Next
फोडशीची खमंग भाजी
वसुधा गवांदे
Thursday, August 15 | 06:30 PM
15 0 0
Share this story

पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाऊ नका असे पालकांनी कितीही सांगितले तरी आजकाल मुलांना पावसाळ्यात पिझ्झा, पास्ता, मॅगी, टोस्ट सॅण्डविच, अमुक फ्राय, तमुक फ्राय असे पाश्चिमात्य पदार्थ हवे असतात. हे पदार्थ कधीतरी खायला ठीक, परंतु त्यांमुळे शरीराला काहीही फायदा होत नाही किंवा पोषक घटक मिळत नाहीत. निसर्ग स्वतःच एक डॉक्टर असतो. तो बदलत्या ऋतुमानानुसार फळे, भाज्या यांची निर्मिती करत असतो. आपल्याला फक्त त्या भाज्या, फळे हुडकून काढता आली पाहिजेत. आज मी तुम्हाला अशाच एका खास पावसाळी भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रानभाजीची रेसिपी सांगणार आहे. ही भाजी म्हणजे फोडशी. बाजारात सध्या या भाजीच्या जुड्या नजरेस पडताहेत. गवतासारखी दिसणारी ही भाजी अत्यंत बहुगुणी आहे. तुम्ही जर या भाजीसोबत भाकरी करून खाल्ली, तर तुमचे  पोट तुमच्यावर एकदम खुश होईल.
अशी ही फोडशीची भाजी करण्यासाठी एक जुडी फोडशी घ्या. सगळ्याच भाज्या पावसाळ्यात चांगल्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. फोडशी चांगली धुऊन घेतली की त्याचे पांढऱ्या रंगाचे मूळ व त्यात एक दोर असतो तो काढून टाका. भाजी बारीक चिरून घ्या. कढईत दोन चमचे तेल गरम करा. तेल तापले की चिरलेल्या किंवा ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्या. मग जिरे, कांदा घालून पुन्हा एकदा परतून घ्या. कांदा लालसर झाला की हिंग, तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवा. पाच मिनिटांनी झाकण काढून त्यात भिजवलेली चणाडाळ घाला आणि ती चांगली शिजू द्या. डाळ शिजली की त्यावर फोडशीची भाजी घालून चांगली मिक्स करा. थोडावेळ झाकण ठेवून भाजी शिजू द्या. मग त्यावर ओले खोबरे घाला. झाली भाजी तयार. काही जण यात बेसन घालून याचा झुणकासुद्धा करतात.
पावसाळ्यात ज्या भाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत त्यापैकी ही एक भाजी आहे. नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून ही भाजी या पावसाळ्यात एकदा तरी करून बघाच.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link