Next
श्रमदान नव्हे, श्रमआनंद
सुहास गुधाटे
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


सांगली, कोल्हापूरच्या पुराच्या बातम्या फोनवर, टीव्हीवर येऊ लागल्या. पूर्वी अनेक नैसर्गिक आपत्तींत दिले, तसे गेल्या वर्षीही केरळ पूरआपत्तीच्या निमित्ताने ५ लाख रुपयांचा धनादेश ‘मनशक्ती’ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. सुरवात म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांना भेटून ५ लाखांचा धनादेश ११ ऑगस्टच्या रात्री दिला. वस्तुरूपाने मदत करायचा विचार होता, परंतु रोगप्रतिबंधासाठी स्वच्छता करायला या, असा सल्ला शासकीय अधिकारी मित्रांनी दिला. त्यानुसार लोणावळा तसेच मुंबई, पुणे आणि अनेक ठिकाणचे ४० साधक कार्यकर्ते १३-१५ ऑगस्ट या कालावधीत सांगली शहरात स्वच्छतेसाठी जातील,
असे ठरले.
सांगली महापालिकेतर्फे माजी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आम्हाला सांगलीवाडीत स्वच्छता करण्याचे सुचवले. तेथील स्वच्छतानिरीक्षक किशोर कांबळे यांनी आम्हाला पतंगराव कदम कॉलेजची स्वच्छता १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी तातडीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेथे काही हजार लोक पुराच्या काळात आसऱ्याला राहिले होते. आम्ही अवघ्या दीड तासात प्लास्टिक, कुजलेले अन्न तीन डंपरमध्ये भरले, झाडाच्या मोठ्या फांद्या हलवल्या आणि पूर्ण परिसर लख्ख झाला. काम छोटे होते, पण परिणाम फार आनंददायी होता. तेथील स्वच्छताकर्मचारी भगिनी, प्राचार्य कणसे यांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सांगलीवाडीच्या लोकवस्तीत अल्पउत्पन्न गटातील बांधव राहतात. लोकांनी वाया गेलेल्या चीजवस्तू रस्त्यावर गोळा केल्या होत्या. कुजलेले धान्य, वह्या-पुस्तके, कपडे, प्लायवूड, गाद्या चिखलाने चिंब होऊन पडल्या होत्या. लोक दमलेले दिसत होते. शरीराने, मनाने. उत्साहासाठी स्वच्छतेची गरज दिसत होती. चार डंपर इतका तो भिजलेला राडारोडा चढवताना चिखलाचे शिंतोडे कपड्यावर, अंगावर उडत होते. तोंडावरचा मास्क निसटत होता. हातमोजे फाटत होते. असे असूनही कार्यकर्ते मागे हटत नव्हते. कसे करत असतील आपले स्वच्छताबांधव रोज हे काम, असा विचार मनात आला आणि अर्थातच त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता दाटून आली.
तेथील ग्रामदैवत मारुतीमंदिर आणि दुर्गामातामंदिर हे चिखलाने भरलेले दिसले. दुसऱ्या दिवशी ते पूर्ण स्वच्छ केले. पुढचे दोन दिवस रस्ते, अरुंद बोळ यातील कचरा हलवला. तो तब्बल २५ डंपर इतका होता. मोकळ्या श्वासाने रहिवासी आनंदले होते. कुणी आपले बाटलीबंद पाणी देऊ करत होते, कुणी चहा, तर कुणी जेवणाची चौकशी करत होते. त्यांच्या मनात आमच्याबद्दल विश्वास दिसत होता.
मनशक्तीच्या अँब्युलन्समध्ये डॉक्टर आणि नर्स कार्यकर्त्यांनी एका बाजूला तपासणी आणि औषधवाटप सुरू केले. दोन दिवसांत ५०० आबालवृद्धांना सेवा मिळाली.
तिसरा दिवस होता १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन. रक्षाबंधनही त्याच दिवशी होते. त्या दिवशी स्वच्छता, आरोग्यसेवा यासह केले ते मनोरंजन. तेथील लहानग्यांनी पुराचे तांडव अनुभवले होते. विध्वंस पहिला होता. आमच्या शिल्पकार साधकाने शाडूची माती आणली होती. त्याने मातीशिल्पे लहान मुलांना करायला दिली. अभिव्यक्तीला मुक्त वाव मिळाला. मुले, तरुण, काही पालक यांनीही अतिशय छान कलाकृती साकारल्या. मनशक्तीचा यशाची सापशिडी हा गुण (शिडी) दोष (साप) आधारित खेळ १०० बालकांना भेट दिला. कार्यकर्ते त्यांच्यासह खेळले. नैराश्य घालवण्याचा कला, खेळ हा मानसोपचार फारच प्रभावी वाटला.
भगिनींसाठी आणलेले ३००० सॅनिटरी पॅड घरोघर आणि डॉक्टरांमार्फत वाटले. १०० चादरी, १०० बेडशीट, १०० ब्लँकेट नांद्रे गावात तर सुमारे ८० चादर, बेडशीट, ब्लँकेट अमनापूर, बोर्ली येथे पाठवले.
सांगलीवाडी सोडताना किशोर कांबळे यांच्या महिला कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्वांना कौतुकाने राख्या बांधल्या, औक्षण केले. त्याच खरे तर रक्षण करतात आपली अस्वच्छतेपासून. फारच हृद्य प्रसंग होता. आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाकून नमस्कार केला.
त्या रात्री आम्ही परतलो. १० जण कामासाठी मागे थांबले. एक दिवस महत्त्वाची कामे करून पुन्हा १७-१८ ऑगस्टला १०० कार्यकर्ते सांगली, कोल्हापूरमध्ये गेले.
सांगलीतील सांगलीवाडी, वाल्मीकी आवास योजना आणि मगरमच्छ कॉलनी येथे स्वच्छता केली. काही जण कोल्हापूर शहर आणि नंतर चिंचवाड या गावात कार्यरत होते. तेथे १००० सॅनिटरी पॅड वाटले. एकूण ८५ डंपर इतका राडारोडा भरून दिला. यावेळी मुलांसाठी चित्रकला, गाणी, गोष्टी, सूर्यनमस्कार असे मनोरंजनाचे उपक्रम घेतले होते.
पुन्हा २४-२५ ऑगस्टला ‘झी युवा वाहिनी’तर्फे सुमारे ३० युवक आणि मनशक्तीचे २० कार्यकर्ते अशा ५० जणांनी कुरुंदवाड आणि सांगली येथे स्वच्छता केली. कुरुंदवाडीतील रणजित डांगे आमच्या बरोबरीने स्वच्छता करत होते. त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत.
स्वच्छता करताना आठवले श्रीकृष्ण, महात्मा गांधी, गाडगेबाबा आणि मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद. यज्ञात कृष्णाने, काँग्रेस अधिवेशन काळात गांधीजींनी, गाडगेबाबांनी तर दीर्घ काळ स्वच्छता केली. स्वामी विज्ञानानंद यांनी १९७७च्या सुमारास ‘सत्कृत्ययात्रा’ काढली होती, गावोगाव स्वच्छतागृहे साफ केली होती. मोठ्यांनी केलेले कार्य आपण समरसून करणे म्हणजे तेवढ्यापुरता त्यांनी आपल्या मनात केलेल्या प्रवेशाचा दिव्य अनुभव.
सात दिवस संध्याकाळी शरीर थकल्यावर मनशक्तीची समाजसेवेची प्रार्थना म्हणायचो. स्वामी विज्ञानानंद यांनी सेवेला श्रम-दान नव्हे, तर श्रम-आनंद म्हटले आहे. दानाचा अहंकार टाळून सेवेची संधी मला समाजपुरुषाने दिली, अशी कृतज्ञता त्यात आहे.
खूप काम झाले का? नाही. अनेक तऱ्हेचे खूप काम बाकी आहे. काय मिळाले या सेवेने? तर आत्मविश्वास. गांधीप्रणीत आपल्याला अपेक्षित बदल करण्याचे सामर्थ्य, किंवा स्टीवन कोवी म्हणतो तसा चिंतेच्या वर्तुळातून बाहेर पडण्यासाठी आपले प्रभावाचे वर्तुळ वाढवत नेण्याचा अनुभव. प्रेक्षक, समीक्षक न राहता दुरितांचे तिमिर घालवण्यासाठी सहकार्याचा, सहवेदनेचा अनुभव.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link