Next
तुम्हीच हो देव्हारा...
अमोल रायपुरे, पालघर
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘आ ई’ या शब्दावर विपुल साहित्य निर्माण झालंय आणि व्हायलाही हवं, कारण ‘आई’ हा केवळ शब्द नाही तर तलवार आहे अन् ढालही आहे. आई म्हणजे जखमेवरचं मलम, रखरखत्या उन्हातील सावली आहे. तिच्या असण्यानं आयुष्य खूप सुखाचे आहे. खूप पैसा, ऐषोआराम असला तरी आईविना प्रत्येक जण कंगाल आहे. जगातील प्रत्येक नात्यात स्वार्थ असू शकतो, परंतु आईबाबा या नात्यात फक्त आणि फक्त नि:स्वार्थ प्रेम तसंच आपल्या अपत्यासाठी झटण्याची व सहनशीलतेची प्रचंड ताकद असते. खरं तर आई हे एकमेव असं नातं आहे जे आपल्या बाळाच्या जन्मण्यापूर्वीच त्याच्याशी जोडलं जातं. हे नातं अशा काही पद्धतीनं जोडलं जातं की कुठल्याही आघातानं तुटणं शक्यच नाही. असंच एक नातं जे खूप कणखर, कडक आणि शिस्तप्रिय आहे. या नात्याला आपण ‘नारळ’ व्यक्तिमत्त्व म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल, नारळच का? तर त्याचं कारण असं आहे, की नारळ वरून खूप टणक, कणखर पण आतून खूपच मृदू, नरम आणि गोड असतो. नारळ म्हणजे आपले लाडके बाबा. आईबद्दल खूप मोठी मोठी कव्यं रचली गेली आहेत. बापावर लिहिताना किंवा बोलताना कुणीही आढळत नाही. म्हणूनच मी आज बापाची बाजू सांभाळणार आहे.
आम्ही लहानपणापासून आतापर्यंत बाबांना घाबरत आलोत आणि आजही त्यांची जरब आहे. त्याचबरोबर त्यांनी आमच्यावर तितकंच प्रेमही केलं. मी तिसरीला होतो तेव्हा मोठा भाऊ सातवीत, तर बहीण पाचवीला होती. घरात एकदा आईबाबांचं कडाक्याचं भांडण झालं आणि आई काही दिवस घर सोडून मामांकडे निघून गेली होती. त्यावेळी आमची खाण्यापिण्याची परवड होतेय हे बघून बाबांनी स्वत: जेवण बनवून आम्हा तिघा भावंडांना भरवलं होतं. तेव्हाच आमच्या बाबांचा नारळी स्वभाव (आतून मृदू वरून कडक) लक्षात आला. ते जितके कणखर तितकेच प्रेमळही आहेत. बाबा हे अगदी साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणीचे आहेत. ते आम्हाला नेहमी सांगत असत, केस बारीक कापा, साधे कपडे घाला आणि नेहमी आजूबाजूला काय घडतंय हे अभ्यासत राहा. त्यावेळी त्यांचे हे सल्ले मला निरर्थक वाटत असत. कारण त्यावेळी मला चित्रपट-मनोरंजन या क्षेत्राचं खूप आकर्षण वाटायचं, आजही वाटतंय. परंतु त्यावेळी मी अभ्यास सोडून चित्रपट अभिनेत्यांसारखेच केस कापत असे आणि बाबांना ते आवडत नसे. त्यामुळे मी बऱ्याचदा त्यांचा मारही खाल्ला आहे. सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी सलमान खानची हेअर स्टाइल आणि पोशाख मी कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता हे बघून बाबांना खूप राग आला. ते लगेचच मला न्हाव्याकडे घेऊन गेले आणि माझे केस बारीक करायला सांगितले. माझे बारीक झालेले केस बघून मला बाबांचा खूप राग आला होता. त्यावेळी बाबांनी दिलेला सल्ला आजही माझ्या लक्षात आहे आणि मी आता बारीकच केस कापतो. त्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर चांगला प्रभाव पडतो. बाबांनी दिलेल्या या सल्ल्याचं मी काटेकोर पालन करतो. आमच्याबरोबर शिकणाऱ्या इतर मुलांचे पालक नेहमी त्यांना आपल्या वैयक्तिक कारणामुळे शाळेला दांडी मारण्याचा सल्ला देत असत. परंतु आमच्या बाबांनी किंवा आईनं कधीच दांडी मारण्याचा सल्ला दिला नाही. किंवा त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी कधीही आमचा उपयोग करून घेतला नाही. आईबाबा म्हणून ते खूपच महान आहेत. अगदी देवापेक्षाही.
आपण पहिला श्वास घेतला तेव्हा आपले आईबाबा आपल्याजवळ होते. त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे, की ते जेव्हा शेवटचा श्वास घेतील तेव्हा आपण त्यांच्याजवळ असावं. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो मरेपर्यंत आपल्या पिलांची काळजी घेतो. आपल्या जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास अतिशय आव्हानात्मक असतो. बाप म्हणजे काय, हे बाप झाल्याशिवाय कळत नाही.
भरवुनी मुखी चारा
पिंजून आसमंत सारा
लडखडत्या वयात
दिला आम्हाला सहारा
तुम्हीच देव आमचे
तुम्हीच हो देव्हारा


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link