Next
सुपरवुमन मेरी
नितीन मुजुमदार
Friday, November 30 | 05:54 PM
15 0 0
Share this storyपूर्वांचल भागातील अनेक स्पोर्ट्स सक्सेस स्टोरीजपैकी तिची एक. मात्र इतर अनेक यशोगाथांपेक्षा वेगळी आणि अधिक संघर्षमयदेखील! बॉक्सर मेरी कोमने पहिले जागतिक स्पर्धेतील पदक मिळविले ते २००१ साली.

आता नुकतेच नोव्हेंबर २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपद तिने मिळविले आहे. जवळपास दोन दशकांच्या कालावधीत तिने सहा जागतिक अजिंक्यपदे आणि ऑलिम्पिकमध्ये एक कांस्यपदकही तिने कमाविले आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जेतेपदांची तर गणनाच नकोच! या दोन दशकांमध्ये अनेक छोट्यामोठ्या अडचणी आव्हान होऊन येत होत्याच, त्यांनाही तिने नमविले. तीन मुलांची आई असलेल्या मेरी कोमने ती जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे . अलिकडच्या काळातील ही भारतीय सुपर वुमन उगवत्या खेळाडूंसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्व ठरते आहे.

‘मी एवढी टफ आहे, याला कारण माझे बालपण,माझ्या सभोवतालची  परिस्थिती,’ असे मेरी कोम सांगते. घरी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या एका भूमिहीन शेतमजुराची ती मुलगी. मणिपूरच्या सगांग या चुरचंदपूर जिल्ह्यातील एका खेड्यात २४ नोव्हेंबर १९८२ रोजी मेरीचा जन्म झाला. मेरीला एक लहान भाऊ व एक लहान बहीण. आई-वडील अगदी कमी शिकलेले त्यामुळे मुलांनी शिकण्याबाबत ते बऱ्यापैकी आग्रही होते. छोटी मेरी रोज एक तास चालून शाळेत जायची. घरकामात आईवडिलांना मदत करण्यातही ती कधी मागे नव्हती. अगदी भाताचे शेत नांगरण्यापर्यंत ती पालकांना हातभार लावायची. बैलांच्या जोडीचा नांगर एक  छोटी मुलगी ओढतेय हे बघून पुरुष मंडळी आश्चर्यचकित व्हायची. तिचे वडील एकेकाळी त्यांच्या गावातील  नावाजलेले कुस्तीगीर होते. आई देवभोळी पण मनाने अतिशय कणखर होती. वडिलांना अनेकवेळा जंगलात लाकूड तोडण्याच्या व वाहण्याच्या कामावर जावे लागे.

मेरीच्या वडिलांना खेळाची आवड असल्याने आपल्या मुलांनीही खेळाडू व्हावे, असे त्यांच्या मनात होते. त्यामुळेच त्यांनी मेरीला तू अॅथलिट हो असे  सांगितले. त्यानुसार शाळेतील प्रत्येक स्पर्धेमध्ये मेरीने सहभागी होण्यास सुरुवात केली. ‘तू जे पेरशील ते तुला मिळेल व मी जे पेरीन ते मला मिळेल. ‘अशा अर्थाचे एक मणिपुरी सुभाषित वडील तिला कायम ऐकवायचे. त्यामुळे लहान असल्यापासून प्रामाणिकपणा तिच्या नसानसात आहे. जे काही करायचे ते प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन हा तिचा स्थायीभाव झाला होता. त्यामुळेच खेळातच करिअर करायचे यासाठी तिने जिवापाड मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच मग तिने इम्फाळ गाठले.

 तिला वडिलांनी सांगितले होते, ते मनात ठेवून तिने मणिपूरची राजधानी इम्फाळ गाठले ते खेळात करिअर करण्यासाठी. ते वर्ष होते १९९९.  इम्फाळला आल्यानंतर मेरीचा मुक्काम एलआयसीमध्ये काम करणाऱ्या मामेभावाकडे होता. मेरीने स्पोर्ट्समध्ये करिअर करावे असे त्यालाही वाटते होते. फक्त तिने सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक क्रीडाप्रकार निवडावा यासाठी खूप आग्रही होता. त्याच काळात म्हणजेच १९९८ मध्ये मणिपूरच्या डिंको सिंह यांनी बँकाँक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. तेव्हापासूनच मेरीला बॉक्सिंगबद्दल आवड निर्माण झाली. डिंको सिंह यांना मिळालेल्या यशामुळे मेरी खूपच प्रभावित झाली होती. याशिवाय,ख्यातनाम बॉक्सर  मोहम्मद अली व त्याची मुलगी लैला अली या दोघांची ती फार मोठी फॅन होती. त्यातूनच आपणही हाच क्रीडाप्रकार शिकायचा हे मनोमन ठरवले. इम्फाळमधील बॉक्सिंग शिकवणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांमधून मेरीने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. इम्फाळ येथे गेलेली आपली मुलगी बॉक्सिंग खेळते हे मेरीच्या आईवडिलांना बरेच दिवस माहीतही नव्हते. २००० मध्ये स्थानिक वर्तमानपत्रात छापून आलेल्या ‘स्टेट चॅम्पियन’च्या फोटोवरून त्यांना हे समजले. त्यानंतर मेरीच्या घरी मोठा गदारोळ झाला. बॉक्सिंग करताना दुखापत झाल्यास उपचार करणे अवघड होईल आणि लग्न करतानाही अडचण येईल, अशी भीती तिच्या वडिलांना वाटत होती. मेरीने बॉक्सिंग खेळू नये यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला होता. पण मेरीच ती... हा दबाव तिने झुगारून लावला आणि बॉक्सिंगचाच निर्धार कायम ठेवला. तिच्या या निर्धारापुढे घरचेही नमले आणि तिला बॉक्सिंग खेळण्यासाठी त्यांनी नाराजीने का होईना परवानगी दिली. त्यानंतर मेरीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. कठोर मेहनत,पराकोटीची जिद्द आणि खडतर मेहनत घेत तिने बॉक्सिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतानाही अडचणींचे अनेक डोंगर तिच्यासमोर होते, पण त्यावर मात करत तिने आपल्या ध्येय्याच्या दृष्टीने आगेकूच सुरूच ठेवली. बॉक्सिंगच्या एका स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून कुटुंबीयांसाठी तिने टीव्ही घेतला. त्याचे तिच्या घरच्यांना खूप अप्रूप वाटले होते...

बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी मेरीने घर सोडलं तरी गरिबीशी आणि त्यामुळे समोर येणाऱ्या अडचणींशी तिचा अविरत संघर्ष सुरूच होता. तिच्या आत्मनिश्चयाच्या जोरवर ती या अडचणींना नॉकआऊट करत होती. अशाच एका प्रसंगातून तिला एक चांगला धडा आणि आयुष्यभराचा साथीदार मिळाला... झाले असे, २००१ वर्षाच्या सुरुवातील मेरी हिस्सार येथे प्रशिक्षण आणि त्यानंतर होणाऱ्या निवडचाचणीसाठी जात होती. ट्रेनमधून तिची साखळीने बांधलेली सुटकेस साखळीसकट कापून चोरीला गेली. सर्व सामान,पैसे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  पासपोर्टही गेला होता. या धक्क्याने मेरी उन्मळून गेली. पासपोर्ट नसेल तर संघात निवड होऊनही मेरी संघाबरोबर जाऊ शकणार नव्हती. हे जेव्हा तिचा मित्र ऑनलेर कोम याला कळले तेव्हा त्याने त्याच्या सहकाऱ्यांसह आणि मेरीच्या हितचिंतकांसह धावपळ करून तिचा नवीन पासपोर्ट तयार करून घेतला. इतकेच नाही तर हिस्सार इथल्या सरावशिबिरात स्वत: जाऊन तिला पासपोर्ट दिला. सराव शिबिरानंतरच्या निवड चाचणीत मेरीची निवड झाली, आणि मेरी पहिल्या आशियाई स्पर्धांसाठी बँकाँकला रवाना झाली... हळूहळू या दोघांत हळुवार नाते फुलू लागले होते...

आपल्या कारकिर्दीमधील पहिल्यावहिल्या जागतिक स्पर्धेत मेरीने रौप्यपदक मिळवल्यामुळे तिला केंद्र सरकारने नऊ लाख रुपयांचे बक्षीस दिले. ते मिळाल्यावर मेरीने सर्वप्रथम काय केले असेल तर आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात राबलेल्या आपल्या वडिलांसाठी जमिनीचा एक तुकडा खरेदी केला, कुटुंबातील सर्वांसाठी भेटवस्तू घेतल्या. स्वतःसाठी मोटारसायकल घ्यायची होती, पण आईच्या आग्रहामुळे तिला स्कूटर घ्यावी लागली!

जवळजवळ दोन दशके मेरी बॉक्सिंग खेळते आहे. दरम्यानच्या काळात तिचे आणि ऑनलेरचे लग्न झाले. लग्नानंतर तुझे बॉक्सिंगचे करिअर संपून जाईल, अशी भीती तिच्या वडिलांना असल्यामुळे त्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला होता. पण लग्न करीन तर ऑनलेरशी यावर ती ठाम होती. ऑनलेरनेही लग्नानंतर तिच्या खेळात खंड पडणार नाही, असे वचन दिल्यानंतर वडिलांचा लग्नाचा विरोध मावळला. त्यानंतर २००५ मध्ये या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर संसार, तिन्ही मुलांचा जन्म या जबाबदाऱ्या तिने लीलया सांभाळल्या.  सासऱ्यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली हा धक्का तिने मोठ्या धैर्याने पचवला. आयुष्यात अनेक चढउतार आले तरी त्या काळातही तिने आपला खेळ सुरूच ठेवला. त्यामुळेच अनेकदा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊनही तिने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली. खरी कसोटी होती ती २०११ मध्ये. त्यावेळी मेरीची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली होती. आणि त्याचवेळी मेरीच्या साडेतीन वर्षांच्या मुलाची हृदयाची शस्त्रक्रिया होणार होती. अशावेळी एक आई म्हणून तिच्या जिवाची प्रचंड घालमेल झाली होती… काय करायचे असा यक्ष प्रश्न तिच्यासमोर ठाकला होता… या प्रसंगात तिला ऑनलेरने खंबीर साथ दिली. त्याने मुलाची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन तिला दिले इतकेच नाही तर, तुझे सर्व लक्ष स्पर्धेवर केंद्रित कर असेही सांगितले…काळजावर दगड ठेवून मेरी चीनला गेली… तेथे जाऊन त्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले… तिची ही जिद्दी, तिचे हे धैर्य खरोखरच अद्भुत म्हणावे लागेल…

एक खेळाडू म्हणून मेरी सर्वोत्कृष्ट आहेच, तितकीच आई आणि गृहिणी म्हणूनही ती सर्वोत्तम आहे. आजही कोणत्याही टूरहून आल्यावर मेरी स्वयंपाकघरात रमते. घरी आल्यावर ती मुलांचा ताबा नवरा,ऑनलेरकडून आपल्याकडे घेते. त्यांच्या कपड्यांना इस्त्री करणे, पुस्तकांना-वह्यांना स्टिकर चिकटवणे, त्यांचे होमवर्क घेणे ही कामे करायला तिला खूप आवडतात. घरच्या छोट्या बागेतही ती खूप रमते. मणिपूरमध्ये तिची स्वत:ची बॉक्सिंग अकादमी आहे. या अकादमीत शिकणाऱ्या मुलांसाठी मेरी स्वत: स्वयंपाक करते! तिची बॉक्सिंग अकादमी ३.३० एकर जमिनीवर पसरलेली असून सध्या तेथे १२ ते १८ वयोगटांतील ४३ मुलगे व ४७ मुली प्रशिक्षण घेत आहेत!

दिल्लीतील जागतिक अजिंक्यपदानंतर मेरी कोमचे लक्ष्य आहे २०२० चे टोकयो ऑलिंपिक्स. तेथे तिला अधिक तगड्या प्रतिस्पर्ध्याना तोंड द्यावे लागेल. तेथे ती ५१ किलो वजनी गटात खेळेल. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळाल्यावर  सुवर्णपदकाची सवय असलेली मेरी प्रचंड निराश झाली होती.ऑलिंपिकमध्ये कुठलही पदक मिळाले तरी त्याला खूप महत्त्व आहे हे तिला नंतर समजले व ती काहीशी स्वस्थ झाली! दिल्लीतील यशामुळे मेरी नक्कीच खूप प्रोत्साहित झाली असणार व त्याचा उपयोग तिला आगामी स्पर्धांमध्ये नक्की होईल.

अत्यंत खडतर बालपणानंतर खेळाडू म्हणून मानाचे खासदारपद, विविध नागरी सन्मान,जागतिक अजिंक्यपदे,ऑलिम्पिकपदक ,हे सारे तिने मेहनतीने मिळविले आहे. उत्तम पत्नी - माता- कन्या अशा  विविध कौटुंबिक जबाबदाऱ्याही ती समर्थपणे पार पाडत आहे. तमाम भारताला भूषणास्पद अशा  या ‘सुपरवुमन’ला भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा!‘मेरी आजही जमिनीवरच आहे’

मेरीचा फिजिओथेरपिस्ट ही जबाबदारी पुण्याचा आयुष येखंडे याच्याकडे आहे. मेरीबरोबर आयुष दोन वर्षांपासून काम करत आहे. मेरीबद्दल आयुष सांगतो,“ मेरी प्रचंड शिस्तप्रिय आहे. मेहनतही खूपच घेते. याची दोन उदाहरणे मला आवर्जून सांगावीशी वाटतात, ती म्हणजे मंगोलियात एका स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचप्रमाणे  ऑस्ट्रेलियात कॉमन वेल्थस्पर्धेत मेरी सुवर्णपदकाची विजेती ठरली होती.  या दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत खूप फरक होता. फरक नव्हता तो तिच्या दिनचर्येत. दोन्ही ठिकाणी मी तिला स्पर्धेनंतर सकाळी १० किमी पळून नंतर जिममध्ये वर्कआऊट करताना पाहिले आहे.  मेरीला उत्तम स्वयंपाक येतो. कधी कधी माझ्यासाठी आणि आमचे कोच छोटेलाल यांच्यासाठी ती स्वत: आमच्या आवडीचे पदार्थ करून आणते.  आयुष पुढे सांगतो,‘एवढी कीर्ती मिळवूनही तिचे पाय जमिनीवर आहेत, तिच्या वागण्याबोलण्यातून तिची फेम कोठेही जाणवत नाही. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link