांचे विचार, मी काही वाचलेलं असं एकमेकींशी बोलताना बराच वेळ गेला, पण शिस्त सोडतील तर त्या देवकीताई कसल्या! लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीचा गजर लावण्याची आठवण केली. बरोबर पहाटे पाच वाजता थोड्याशा बोचऱ्या थंडीत, आम्ही कार्यक्रम जिथे होता, त्या मैदानावर पोहोचलो. जाताना बरोबर देवकीताईंनी दोन केळी आवर्जून घेतली आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आठवणीनं खायला लावली. कार्यक्रम सहाचा होता. मात्र देवाकीताईंनी साडेपाचलाच, रसिक येण्यापूर्वीच साउंड चेक केला आणि त्या तयार होऊन बसल्या. कलाकारानं वेळ कशी पाळावी, याचा वस्तुपाठच जणू. तो कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. नागपुरातले बरेच नामवंत त्या कार्यक्रमाला आले होते. अभंग, नाट्यपदं एकामागोमाग एक रंगत होती. दोन-अडीच तास झाले, सूर्य आपल्या पूर्ण तेजानं प्रकाशू लागला तरी रसिकांचं मन मात्र भरत नव्हतं. शेवटी ‘कैवल्याच्या चांदण्याला’ ही भैरवी देवकीताईंनी गायली.... सगळे तल्लीन झाले होते. कार्यक्रमात देवकीताईंच्या गाण्याबरोबरच माझ्या निवेदनालाही रसिकांकडून दाद मिळत होती, याचं एक अपार समाधान त्या उमेदवारीच्या काळात मला मिळालं.

कार्यक्रम संपल्यावर त्याच्या आठवणीत रमून घरी परत येत असतानाच देवकीताईंनी नागपूर विमानतळावर मला ओशोंचं ‘मीरा’ हे पुस्तक विकत घेऊन दिलं. माझ्या निवेदनाला त्यांनी दिलेली पावती होती ती. परतीच्या प्रवासात परत गप्पा... ‘खाण्यापिण्याचं नियोजन’ यावर देवकीताई छान बोलत होत्या. खूप काही शिकले त्यांच्याकडून. कलावंत म्हणून आपला आब साधेपणानंही कसा राखता येतो, हे त्यांच्या वावरातून जाणवलं.

कार्यक्रमाच्या ठिकाणी भोवताली उजळलेल्या दिव्यांच्या ज्योती,  आठवणीत देवकीताईंच्या स्वरज्योती आणि मनात चांगल्या विचारांनी प्रज्वलित झालेल्या ज्योती! या कार्यक्रमानं बाहेरची आणि मनाच्या आतली अशा दोन प्रकारची दिवाळी एकाच वेळी अनुभवण्याची संधी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link