Next
सांस्कृतिक महाराष्ट्र
प्रतिनिधी
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story

मुस्लीम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा सामाजिक जीवनगौरव पुरस्कार
‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे प्रतिवर्षी सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक या क्षेत्रांत, जीवनभराच्या सृजनशील आणि मौलिक कार्याने लक्षणीय भर घालून, महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तीस, समाजाच्या मनातील कृतज्ञतेची खूण म्हणून ‘जीवनगौरव पुरस्कार’ पुरस्कार १९९१ पासून देण्यात येतो. यासाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत ‘झी मराठी दिशा’ व ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, प्रकाश पाठक, सुधीर जोगळेकर, भानू काळे, विनायक पाटील व डॉ. सागर देशपांडे यांचा समावेश होता. सदर समितीने यंदाच्या सामाजिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष सय्यदभाई यांची एकमताने निवड केली आहे.
तलाकपीडित मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देत असतानाच त्यांच्या पुनर्वसनासाठी अविरत कार्यरत राहणाऱ्या हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या कामाची धुरा त्यांच्या पश्चात निरंतर चालू ठेवणाऱ्या आणि तिहेरी तलाकपद्धत बंद होण्यासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या सय्यदभाई यांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन निवडसमितीने त्यांचे नाव या वर्षीच्या चतुरंगच्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’साठी सुनिश्चित केले आहे. चतुरंगचा हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या दीर्घ सामाजिक लढ्याला विनम्र अभिवादन असल्याची भावना प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी चतुरंगचा हा पुरस्कार मावशी हळबे, डॉ. इंदुमती पारीख, पांडुरंगशास्त्री आठवले, नानाजी देशमुख, साधनाताई आमटे, शरद जोशी आणि गिरीश प्रभुणे या मान्यवरांना देण्यात आला आहे. या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा दोन दिवसीय ‘रंगसंमेलनसोहळा’ डिसेंबर २०१९ मध्ये नाशिक येथे करण्याचा संस्थेचा मानस आहे.रुस्तमजी अर्बेनिया अझियानो सोसायटीत गणेशोत्सव साजरा
ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया अझियानो सोसायटीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. आझियानो ए, बी व सी विंगमधील रहिवाशांनी या उत्सवात हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. सोसायटीतील गणेशोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून इकोफ्रेन्डली मूर्ती व सजावट हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यंदा मंडळाने चांद्रयान-२ हा आकर्षक देखावा उभारला आहे. या देखाव्याद्वारे इस्रोच्या वैज्ञानिकांना एक प्रकारे मानवंदनाच देण्यात आली आहे. शिवाय, लहान मुलांना अंतराळाविषयी आकर्षण व्हावे असाही हा देखावा साकारण्यामागे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले. सोसायटीमधील लहान मुलांच्या अभिनय, गायन, नृत्य अशा विविध स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येत असून सर्वधर्मीय मुले या सर्व स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. मुलांमधील कलागुणांना या स्पर्धांच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळाले अशी भावना या स्पर्धक मुलांच्या पालकांनी व्यक्त केली. श्रीगजाननाची सुबक मूर्ती, मंडळाने साकारलेला देखावा पाहण्यासाठी भाविक तुफान गर्दी करत आहेत.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्षात दमदार पदार्पण
दि. ६ सप्टेंबर, १९७० रोजी डोंबिवली येथे केवळ ४८७ सभासदांकडून जमा केलेल्या ६०,६०० रुपयांच्या भाग-भांडवलावर डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा शुभारंभ झाला होता. पहिल्या दिवशी २८७ खाती व २५,३०० रुपयांच्या ठेवी गोळा झाल्या होत्या. आज याच बँकेचे सुमारे एक लाख सभासद असून एकूण भाग-भांडवल १५० कोटी रुपयांपर्यंत पोचले आहे. बँकेचा मिश्र व्यवसाय ७,७०० कोटी रुपयांहून अधिक असून, बँकेच्या महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत ६९ शाखा सक्रिय आहेत. बँकेला बहुराज्यीय दर्जा (मल्टी स्टेट) मिळाला असून चांगला लाभांश देणारी बँक असा या बँकेला लौकिक प्राप्त झाला आहे. याच आर्थिक सक्षमतेमुळे डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडे विलीनीकरणासाठी अन्य चार-पाच बँकांचे प्रस्ताव आले आहेत.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून ६० लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज बँकेतर्फे उपलब्ध केले गेले आहे. त्याचप्रमाणे, अन्य वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात १ ते २ टक्के सवलत देत, त्यांचे कर्ज शिफ्ट करून घेण्याची योजना बँकेने कार्यान्वित केली आहे. किमतीच्या ९५ टक्क्यांपर्यंत गृहकर्ज, १०० टक्के वाहनकर्ज, केवळ ९.९५ टक्के इतक्या अल्प व्याजदराने सुवर्णतारण कर्ज, पगारदार व नोकरदारांसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट, तर निवृत्तवेतनधारकांसाठी कर्ज अशा बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कर्जयोजना आहेत.
डी.एन.एस. गोल्ड हे ६ टक्के व्याज देणारे बचतखाते, कमाल व्याज देणारी डी.एन.एस.बी. एस.आय.पी. योजना, करबचत आणि चांगला परतावा देणारी शुभंकर योजना या बँकेच्या आकर्षक ठेवयोजना आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मोबाइल बँकिंग, रुपे डेबिट कार्डची सेवा देणारी पहिली सहकारी बँक म्हणून या बँकेची गणना केली जाते. भीम, फोन पे, गुगल पे, पेटीएम अॅप यांसोबतही डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे खाते जोडणे शक्य असून, त्याद्वारे आणि बीबीपीएसच्या माध्यमातून वीज, टेलिफोन, मोबाइल बिले तसेच डीटीएच, मोबाइल रिचार्ज करणे सोपे झाले आहे. बँकेने पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशिन्सची तसेच क्यू.आर. कोडची सुविधा उपलब्ध केली असून, अनेक व्यावसायिक आस्थापना, दुकानदार या सेवांचा लाभ घेत आहेत.
सभासद तसेच ग्राहकांसाठी घरगुती गणेशोत्सव सजावटस्पर्धा, महिला ग्राहक सभासदांसाठी जागतिक महिलादिनी मेळाव्याचे आयोजन, सभासद-ग्राहकांच्या सहभागाने दिनदर्शिकेचे निर्माण असे विविध उपक्रमही बँकेतर्फे दरवर्षी यशस्वीरीत्या राबवले जातात.
बँकिंगसोबतच सामाजिक जाणिवेने काम करणारी एक बँक म्हणून या बँकेची ओळख आहे. सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण, वनवासी, वैद्यकीय, शैक्षणिक अशा क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सुमारे दोनशेहून अधिक संस्थांना काही कोटींची मदत केली आहे. त्याचबरोबर समाजातील तळागाळातल्या जनतेच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस समाजमित्र, तसेच सहकारक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेस अथवा व्यक्तीस सहकारमित्र पुरस्कार बँकेच्या वतीने प्रदान केला जातो. देशभरात आज सुमारे १५०० सहकारी बँका कार्यरत आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेची गणना देशभरातील पहिल्या १५ सहकारी बँकांमध्ये केली जाते. आपल्या सर्वसमावेशक कामगिरीमुळे महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक्स फेडरेशन, तसेच महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने या बँकेला अनेकदा सन्मानितही केले आहे.
आर्थिकदृष्ट्या व आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध व सक्षम बँक बनत असताना, संवेदना न गमावता, सामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्याचा, तसेच ग्रामीण व निमशहरी भागांत आपला पाया विस्तारण्याची योजना अमलात आणण्याचा निर्धार संचालकमंडळाने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link