Next
हरहुन्नरी
शब्दांकन - योगेश जाधव
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


मला असं वाटतं, की बारशातच माझं करिअर ठरलं होतं. माझ्या आई-बाबांनी माझं नाव सचिन ठेवलं कारण त्यांना सचिन पिळगावकर खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलाला कलाक्षेत्रातच पाठवायचं. आणि त्या पद्धतीनंच माझा प्रवास सुरू झाला. मी चौथीत असताना आईनं विद्याताई पटवर्धन यांच्या नाट्यशिबिराची जाहिरात पाहिली ती मला दादरला घेऊन गेली. आम्ही त्यावेळी मुलुंडला राहायचो. तेव्हापासून विद्याताईंशी जे जोडलो गेलो ते आजतागायत. विद्याताईंसोबतच अभिनयातील माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिलं बालनाट्य, पहिली मालिका, पहिला चित्रपट, जो काही अनुभव मिळाला, तो विद्याताईंमुळेच. माझ्यात ही सर्जनशीलता बाबांकडून आली आहे. त्यांना या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं, परंतु त्यांना ते जमलं नाही. त्यांनी हे स्वप्न माझ्या माध्यमातून पूर्ण केलं. अर्थात त्यांनी हे माझ्यावर कधीच लादलं नाही.

सुट्टी म्हणजे तालीम, प्रयोग

विद्याताईंसोबत मी अनेक बालनाट्यं केलीत. विद्याताईंमुळे मला मीना नाईक, प्रकाश बुद्धिसागर, कमलाकर नाडकर्णी या दिग्गजांसोबत बालनाट्यांत काम करण्याची संधी मिळाली. अभिनयासोबत नाट्यवाचन, प्रायोगिक नाटक, दूरदर्शनच्या मालिका, किलबिल, चित्रपट असा प्रवास सुरू झाला. विद्याताईंनी मला सर्वप्रथम सई परांजपे यांच्याकडे ‘चूडियाँ ‘ टेलिफिल्मच्या ऑडिशनसाठी पाठवलं. इथं पहिल्या चित्रपटाचा, कॅमेराचा पहिला अनुभव सईताईंमुळे घेता आला. या चित्रपटात चंदू पारखी, शोभा खोटे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. पुढे सई परांजपे यांच्या ‘साज’, ‘पपीहा’, ‘चकाचक’ या चित्रपटांत काम केलं. कालांतरानं त्यांच्यासोबत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानं चित्रपटाचं ज्ञान मला त्यांच्याकडून मिळालं. विद्याताईंनी ‘आविष्कार’मध्ये नेलं. तिथे सुलभाताई, चेतन दातार, जयदेव हट्टंगडी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रकाश बुद्धिसागर यांच्यासोबत मी ‘आला अडाण्याचा गाडा’ हे नाटक केलं. ज्यात अजय वढावकर, विवेक गोरे, लतिका सावंत, प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट होते. या नाटकाचे हिंदी,मराठी मिळून सुमारे पन्नास प्रयोग केलेत. यात प्रकाश बुद्धिसागर यांच्यासोबत साहाय्यकाची भूमिकाही केली होती. हा अनुभवही खूप काही शिकवून गेला. माझ्यासाठी लहानपणची सुट्टी म्हणजे चित्रीकरण, प्रयोग, तालीम हीच असायची. सुटी लागल्यावर गावाला गेलो, फिरायला गेलो असं कधीच झालं नाही. मी अभिनयातच रमायचो.

महाविद्यालयात अभिनय केलाच नाही
दहावीनंतर रुपारेल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. अकरावीत असताना विद्याताईंसाठी मी बालनाट्य दिग्दर्शित केलं होतं. ते मेघना एरंडे हिनं लिहिलं होतं. यात अतुल परचुरे, अरुण होर्णेकर, बापू कामेरकर, केतकी थत्ते, नम्रता कदम, अमेय साळवी यांनी काम केलं. या नाटकाला संगीत कौशल इनामदार यांनी दिलं होतं. मराठी,हिंदी मिळून पंचवीस-तीस प्रयोग केले. बाहेर काम सुरू असल्यानं महाविद्यालयातून एकांकिकेतून,नाट्यस्पर्धांत सहभागी झालो नाही. अभिनय आणि अभ्यास असं दोन्ही गोष्टी सांभाळत बी.कॉम., एम.कॉम., एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभ्यासक्रम पूर्ण केला.

‘महानायका’चा सहवास लाभला
डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या इंग्रजी चित्रपटात मी यशवंत आंबेडकर यांची भूमिका साकारली. ही माझ्यासाठी खूप कठीण भूमिका होती. या चित्रपटात मामुटी, सोनाली कुलकर्णी, अशोक मेहता, नितीन चंद्रकांत देसाई होते. त्यामुळे हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. या चित्रपटात माझी निवड शिवदास घोडके यांनी केली होती. काही काळ मी दिग्दर्शन आणि निमिर्तीमध्येही काम पाहिलं. निर्मिती विभागात असल्यानं ‘कौन बनेगा करोडपती २’च्या निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सई परांजपे यांच्याकडे क्लॅप बॉय ते कार्यकारी दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. सईताईंकडे फिल्ममेकिंग नाही तर कास्टिंग, गाण्याचं चित्रीकरण, नियोजन, कमी बजेटमध्ये उत्तम चित्रपट कसा करायचा, याच सखोल ज्ञान मिळालं.

प्रभावी दिग्दर्शिका लाभल्या
पहिल्यांदाच जेव्हा मी चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो, तेव्हापासून सईताईचं निरीक्षण करत होतो. त्या उत्तमरीत्या दिग्दर्शन करतात. विद्याताई, मीनाताई, नीनाताईंना बघायचो.  तेच पाहून आपसूकच दिग्दर्शनाकडे ओढलो गेलो. माझ्या करिअरमध्ये जेवढे दिग्दर्शक आले त्यातील बऱ्याच महिला होत्या आणि या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. थिएटर करत असताना विद्याताई, सुलभाताई यांनी केवळ अभिनयाचेच धडे दिले नाहीत तर त्याच्याशी संबंधित इतर गोष्टीही शिकवल्या.

चार-पाच वर्षांचा काळ खडतर

या क्षेत्रात आल्यावर स्वतःला स्थिरस्थावर करण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागला. कॉलेज संपलं तेव्हा माझ्या बाबांची कंपनी बंद पडली. आमच्या घरात उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं. त्यामुळे घरखर्चासाठी मी वकिलाच्या फर्ममध्ये नोकरी स्वीकारली. कामाच्या निमित्तानं परदेशातही जाण्याची संधी मिळाली. अर्थात यातूनही मला खूप काही शिकायला मिळालं. नोकरी सुरू असताना थेट अभिनयाची खुमखुमी होतीच. या काळात अभिनयासाठी पूर्णवेळ देणं शक्य नसल्यानं शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी करत मी दुधाची तहान ताकावर भागवली. तेव्हा मी ‘प्रयाग’ नावाची शॉर्टफिल्म केली होती. प्रिया तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित. त्यालाही भरपूर पुरस्कार मिळाले. त्यानंतर ‘सेलिब्रेशन्स’ नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती, ही सायलेंट फिल्म होती. तिला एका नामांकित वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या पुरस्कारसोहळ्यात सर्वोत्कृष्ट ‘शॉर्ट फिल्मचा पुरस्कार’ मिळाला. ‘ऑडी एल्टेरम पार्टम- हिअर दि अदर साईड’ ही इंग्रजी डॉक्युमेंटरी केली. त्याचीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली होती. हे सगळं सुरू होतं तरी माझ्यातील अभिनेता मात्र खूप अस्वस्थ होता… आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर नोकरी सोडून पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. आई-बाबांनीही मला पाठिंबा दिला. नोकरी सोडून पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात करिअर सुरू करण्याचा हा काळ होता. या मधल्या चार-पाच वर्षांत इथंही बरंच बदललं होतं. सगळं डिजिटल झालं होतं. नवीन कलाकार, दिग्दर्शक आले होते. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले’ मिळेपर्यंतचा चार-पाच वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप खडतर होता. परंतु जिद्द कायम असल्यानं हा काळही सरला…

गर्दीतील कलाकार ते ‘काशी’
नोकरीला जसं रोज सकाळी निघतो तसं ऑडिशन्सला सकाळी निघत असे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नोकरी सोडली होती. आता पुढे काय? एवढी चांगली नोकरी सोडून अनिश्चित क्षेत्र निवडत आहेस, असं म्हणून त्यावेळी अनेकांनी मला मूर्खात काढलं होतं. या संघर्षाच्या काळात मात्र आई-बाबा आणि मामा माझ्यासोबत होते. या संघर्षाच्या काळात मी जमावातही काम केलं होतं. एखादं वाक्य मला दिलं जायचं. ते वाक्यही मी खूप तन्मयतेनं करायचो. छोट्याशा भूमिकाही मन लावून केल्या. आपल्या चेहऱ्याला रंग लागणार,आपण कॅमेऱ्यासमोर जाणार याचाच मला आनंद होता. या ऑडिशनमधूनच ‘झी मराठी’वरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा काही मालिकांमधून मी छोट्या छोट्या भूमिका केल्या.

... आणि ‘काशी’ गावलो

खरं तर कुमार सोहोनी यांची ‘संस्कार’ ही माझी पहिली मालिका. सई परांजपे यांचा ‘साझ’ हा पहिला हिंदी चित्रपट, तर राजदत्त यांचा ‘झंझावात’ हा पहिला मराठी चित्रपट. अभिनयाच्या क्षेत्रात हा अनुभव असूनही मध्यंतरी काही काळ मी अभिनयापासून दूर गेलो होते. पुन्हा इथं स्थिरस्थावर होण्यासाठी ऑडिशनशिवाय पर्याय नव्हता. ऑडिशनचा सिलसिला सुरूच होता. ऑडिशन सुरू असताना ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेसाठी ऑडिशन होत असल्याचं समजलं. सहा महिने सतत पाठपुरावा केल्यानंतर मला ऑडिशनला बोलावण्यात आलं. ही ऑडिशन माझ्यासाठी सोपी नव्हती. सुरुवातीला मालवणी भाषेतील संवाद दिले. आई कणकवलीची असल्यानं मालवणी भाषा ऐकली होती. परंतु त्या लहेजामध्ये बोलता येत नव्हते. त्यामुळे संवाद म्हणणं माझ्यासाठी जरा कठीण होतं. तरीही ऑडिशनला दिलेले संवाद उत्कृष्ट सादर करत वेळ निभावून नेली. खरी कसोटी होती ती म्हणजे त्यांनी एक घटना दिली आणि मला स्वतः संवाद ठरवून बोलायचे होते. सुरुवातीला मी घाबरलो तरीही ती ऑडिशन दिली. आणि सर्वांनाच माझं काम आवडल्यानं ‘काशी’ची भूमिका मिळाली.
 
‘काशी’नं खूप काही दिलं
 ‘काशी’चा प्रवास हा ऑडिशनच्या दिवशीच सांगितला होता. मला तर असं वाटतं, की काशीवर मुळातच लेखकानं खूप प्रेम केलं. त्यामुळे मला वेगळं काही करण्यासारखंच नव्हतंच. एक कलाकार म्हणून मी त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात मला संवाद असे फार कमी होते त्यामुळे माझ्यासाठी ही फार कठीण भूमिका होती. त्यात मालवणी भाषा बोलायचं दडपण. परंतु माझ्या सहकलाकारांच्या मदतीनं ते शक्य झालं. एकंदरच ‘काशी’ ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध होण्याचं श्रेय हे दिग्दर्शक आणि लेखकांचंच आहे.  ‘काशी’नं या मालिकेत सर्वांचा मार खाल्ला आहे. यात एक सीन असा होता की मला दगडानं मारत आहेत आणि मी जमिनीवर पडतो. ते दगड म्हणजे बटर होतं. त्यामुळे ते तुटले ते खोटे दगड आहेत हे कळायचं. त्यामुळे दिग्दर्शक म्हणाले आम्ही तुला २-३ खरे दगड मारू मात्र सांभाळून. चित्रीकरण सुरू झालं आणि दिग्दर्शकानं दगड मारला आणि साहाय्यक दिग्दर्शकांनीही समोरून एक खरा दगड मारला. तो सरळ दातावर येऊन लागला आणि एक क्षण सगळे स्तब्ध. माझा दात फ्रॅक्चर झाला होता. मीही घाबरलो. परंतु तिसऱ्या मिनिटाला मी त्याच ताकदीनं, उत्साहानं चित्रीकरणाला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी मला झाडाला उलटं लटकवण्याचा प्रसंग होता. मला व्हर्टिगोचा त्रास होता हे सेटवर कोणाला सांगितलंच नव्हतं. तरीही आत्मविश्वासानं हा प्रसंग सादर केला. शेवटच्या दिवसात ‘काशी’चा चेहरा अतिशय विद्रूप दाखवला आहे. त्यावेळी हा मेकअप करायला एक दीड तास लागायचा. तोंडात बोळे घालून ठेवायचे. अशा अवस्थेत संवाद बोलायचे. कठीणच असायचं. काशीनं माझ्याकडून जितकं घेतलं त्याच्या दुप्पट मला दिलं. दहा भूमिका करून जे वैविध्य मिळत नाही. ते काशीनं मला एका भूमिकेत दिलं.  काशी हा एक मानसिक संतुलन गमावलेला तरुण आहे. त्यामुळे ते करताना सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचा. शॉट कट झाल्यावर मी काही क्षण त्याच भूमिकेत असायचो. असं पटकन स्विच ऑन, स्विच ऑफ होणं कठीण व्हायचं.

विनोदी भूमिका साकारण्याची इच्छा

मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम करत असल्याने तिन्ही माध्यमं आवडतात. प्रत्येक माध्यमाचं स्वतःचं असं बलस्थान आहे. मागच्या वर्षीच विक्रम भट लिखित आणि दिग्दर्शित ‘ट्विस्टेड’ या हिंदी वेबसीरिजमध्ये एक व्यक्तिरेखा साकारली होती. यात काम करताना फारसा फरक वाटला नाही. परंतु त्याच्या प्रतिक्रिया मात्र खूप वेगळ्या होत्या आणि त्या निश्चितच सुखावणाऱ्या होत्या. अर्थात वेब सीरिजमध्ये काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत. तरीही नक्कीच हल्लीच्या काळात वेब सीरिज हे माध्यम सर्वांना खुणावणारं आहे. भविष्यात मला विनोदी भूमिका करायला नक्कीच आवडेल. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यात विनोदी भूमिका केली होती. जी प्रेक्षकांनाही आवडली होती. मी उत्कृष्ट नृत्य करत असल्यानं तशा प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत.
 
‘पंढरी के रंग’ लवकरच
प्रियांका चोप्रा निर्मित, अरुण राजे-पाटील दिग्दर्शित ‘फायर ब्रँड’ नावाच्या चित्रपटात माझी एक छोटी भूमिका आहे. या चित्रपटाचे काही संवादही मी लिहिले आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या फिल्म डिव्हिजन निर्मित ‘पंढरी के रंग’ ही डॉक्युमेंटरी फिल्म पंकज शर्मासोबत मी दिग्दर्शित करत आहे. ही फिल्म ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीदादा जुकर यांच्यावर आधारित असून ती आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. यात वहिदा रेहमान, माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला, जुही चावला, अश्विनी भावे, रेणुका शहाणे अशा दिग्गज अभिनेत्री आहेत. ही डॉक्युमेंटरी लवकरच तुमच्या भेटीला येईल.

  • आवडतं पुस्तक - सिनेमाची गोष्ट (अनिल झनकर), स्ट्रेन्जर्स (सत्यजित रे), खेकडा (रत्नाकर मतकरी)
  • आवडतं गाणं - भारतीय संगीत, विशेषतः चित्रपटसंगीत
  • आवडता चित्रपट - अनेक चित्रपट एक सांगणं कठीण
  • आवडता अभिनेता - दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, इरफान खान
  • आवडती अभिनेत्री - स्मिता पाटील

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link