Next
आईचे संस्कार मोलाचे
श्रीराम यादव
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

माझा जन्म मार्च १९३५मधला. माझ्या जन्मापूर्वीच १५ दिवस आधी माझे वडील वारले. मला काका, मामा, भाऊ-बहीण कोणीच नव्हते. माझे संपूर्ण संगोपन आईनेच केले. घरात अठराविश्व दारिद्र्य. माईचे मराठी दुसरीपर्यंतच शिक्षण झालेले. सुदैवाने तिला पुणे नगरपालिकेच्या शाळा क्र. ३ मध्ये शिपाई म्हणून दरमहा नऊ रुपये पगाराची नोकरी मिळाली. त्यात भागणे शक्य नव्हते. आईची मैत्रिण हौसाबाई कसवकर यांचा जळाऊ लाकूड कोळशाचा विक्रीचा मोठा व्यवसाय होता. त्यांचे घरही खूप मोठे होते. त्यातच जनावरांचा गोठा होता. गोठ्यात तीन-चार गायी होत्या. त्यामुळे भरपूर दुध-दही, ताकाची रेलचेल होती. त्या ते न विकता गड्या-माणसांना, मैत्रिणींना मोफत देत असत. साहाजिक आमच्याकडे भरपूर प्रमाणात दही, दूध, ताक येत असे. त्यामुळे आईला त्यांचा आधार असे. शिवाय दिवाळीत फराळ व मला नवीन कपडे मिळत.

आईच्या शाळेतील नोकरीमुळे मला तेथेच चौथीपर्यंतचे शिक्षण मिळाले. पुढे कसबापेठेतील शाळा क्र. ८मधून मी सातवीची (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षा पास झालो. पुढे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. आई अधूनमधून आजारी पडे. घरात कोणीच कर्ते नसल्याने आईने माझे १९५२ मध्ये लग्न लावून दिले. त्यावेळी वधू १२ वर्षांची होती. थोडेफार कर्ज काढून अवघ्या ९७० रुपयांत लग्नसोहळा झाला.

माझी जबाबदारी वाढल्यामुळे मिळेल ते काम करून आईला आर्थिक मदत करत होतो. ते करताना आईला खूप वाईट वाटे. मुलाला शिक्षण घेण्याच्या, खेळायच्या वयात कष्ट करावे लागत असल्याचे आईला वाटत होते. मुलाने शिकावे, मास्तर व्हावे हे तिचे स्वप्न होते. कर्मधर्मसंयोगाने मला तिसरी, चौथीच्या मुलांच्या शिकवण्या मिळाल्या, त्यातूनच मला पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मी जेथे शिकवणी करण्यास जात होते ते मोठे अधिकारी होते. त्यांनी माझे शिक्षण व वय विचारले, मी सविस्तर सांगितले. त्यावर ते सद्गृहस्थ मला म्हणाले, “यादव, तुम्हाला मॅट्रिकच्या परीक्षेला डायरेक्ट बसता येईल.” त्याप्रमाणे मी प्रयत्न केला व यशस्वी झालो, मात्र आठवा विषय इंग्रजीत फक्त चार मार्क पडले. नंतर इंग्रजी विषय घेऊन ३५ मार्काने पास झालो व आईच्या खात्यात मनपा शिक्षण मंडळात मला लेखनिकाची नोकरी मिळाली. त्यावेळी आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू मला आजही आठवतात. माझा मुलगा साहेब झाला अशी तिची भावना झाली.

आईने माझ्यासाठी काबाडकष्ट केले, मोलकरणीचे काम केले. प्रसंगी वखारीत हमालीही केली. शाळेत स्वच्छतेचे काम केले. या आणि अशा अनेक आठवणी मला आजही अस्वस्थ करतात. तिच्या शेवटच्या आजारपणात ‘कष्टाला लाजू नको, चांगल्याची संगत ठेव, व्यसन करू नको व घरी आलेल्यांना विन्मुख पाठवू नको’ हा उपदेश मी कधीही विसरलो नाही. माझ्या अशिक्षित आईने माझ्यावर केलेल्या सुसंस्कारांवर आजवर मी यशस्वी जीवन जगलो. अशी माझी मायमाऊली १९७८ साली हे जग सोडून गेली, तरीही संस्कारांनी आजही ती माझ्यासोबत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link